BLOG: भाषा पैशाचीच्या या भागात आपण बघणार आहोत की, आपण कर्ज घेतलं असेल तर ते कसं प्रायोरटाईज म्हणजेच त्याला प्राथमिकता कशी द्यावी, जेणेकरून आपल्या पैशांचा विनियोग उत्तम पद्धतीने होईल. हे करणं सगळ्यात महत्वाचं असतं. आठवतं, शाळेत असताना गणितात एक प्रश्न असायचा, एका टाक्याला छिद्र असेल आणि त्या टाक्यात ताशी इतक्या वेगाने पाणी टाकले आणि इतक्या वेगाने त्या टाक्यातून गळून गेले तर विशिष्ट घनफळ असलेली टाकी किती वेळात भरेल. मला अशा गणिताचे कुतूहल लहानपणापासूनच आहे. माझ्या बालमनाला प्रश्न पडायचा की, ज्या टाकीला छिद्र आहे मुळात त्या टाकीत पाणी भरायचेच कशाला? भरायचेच झाले तर आधी ते छिद्र बुजवावं, गळती थांबवावी आणि मग पाणी भरावं जेणे करून नासाडी कमी होईल. गणिताच्या तासाला असले काही विचार चालायचे नाही म्हणून गणित कधी सुटलं नाही, कारण त्यामागचे कारणच मनात घर करायचे की आधी छिद्र बुजवायचं आहे. आज नेमकं हेच समजून घेणार आहोत.
बहुतांश वेळी घेतलेलं कर्ज फेडणं हा दीर्घकालीन कार्यक्रम असल्यानं नेमकं कशावर लक्ष केंद्रित करायचं याचं उत्तर शोधण्यात जातो. एकतर पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड किंवा आजकाल नवनव्या अॅपच्या माध्यमातून लोक कर्ज घेतात. ते घेणं इतकं सोपं असतं की परतफेडीच्या नियमावलीकडे सपशेल दुर्लक्ष होतं किंवा केलं जातं. मग व्याजाचे भयंकर दर, डिफॉल्ट केल्यास भयानक दंड अशा विचित्र अटी असतात. बरेचदा विशिष्ट कर्ज परतफेड करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येतं आणि बाकीच्यांकडे दुर्लक्ष होतं.
हप्ते भरायचं टाळून कर्जाची मुदत वाढवणं हे सर्वात घातक असतं. यामुळे व्याजावर व्याज चढतं आणि मग त्यावर लागणारा दंड आणि अन्य आकारणी इतकं भयानक असतं की आपल्याला वाटत असतं की आपण हे संपवू, पण कर्जाचा डोंगर वाढतच जातो. कर्ज परतफेड नेमकी कशी आटोक्यात ठेवायची हे ठरवण्यासाठी एक वेगळी नजर लागते. अन्यथा आपण एका अशा दुष्टचक्रात फसण्याची शक्यता असते की ज्यातून बाहेर येणं कठीण होऊन बसतं.
'भाषा पैशाची', म्युच्युअल फंड्स, शेअर बाजारातील गुंतवणूक आणि त्याचे फायदे
मग काय उपाय करायला हवे?
सर्वात आधी आपलं उत्पन्न, घेतलेले कर्ज, भरावयाचे हप्ते आणि महिन्याचा खर्च हा एका कागदावर लिहून काढावा. कर्ज लिहिणं ही पण एक कलाकारीच आहे. उदाहरण म्हणून खाली दिलेल्यानुसार, एक तक्ता आपण बनवू शकता.
अनु क्र | कर्जाची रक्कम | कर्ज घेतल्याची तारीख | कर्जाची पद्धत | व्याज दर | कर्जाची मुदत | मासिक हप्ता | किती शिल्लक |
1 | 100000 | 1 जाने 2023 | पर्सनल | 10.50% | 5 वर्षे | 2150 | 54 महिने |
2 | 1000000 | 15 मार्च 2022 | वाहन कर्ज | 9.00% | 7 वर्षे | 16090 | 68 महिने |
यासोबतच दैनंदिन-मासिक खर्च आणि उत्पन्न याचाही तक्ता तयार असावा. या तक्त्यानुसार, खर्च कमी करता येतो का? किंवा उत्पन्न वाढवता येते का? याकडे आधी लक्ष दिले पाहिजे. तुम्ही नोकरीत असाल तर उत्पन्न वाढविणे आपल्या थेट हातात नसतं पण खर्च नक्कीच कमी करता येतं, ते कसं करू शकतो आणि कर्जाची परतफेड लवकर करून कसं कर्ज संपवू शकतो याचाही विचार करायला हवा.
BLOG: भाषा पैशाची : टर्म इन्श्युरन्स म्हणजे नेमके काय?
