Robots : रोबोट्स, उडत्या तबकड्या, एलियन्स गोष्टींबरोबरच गेलं वर्ष गाजवलं ते, Chat GPT, Open AI च्या करामतींनीं. AI मुळं जॉब जाणार? इथून ते AI चा वापर करून साकारलेली चित्रं, स्क्रिप्ट ते कोडिंगपर्यंतची कामं तुम्ही आम्ही रोज करू लागलो आहोतच. AI मुळं जॉब जाणार यात तथ्य असलं तरी नव्या वाटा आज सगळ्यांना दिसत आहेत. त्या मार्गाने चालायला देखील सुरुवात केली नसेल तर आजच करायला लागा!


तंत्रज्ञानाच्या लूप होल्सकडे नकारात्मकतेने पाहण्यापेक्षा सकारात्म, आशावादी राहिलं तर वाईट काय? बरं याच टूल्सचा वापर करून रश्मिकाच्या 'तसल्या' Deepfake व्हिडीओमुळं वातावरण चांगलंच 'गरम' झालेलं पाहायला मिळालं होतं. तर कित्येक लोकांच्या फेक प्रोफाईल्स तयार करणं, हनी ट्रॅप, आर्थिक फसवणूक करणं, डिजिटल डेटा चोरी करणं अशा प्रकारे गुन्हेगारी देखील वाढली आहेच!


दुसरीकडे इस्रोने चांदोमामाकडे पाठवलेला रोवर चंद्रावर फिरून फिरून जे गाढ झोपी गेला तो नंतर जागा झालाच नाही... तंत्रज्ञानामुळे आपल्या माना कधी अभिमानाने उंचावल्या गेल्या तर कधी शरमेने खाली गेल्या.


तर, गतवर्षी Google Bard, Whatsapp, Threads, या सारख्या नव्या प्लॅटफॉर्म्स ते त्याच्या अपडेटेड फीचर्सने तरुणाईला वेड लावलंच शिवाय रिल्सच्या विश्वात ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकरांना देखील चांगलाच गणपती पावला. एलॉन मस्कने तर आख्या ट्विटर... सॉरी 'X' च्या विश्वाचा बट्ट्याबोळ केला... नव्या पॉलिसी आणल्या आणि माझ्यासारख्या नेटकऱ्याला नाराज केलं, कारण फ्रीमध्ये मिळालेलं ब्लू टिकंच नाही तर कित्येक फिचर्स पेड करून ठेवले. हळूहळू फ्री असणाऱ्या गोष्टी पेड सुरू झाल्या. हे आपण सारं काही गेल्या वर्षी पाहिलं.. यात गुंतलो.


तुम्ही आम्ही पार्टी मोडमध्ये असतानाच अचानक बातमी व्हायरल झाली ती एका कंपनीत रोबोटने कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची! 


रोबोटने हल्ला कसा केला असेल याची कल्पना करणं म्हणजे रजनीकांत अण्णांचा चिट्टी रोबोटच डोक्यात आल्याशिवाय राहतं... 
दुर्घटना कोणतीही असो त्यात नाहक ईजा पोहोचली असेल तर त्याला समर्थन नाहीच..
पण थांबा,


खरंच रोबोट माणसांवर हल्ला करू शकतो का?


आपण सिरी, अलेक्सासोबत गप्पा मारतो आणि तशी उत्तरं देखील मिळतात. हा AI च्या प्रगतीचाच भाग म्हणू. जिथं तंत्रज्ञान Artificial Intelligence या नावातच यांत्रिक हुशारी दडलेली आहे तिथं सारं काही घडण्याची शक्यता आहेच.


मुळात तंत्रज्ञानाचा वापर हा मानवी जीवनाच्या सुधारणांसाठी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर आजवर तंत्रज्ञान एवढं प्रगत झालंच नसतं. समजा एखाद्या रोबोटला एक काम सांगितलंय आणि त्या कामाच्यामध्ये जर कोणीतरी मनुष्य आला तर त्याचं काहीही होऊ शकतं. 
कित्येक दुर्घटना आपण पाहिल्यात जिथं विविध कारणांनी माणसानेच माती खाल्लेली दिसून येते.


वेळखाऊ काम आजकाल AI टूल्समुळं फटाफट होतात, आणि कित्येक लोकांना नव्या जॉब्सच्या संधी उभ्या झाल्या कित्येक कंपन्यांना याचा फायदा झाला. जे काम यांत्रिकी आहे ज्यात डोकं लावायची गरज नाही ते AI ने केलं तर वाईट काय आहे? तुम्ही हुशारीचं काम करा जिथं डोकं वापरायची गरज आहे.


2016 चा सगळ्यात प्रसिद्ध रोबोट 'सोफिया', विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं ही तिची खुबी. तेव्हा असाच कोणीतरी आगाऊ प्रश्न विचारलेला की, 'Will You Distroy Human?'
तू मानवांचा ऱ्हास करू शकतेस का?


यावर उत्तर देताना सोफियाने चक्रावून सोडलं ती म्हणाली 'OK, I Will' हे ऐकताच सगळ्यांच्या मेंदूला मुंग्या आल्या होत्या आणि त्याचा उहापोह बराच झाला.


माणसांवर रोबोटने हल्ला खरंच केलाय?


इतिहासात अशा घटना आहेत त्यापैकी एक घटना...11 नोव्हेंबर 2021 मध्ये टेस्लाच्या गिगा फॅक्टरी टेक्सासमध्ये झालेली.


मात्र, या घटनेची बातमी काही दिवसांपूर्वी सगळीकडे चर्चेत आली, तब्बल तीन वर्षे ही गोष्ट तुम्हा आम्हापर्यंत आलीच नव्हती. मात्र, डेली मेलच्या एका आर्टिकलमधून ती सगळ्यांपर्यंत पोहोचली. मात्र, सगळ्यांनी त्या रोबोटला 'चिट्टी' रोबोट सारखं समजलं ज्याने हेतूपूर्वक मनुष्याला जखमी केलं. झालं आणि मग टेस्लाला बदनाम करायची नामी संधी विरोधकांनी सोडली नाही. 


2021 नंतर टेस्लाने त्यांचा अगदी मानवासारखा चालणारा, बोलणारा Optimus रोबोट लॉन्च केलेला. त्यामुळे अशा चर्चांना पेव फुटला.


याचा उलगडा एलॉन मस्कने ट्विट करत केला की, कोणत्याही टेस्लाच्या रोबोटने किंवा Optimus ने हा प्रकार केलेला नाही तर गिगा फॅक्टरीमध्ये असलेल्या kuka robot arm कडून ही झालेली दुर्घटना होती.
रोबोट आर्म म्हणजे अवजड, मेहनती काम करणारा यांत्रिक हात जो गल्ली ते दिल्लीतल्या फॅक्टरीमध्ये वापरला जातो. अशा आर्मच्या धक्क्याने एक कर्मचारी जखमी झालेला जो दुसऱ्या दिवशी कामावर देखील रुजू झाला..
मात्र 'ध' चा 'मा' असा झाला की, टेस्ला बदनाम. जगभरात नववर्षाच्या स्वागताला पुन्हा भविष्याची चिंता लागली. रोबोटिक्स AI वर पुन्हा काळे ढग आले.


असो, शेवटी लिहिण्याची गोष्ट अशी की तंत्रज्ञान आलं त्याला चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींची जोड आलीच. 
प्रत्येक नव्या शोधाला विरोध झाला मग अगदी गाड्या, कॉम्प्युटर्स पासून आत्ताचा Chat GPT पर्यंत. हल्ली रस्ते वाहतुकीत अपघातात जीव गमावणाऱ्यांची संख्या अशी भली मोठी आहे की, तिथं एखाद्या गाडीने स्वतःहून प्रवाशांचा जीव घेतला असं आपण म्हणत नाहीच ना? मानवी चुका टाळता टेक्नॉलॉजी वापर कसा करायचा याचा रिमोट सध्या तरी वापरकर्त्याच्या हातात आहे. Chat gpt चे टूल्स पाणीपुरीची रेसिपी लिहण्यापासून करून खाऊ घालेपर्यंत विकसित झालेले आहेतच. शिवाय असे प्रोग्रॅम्स डेव्हलप होतील की मिळलेल्या आज्ञा चूक की बरोबरच हे ठरवूनच रोबोट पावलं उचलतीलंच! पण डिजिटल दुनियेत सायबर सुरक्षेची काळजी घेण्याइतपत साक्षर होणं गरजेचं आहे.


विनीत वैद्य यांचे अन्य काही महत्वाचे ब्लॉग 


'X' फॅक्टर...
मृत्यूस कारण की...
पैश्याच सोंग...
दोन दगडांवर पाय...
झेपावे मिलियन्सकडे...
डिजिटल डिस्टन्स