धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलच्या रणांगणात लागोपाठ दुसरा पराभव स्वीकारावा लागला आणि कॅप्टन कूलचं नेमकं काय चाललंय याची चर्चा सुरु झाली. आधी राजस्थान रॉयल्स आणि मग दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची कार पंक्चर झाली. चेन्नईच्या फलंदाजीची हवा गुल झाल्याचं चित्र लागोपाठ दोन्ही सामन्यांमध्ये स्पष्ट दिसत असतानाही कर्णधार धोनीनं वरच्या क्रमांकावर फलंदाजीला यायचं टाळलं. सुरेश रैना आणि अंबाती रायुडू यांच्यासारख्या अनुभवी फलंदाजाच्या अनुपस्थितीत धोनीनं ऋतुराज गायकवाड आणि केदार जाधव यांच्या फलंदाजीवर अधिक विश्वास टाकला. त्याची कारणं काहीही असोत, पण एक कर्णधार म्हणून धोनी स्वत:मधल्या फलंदाजाविषयी काय विचार करतोय असा प्रश्न नक्कीच निर्माण झाला आहे.


वास्तविक आयपीएलच्या यंदाच्या मोसमाचा बिगुल वाजण्याआधीच सुरेश रैना वैयक्तिक कारणामुळं मायदेशी परतला होता. त्यामुळं चेन्नईच्या फलंदाजीला मोठं खिंडार पडलं. आयपीएलच्या इतिहासात सुरेश रैना हा सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. तो तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर खेळणं ही चेन्नईसाठी सर्वात जमेची बाजू होती. त्यामुळं रैना परतला आणि त्यावेळीच धोनीनं स्वत:च्या फलंदाजीच्या क्रमांकाचा फेरविचार करणं अपेक्षित होतं.


धोनीच्या सुदैवानं मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात चेन्नईचं अंबाती रायुडू नावाचं नाणं खणखणीत वाजलं. त्यानं 48 चेंडूंत 71 धावांची खेळी उभारून धोनीची लक्ष्याचा पाठलाग करण्याची फेव्हरिट रणनीती यशस्वी ठरवली. त्यामुळं रैनाची अनुपस्थिती आणि चेन्नईच्या फलंदाजीचा कच्चा दुवा लपून राहिला. तोच अंबाती रायुडू दुखापतीच्या कारणास्तव पुढच्या दोन्ही सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. त्यामुळं चेन्नईच्या फलंदाजीतल्या उणिवा स्पष्ट दिसल्या. पण त्याही परिस्थितीत धोनीचा नाणेफेक जिंकून लक्ष्याचा पाठलाग करण्याचा अट्टहास कायम राहिला.


त्यामुळं झालं काय, ते तुम्हीच पाहा... दुबईच्या रणांगणात दिल्ली कॅपिटल्सनं दिलेल्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सहा षटकांत दोन बाद 34 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. त्या परिस्थितीत खरं तर धोनी मैदानात उतरला असता तर त्याला फाफ ड्यू प्लेसीच्या साथीनं सामन्याची सूत्रं हाती घेता आली असती. पण धोनीनं पाठवलं कुणाला, तर ऋतुराज गायकवाडला. तो धावचीत होऊन झटपट माघारी परतला. मग ड्यू प्लेसी आणि केदार जाधवनं अर्धशतकी भागीदारी रचली खरी, पण चेन्नईसाठीचं विजयाचं समीकरण 26 चेंडूंत 78 धावा इतकं कठीण झालं होतं. कदाचित विजयासाठी प्रयत्न करण्याची वेळही तोवर टळली होती. त्या परिस्थितीत मैदानात उतरलेला धोनी 12 चेंडूंत दोन चौकारांसह 15 धावा यापेक्षा अधिक काही करु शकला नाही. त्यामुळं चेन्नईला दिल्लीकडून तब्बल 44 धावांनी मोठा पराभव स्वीकारण्याची वेळ आली. त्याआधी राजस्थान रॉयल्स संघाविरुद्धच्या सामन्यातही हीच गोष्ट घडली होती.


त्या सामन्यात राजस्थाननं चेन्नईला विजयासाठी तब्बल 217 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची नवव्या षटकात तीन बाद 77 अशी झाली होती. खरं तर त्या परिस्थितीत ड्यू प्लेसीच्या साथीला धोनी येण्याचीच आवश्यकता होती. पण धोनीनं पुन्हा विश्वास टाकला तो ऋतुराज गायकवाडवर. तो आल्या पावलीच माघारी परतला. त्यानंतरही ड्यू प्लेसीच्या साथीला केदार जाधव उतरला. धोनी नाही. मग ड्यू प्लेसी आणि केदारनं चेन्नईला 13.4 षटकांत पाच बाद 114 धावांची मजल मारून दिली. पण तोवर विजयासाठीचं समीकरण 38 चेंडूंत 103 धावांचं झालं होतं. त्या वेळी ड्यू प्लेसीच्या साथीला धोनी येऊनही दिवे लागणार नाहीत, हे स्पष्टच झालं होतं.


चेन्नईनं राजस्थानविरुद्धचा तो सामना 16 धावांनी गमावला. पण त्याआधी धोनीनं अखेरच्या षटकात तीन चेंडूंवर सलग तीन षटकार ठोकून आपल्यावर पराभवाचं बालंट येणार नाही याची काळजी घेतली. धोनीच्या या रणनीतीवर, किंबहुना चेन्नईला हा सामना जिंकायचा होता का, याविषयीच माजी कसोटीवीर गौतम गंभीरनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. धोनीनं अखेरच्या षटकात ठोकलेल्या तीन षटकारांचं मोल हे केवळ त्याच्या वैयक्तिक धावांपुरतंच आहे, असा टोमणा गंभीरनं मारला आहे. धोनीनं चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर येऊन फाफ ड्यू प्लेसीच्या साथीनं षटकारांची बरसात केली असती, तर त्याला काहीतरी अर्थ होता, असंही गंभीरनं सुनावलं आहे.


चेन्नईची फौज अडचणीत आलेली असताना धोनीनं गायकवाड आणि करनला फलंदाजीसाठी पाठवणं गंभीरच्या दृष्टीनं धक्कादायक होतं. म्हणूनच तो म्हणाला, ‘धोनीनं सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरण्यात काहीच मतलब उरला नव्हता. त्यानं खरं तर कर्णधार म्हणून आघाडीवर येऊन चेन्नईच्या फौजेचं नेतृत्त्व करायला हवं.’ चेन्नईच्या चाहत्यांच्याही मनात असलेली ही भावना गौतम गंभीरनं बोलून दाखवली.


जे गौतम गंभीरला कळतं, जे चेन्नई सुपर किंग्सच्या सर्वसामान्यही चाहत्यांना समजतं, ते कॅप्टन कूल धोनीला उमगणार नाही, असं कसं होऊ शकतं? का आयपीएलच नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही एक कर्णधार आणि एक फलंदाज म्हणून धोनीनं स्वत:चं एक स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळं त्याला स्वत:विषयी काय वाटतं, हेही समजून घ्यायला हवं.


चेन्नई सुपर किंग्सचा क्वारंटाईन कालावधी अचानक वाढल्यामुळं आपल्याला आयपीएलची पुरेशी तयारी करता आलेली नाही, असा धोनीचा दावा आहे. चेन्नईच्या फौजेचे 13 सदस्य एकाचवेळी कोरोनानं आजारी होते. त्यामुळं युएईत चेन्नईचा क्वारंटीन कालावधी वाढवण्यात आला होता. त्याकडे बोट दाखवून धोनी म्हणाला की, आधीच मी दीर्घकाळ फलंदाजी केली नव्हती. त्यात 14 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीनं आणखी पंचाईत केली.


धोनीनं आपल्या बचावासाठी मांडलेला हा मुद्दा नक्कीच योग्य असू शकतो. एक फलंदाज म्हणून धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला भर आपण 2019 सालच्या विश्वचषकात ओसरलेला पाहिला. त्याचं चाळीशीकडे झुकलेलं वय आणि वयपरत्वे मंदावलेल्या हालचाली त्याच्या फलंदाजीत निर्माण झालेल्या मर्यादा स्पष्ट करत होत्या. 2011 सालच्या फायनलमध्ये षटकार ठोकून टीम इंडियाला विश्वचषक जिंकून देणारा कॅप्टन कूल इंग्लंडमधल्या विश्वचषकात त्याच्या हिमतीवर आणि त्याच्या मर्जीनुसार मोठे फटके खेळू शकत नव्हता. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलच्या दर्जात जमीनअस्मानाचा फरक आहे. धोनीच्या क्लासचा फलंदाज आयपीएलच्या रणांगणात फार काळ उपाशी राहू शकत नाही. आयपीएलमधल्या गोलंदाजांना तो त्याच्या मर्जीनुसार कधीही ठोकून काढू शकतो.


त्यामुळं, इट्स मे बी मॅटर ऑफ टाईम. कर्णधार धोनीनं फलंदाज धोनीवर पुन्हा विश्वास दाखवायचा अवकाश आहे की, चेन्नई सुपर किंग्सच्या यंदाच्या आयपीएलमधल्या कहाणीला सुपर कलाटणी मिळू शकते.


विजय साळवी यांचे अन्य ब्लॉग :