जास्त व्याज दर असलेले कर्ज त्वरित संपवायला हवे
जास्त व्याजदराचं कर्ज हे दैनंदिन जीवनात एक आर्थिक ओझं तयार करतात. बहुतांशवेळा आपण कर्जाच्या व्याजदराकडे डोळेझाक करुन किंवा त्याकडे दुर्लक्ष करून आपली प्राथमिकता ठरवतो. उदाहरणार्थ हाय एपीआर म्हणजे मोठे अॅन्युअल पर्सेंटेज रेट, अर्थात जास्त कर्जाचे दर आणि दुसरं म्हणजे क्रेडिट कार्ड ज्यांची मुळात प्रणाली "बाय नाऊ पे लॅटर" (बीएनपीएल) अशी असते. जास्त व्याजाचे दर हे दीर्घावधी ज्या कर्जात अधिक घटक ठरू शकतात. अशात एक चांगली कार्यशैली बनवणे आवश्यक आहे.
आपण घेतलेल्या कर्जाचे व्याजाचे दर अनुक्रमे लिहून काढावे, ज्याचे व्याजाचे दर अधिक ते कर्ज फेडण्यास प्राधान्य द्यावं. सगळ्यात पहिलं मिनिमम म्हणजेच किमान रक्कम भरून आपल्यावरील दंड अथवा डिफॉल्ट टाळावा आणि उर्वरित रक्कम जी आपल्याकडे शिल्लक आहे त्याने कर्ज परतफेड करत असताना, मोठ्या व्याजदराचे कर्ज पहिले फेडावे आणि सामान व्याज दराचे दोन कर्ज असताही तर ज्याची मुद्दल जास्त शिल्लक ते कर्ज आधी फेडावे. या पद्धतीला "कर्ज लोट" पद्धत म्हणतात. ही एक पारंपरिक पद्धत आहे, जगभर जाणकार आणि अभ्यासक याच पद्धतीचा अवलंब करतात.
BLOG : सोन्यातील गुंतवणुकीचे पर्याय काय आहेत?
एकदा का वर नमूद केल्याप्रमाणे आपली यादी तयार झाली, किमान रक्कम जी आवश्यक आहे ती भरल्यानंतर ज्याची मुद्दल कमी शिल्लक आहे ते कर्ज सगळ्यात पहिले संपवून आपण एक एक कर्जच मुळात संपवायचे आणि मग असे करून कालांतराने एखाद दुसरेच कर्ज शिल्लक राहते आणि मग आपण ते फेडण्यास लक्ष केंद्रित करू शकतो. कर्जफेडीच्या या पद्धतीला "कर्जफेडीची स्नोबॉल पद्धत" म्हणतात.
यात महत्वाचे म्हणजे आपण कर्ज परतफेड करण्यास असमर्थ ठरलो तर काय नुकसान होईल याची माहिती कमी असल्याने बहुतांश वेळी नुकसान होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हप्ते चुकले तर आपल्या क्रेडिट रेटिंगवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. त्याचा भविष्यात कर्ज घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे क्रेडिट रेटिंगचा विचार डोक्यात ठेवणे आवश्यक. यापलीकडे दंड म्हणून जे काही अधिक भरावे लागते ते एक प्रकारे नुकसानच आहे.
BLOG: भाषा पैशाची; फायनान्शिअल प्लॅनिंग अथवा आर्थिक साक्षरता म्हणजे नेमके काय?
कर्जाचे नियोजन लावण्यास आपण असमर्थ असू किंवा कन्फ्यूज असू तर निसंदेहपणे प्रोफेशनल सल्लागाराची मदत घेणं काही गुन्हा नाही. नाही तर बरेचदा आपण आता काय कर्ज कसे फेडायचं हे सुद्धा बाहेरचे सांगतील का? त्याचे तुम्ही वेगळे पैसे घेणार का? अशी मानसिकता असते, पण कां सोनाराने टोचावे जे म्हणतात ते म्हणूनच सांगतात. प्रोफेशनल फीस देऊन एक्स्पर्ट सल्ला घेणे कधीही चांगले.
महत्वाचे काय आहे, की आपण कर्जमुक्त होणं ना की खूप काही तरी क्लिष्ट पद्धत अवलंबायची आणि त्याचा निकाल मात्र निल बेटे सन्नाटा. आपली उपाय योजना ही सुलभ असावी, त्यात सातत्य असावे आणि हे करत असताना निकाल मात्र कर्जमुक्तीनेच लागावा. तेव्हा आजच कर्जाचे नियोजन करूया, गरज पडल्यास एक्स्पर्टचा सल्ला घेऊ आणि लवकरच आपल्या आर्थिक सवयींना नियमांचा अलंकार घालून कर्जमुक्त होऊया... बघा पटतंय का ??
हा संबंधित ब्लॉग वाचा: