BLOG: आर्थिक साक्षरता ही सगळ्यात महत्वाची बाब. 2005 पासून सरकारी पेन्शन बंद झाली. म्हणजे आता कुणी सरकारी नोकरीत पण लागला तरी सुद्धा पेन्शन मिळणार नाही. त्याला पर्याय म्हणून नॅशनल पेन्शन स्कीम सुरु झाली खरी. पण हे झाले सरकारी कर्मचाऱ्यांसाठी. जे खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी करतात किंवा व्यवसाय करतात त्यांचे काय? आणि याचे उत्तर शोधायचे असेल तर ते म्हणजे सेवानिवृत्तीचे नियोजन. आपापल्या आयुष्यात भविष्याचे नियोजन करायचे असेल तर आणि भविष्यात आपण सुखरूप आणि आज सारखीच किंवा काकण भर चांगली लाईफस्टाइल जगावी असे वाटत असेल तर आज आर्थिक नियोजन करणे अनिवार्य आहे. कारण कुणी तरी म्हटलेच आहे, "इफ यू फेल टू प्लॅन, यू आर प्लॅनिंग टू फेल". मग हे जर इतके अनिवार्य आहे तर त्याची सुरुवात करायची कुठून हे आपण क्रमशः बघणार आहोत.  


'जान है तो जहान है' असं म्हटलं जातं. त्यामुळे सगळ्यात पहिला आपला आणि आपल्या परिवारासाठी हेल्थ इंश्युरन्स घ्यायचा. आपण कोविडच्या वेळी बघतले की गोष्टी आपल्या विचारांच्या पलीकडे गेल्या होत्या. त्यामुळे सगळ्यात पहिला हेल्थ इंश्युरन्स घेण्याचा निर्णय घ्यायचा. कुठला हेल्थ इंश्युरन्स घ्यायचा?  सरकारी काही कंपन्या आहेत, तसेच काही खाजगी कंपन्या आहेत. या इंश्युरन्स विषयात सगळ्यात महत्वाचे असते ते म्हणजे मिळणारी सर्व्हिस. काही गरज भासलीच म्हणजे काही आजारपण आले आणि आपल्याला या इंश्युरन्सचा वापर करायची वेळ आली तर आपल्याला योग्य वेळी मदत योग्य प्रकारे मिळालीच पाहिजे. त्यामुळे बरेचदा ऑनलाईन हे प्लॅन्स घेतले जातात, पण अनुभव असा आहे की चार पैसे जास्त मोजावे लागतात. प्रीमियम म्हणून पण एजंटच्या माध्यमातून ते केले तर सर्व्हिस साठी आपल्याला भटकावे लागत नाही आणि त्यासाठी एजंट सुद्धा योग्य प्रकारे निवडणे आवश्यक आहे.  


जसजसे वय वाढते तसे प्रीमियम काही वर्षात अधिक भरावे लागते. यात बरेचदा काही एजंट दोन तीन गोष्टी एकत्र करून प्लॅन विकण्याचा प्रयत्न करतात. पण सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे वित्तीय नियोजन करत असताना गुंतवणूक, इंश्युरन्स आणि कर बचत यांना एकत्र करण्याची गफलत करू नये.  गुंतवणूक ज्या बद्दल आपण पुढे बघणार आहोत, पण इंश्युरन्स करत असताना केवळ इंश्युरन्सच करावा. वार्षिक पाच ते दहा लाख उत्पन्न असेल तर किमान पाच लाखांचा इंश्युरन्स आणि त्यावर 10 लाखाचा फॅमिली फ्लोटर इन्शुरन्स हा परिवाराचा असावा. 


तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल वित्तीय नियोजनाच्या चर्चेत इंश्युरन्सचा विषय कुठून आला. पण वित्तीय नियोजनात सगळ्यात पहिले हेल्थ इंश्युरन्स आणि दुसरे म्हणजे टर्म इंश्युरन्स. टर्म इंश्युरन्सची माहिती पुढे बघू. वित्तीय नियोजनातील महत्वाची एक बाब म्हणजे की लक्ष्य निश्चित करणे. आपल्याला नियोजन कुठल्या गोष्टीचे करायचे आहे, मुलीच्या लग्नाचे की मुलांच्या शिक्षणाचे? सेवा निवृत्तीचे की वेल्थ क्रिएट करण्याचे की अजून कशाचे? लक्ष्य निश्चित झाल्याशिवाय त्यासाठीच्या उपाय योजना आखणे शक्य होत नसते. 
एक उदाहरण घेऊया, मला एक मुलगी आहे आणि तिचे वय वर्ष दोन आहे. तिच्या लग्नासाठी मला वित्तीय नियोजन करायचे आहे तर ते कसे करावे.
 
मुलीचे आजचे वय - 2
मुलीचे लग्नाचे वय - 25
किती वर्षे शिल्लक आहे ?- 23
लग्नाचा आजचा खर्च - 8,00,000
महागाई - 6 %
लग्नाचा भविष्याचा खर्च - 30,55,799


आज माझ्या मुलीचे वय जर का दोन वर्षे आहे आणि मला तिच्या लग्नासाठी नियोजन करायचे आहे तर मला तिच्या लग्नाच्या वयाचा विचार करावा लागेल. साधारण 25 वर्षे जर लग्नाचे वय आपण कन्सिडर केले तर 23 वर्ष आहेत तिच्या लग्नाला. आजच्या नुसार लग्नाचा खर्च 8 लाख रुपये पकडले तर ६ टक्के महागाईच्या दरानुसार 23 वर्षानंतर मला माझ्या मुलीचे लग्न करायचे असेल तर साधारण पणे 30 लाख रुपये खर्च येईल. सध्या चक्रवाढ व्याजाच्या दराने गणित काढून हे आकडे काढले आहे. हे एकदम तंतोतंत आकडे नसून आपण केवळ गणिताच्या मदतीने  नियोजन करण्याचा प्रयत्न करत आहोत. 


आता पुढील प्रश्न हा कि 30 लाख रुपये खर्च 23 वर्षाने येणार असेल तर आज पासून काय करावे लागेल. आपले लक्ष्य निश्चित झाले की 23 वर्षांनी 30 लाख रुपये लागणार आहे. आजपासून एक तर एकरकमी गुंतवणूक करू शकतो, किंवा दरवर्षी गुंतवणूक म्हणजेच वार्षिक गुंतवणूक करू शकतो. किंवा मासिक, प्रति आठवडा अगदी प्रतिदिवस सुद्धा गुंतवणूक करता येते. पण ती गुंतवणूक करायची कुठे आणि कशी हे आपण पुढे बघणार आहोत. 
23 वर्षांनी लागणाऱ्या 30 लाख रुपये साध्य करायचे असतील तर गुंतवणुकीचे कुठले कुठले पर्याय उपलब्ध आहे?


1] पारंपरिक बँक 
2] पोस्ट ऑफिस 
3] एलआयसी/ इंश्युरन्स कंपनी 
4] सोने 
5] रियल इस्टेट 
6] क्रिप्टो 
7] शेअर बाजार 
8] म्युचुल फंड 


आता हे बघूया की कुठल्या असेट क्लासमध्ये किती परतावा मिळेल? काय जोखीम आहे, काय अडचणी आहेत? उदाहरण म्हणून दिल्लीला जायचे निश्चित केले तर कुठले वाहन निवडता  यावर किती वेळात पोहोचू हे ठरणार असते. वेळ वाचवायचा असेल तर अधिकचे पैसे मोजून विमानाने जावे लागेल. खूप वेळ असेल तर पैसे पण कमी मोजून पण दिल्लीला पोहोचता येते. म्हणजे काय वाहन निवडता हे सगळ्यात महत्वाचे आहे. आपण रेल्वेचा प्रवास ठरवला तर मुंबईहून दिल्लीला पोहोचायला सुमारे 15 तास लागतात. त्यानुसार पुढील दिवसाचा प्लॅन ठरवला आणि नेमकी ट्रेन लेट झाली तर नियोजन चुकते. प्रवासाची तारीख, लागणार वेळ, त्यासाठी मोजावे लागणारे पैसे, काही गडबड झाल्यास काय पर्यायी व्यवस्था हे जसे नियोजन आहे तसेच सगळे नियम आर्थिक नियोजनात लागू होतात. आपले लक्ष निश्चित झाले तर वरील आठ वाहने आहेत त्यांचा कसा वापर करायचा हे त्या वाहनांची सगळी माहिती मिळाल्याशिवाय आपण ठरवू शकत नाही.
 
वरील आठ पर्यायांचा परतावा, फायदे आणि अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. 


बँकेत गुंतवणूक केल्यास साधारण सात ते आठ टक्के परतावा मिळतो, तो बदलत असतो पण सगळ्यात जमेची बाजू ही असते अधेमधे काही अडचण आली तर त्वरित पैसे उपलब्ध असतात. यात परताव्याची हमी असते. 
पोस्टाच्या गुंतवणुकीत, लॉकिंग पिरेड असतो, आणि तो मोडला तर नुकसान होण्याची शक्यता असते पण इथे सुद्धा परतावा सहा ते आठ टक्के परतवा मिळू शकतो. 


एलआयसी किव्वा ट्रेडिशनल मणी बॅक इंश्युरन्स प्लॅन चा विचार तुम्ही गुंतवणूक म्हणून केल्यास त्यात परतावा सहा ते सात टक्केच मिळतो आणि त्याचा लॉकिंग पिरेडही खूप मोठी अडचण असते. यात युनिट लिंक प्लॅन चा विचार केला तर परतावा थोडा अधिक असतो आणि जरा हे प्लॅन्स अधिक फ्लेक्सिबल सुद्धा असतात. 


सोन्यानी सरासरी 9 ते 11 टक्के परतावा हा मागील 40 वर्षात दिला असून, सोन्याचे दागिने केले तर मेकिंग चार्जेस, इम्युरिटी चा सामना करावा लागेल. एक एक ग्राम खरेदी करून दागिने ना करता नाणे किव्वा वळ घेतली तर साठवणूक आणि चोरी दोघांचे भय असते. इलेक्ट्रॉनिक रूपात सोने खाणें हा उत्तम पर्याय असू शकतो, त्यात सॉरियन स्कीम्स ह्या जरा आकर्षक सुद्धा आहे. 


रियल इस्टेट किंवा शेती घेणे हे छोट्या गुंतवणूकदारांचे काम नव्हे. इथे मोठी रक्कम गुंतवावी लागते. इंस्टालमेंटमध्ये गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध आहे पण जोखीम सुद्धा असते त्यात ते लक्षात घेतले पाहजे. यात सरासरी 10 ते 11 टक्के परतावा मिळतो. कधी कधी अगदी तीन वर्षात दामदुप्पट सुद्धा होतात. पण याची काही शाश्वती नाही. यात सगळ्यात मोठी अडचण म्हणजे अर्ध्या रात्री पैशाची गरज पडली तर वावरातील 5000 फूट जागा विकत येत नाही. एका फ्लॅट मधली एक खोली विकत येत नाही आणि एका रात्रीत गरज पडली तर व्यवहारसुद्धा होत नाही. 


क्रिप्ट चा कुणीही बाप नाही. देशात हे आपल्या रेग्युलराइज झालेले नाही. जोवर सगळे आलबेल आहे तोवर ठीक पण काही अडचण झाली तर याची जबााबदारी कुणीही घेत नाही. 


शेअर बाजार आणि म्युचुअल फंड ने मागील 40 वर्षात सरासरी 13 टक्के परतावा मिळाला आहे. यात महत्वाची बाब म्हणजे यासाठी अभ्यास आवश्यक आहे. जे जे लोक ट्रेडिंगच्या जाळ्यात अडकले ते यात बुडाले आहे. याला गुंतवणुकीचा पर्याय म्हणून ज्यांनी बघितले ते मात्र नक्कीच फायदा करून गेले आहे. म्युच्युअल फंड हा शेअर बाजाराचा फायदा करून घेण्याचे पर्यायी मार्ग. ज्यांना कुठला शेअर घ्यायचा कुठला विकायचा, कधी घ्यायचा आणि कधी विकायचे याचे ज्ञान नसते त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय आहे. आता या सर्व वाहनांचा उपयोग आपण आपल्या ध्येय पूर्तीसाठी कसा करायचा हे पुढे बघूया .ज्याची पण काही चर्चा केली बघा पटतंय का ??