मागील तीस चाळीस वर्षे भारतीय शेअर बाजारासाठी नक्कीच सुगीचे ठरले आहेत. याचे सकारात्मक पडसाद आपल्या येथील शेअर बाजारावर देखील पडले  आहे. 1980 साली इन्फोसिस किंवा विप्रोचे दहा हजार रुपयांचे शेअर्स खरेदी केले असते तर आज कोट्यधीश झाले असते. नुसतेच कोटयधीशच नाही तर साधारण पाचशे कोटी रुपयांपर्यंत  मजल मारली गेली असेल. या दोन कंपन्यांच्या शेअर्सनी टक्केवारीच्या हिशेबात, जवळपास 35% सरासरी परतावा दिला आहे. आणि मग 1985 उलटून जवळपास 40 वर्षे होत असताना आजही प्रत्येक गुंतवणूकदार हा कुठल्या ना कुठल्या इन्फोसिस आणि विप्रोच्या शोधात आपापला गुंतवणुकीचा डाव मांडत आहे. प्रत्येक  मध्यमवयीन आणि मध्यमवर्गीय गुंतवणूकदाराला कोट्यधीश व्हायचेच आहे, असे असले तरी नेमके कुठले शेअर्स विकत घ्यायचे याचा काही नेम लागत नाही. कोट्यधीश व्हायचे असेल तर दीर्घावधीला पर्याय नाही हे आधी गुंतवणूकदाराला समजणे आणि त्याने स्वीकारणे आवश्यक आहे,  सगळ्यात महत्वाचे म्हणजे दीर्घावधी म्हणजे किमान आठ ते दहा वर्षे. पुस्तकी एक वर्षापेक्षा जास्त म्हणजे दीर्घावधी असलं तरी दीर्घावधी गुंतवणुकीचा कालावधी म्हणजे फक्त एक, दोन किंवा तीन वर्षे नाही. जेव्हा जेव्हा दीर्घावधी म्हणून दोन तीन वर्षांपुरती गुंतवणूक केली जाते, तेव्हा तेव्हा गुंतवणूकदार हा धोक्यात आल्याचा इतिहास आहे. अशात आपण जेव्हा जेव्हा अशा गोष्टी वाचतो ज्यात कुणी 35% कुणी 40% कमावले तर अशा देखील बातम्या आणि उदाहरणे असतात जे समृद्धी वाढवणे तर दूर, उलट आपल्याकडे असलेली समृद्धी घेऊन जातात. असेच काही उदाहरणे आपण बघणार आहोत. 


2008 साली शेअर बाजाराने उच्चांक बघून मग मंदीचे दिवस बघितले. त्या काळी एकेकाळचा शेअर बाजारातला अमिताभ समजला जाणारा आरकॉम 800 च्या घरात ट्रेड करायचा आणि भविष्यात मोबाईलचे जग आहे,  त्यात रिलायन्स म्हणजे बिजनेस डॉमिनंट धीरूभाई अंबानींची फोटो असलेली "कर लो दुनिया मुठ्ठी मे" ही जाहिरात लक्षात घेता, आरकॉम हा ब्ल्यूचिप स्टॉक मानला जायचा,  मानला काय हा होताच ब्यूचिप स्टॉक. सामान्य गुंतवणूकदाराने हाच आपला विप्रो आणि इन्फोसिस समजून ज्याने कुणी दहा हजार रुपये त्यात टाकले असतील त्याचे काय झाले हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पुढे असे काही नियतीचे चक्र फिरले, अंबानी परिवाराची वाटणी झाली आणि अनिल अंबानींच्या नशिबात ही कंपनी आली. पुढे मुकेश अंबानी दहा वर्षे या क्षेत्रात येऊ शकणार नाहीत म्हणून करारही झाला आणि पुढे जिओ बाजारात आले आणि हा शेअर पार धुळीला मिळाला. आज या शेअरची किंमत फक्त एक रुपया 35 पैसे आहे. म्हणजे ज्यांनी दहा हजार रुपये गुंतवले होते त्याची आजची किंमत फक्त सोळा रुपये एवढीच उरली आहे. 


असेच जे पी अससोसिएटमध्ये दहा हजार रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 266 रुपये उरले असते,  सुझलॉनमध्ये दहा हजार गुंतवले असते तर आज फक्त  550 रुपये राहिले असते, असेच एचडीआयएल किंवा इतर ज्या एकेकाळी ब्ल्यूचिप गणल्या जायच्या आज त्या खरोखर धुळीला मिळाल्या आहेत. त्यामुळे नेहमीच अशी गफलत होईल असे नाही. पण नेमके शेअर शोधणे आणि गुंतवणूक करणे हे काही कोड्यापेक्षा कमी नाही. थोडक्यात प्रत्येकाने आपला विप्रो आणि इन्फोसिस शोधावा पण ते थोडं कठीणही आहे. 


मग सामान्य गुंतवणूकदाराने करायचे काय? शेअर बाजारात तुम्ही खरंच कंपनीचा योग्य यथोचीत अभ्यास करू शकत असाल तर आणि तरच तुम्ही शेअर बाजारात पैसे टाकायला हवेत आणि गुंतवणूक करायला हवी.  कारण कुठला शेअर वाढेल आणि पडेल आणि कुठल्या कंपनीचे भविष्य काय असेल हे शोधणे आणि ठरवणे कठीण जाते. म्हणूनच म्युच्युअल फंड हा एक पर्याय उत्तम समजला जातो. 


म्युच्युअल म्हणजे तुमच्या आणि आमच्या सहमतीने तयार झालेला फंड. जो आपल्या वतीने शेअर बाजारात (इक्विटी म्युच्युअल फंड) गुंतवला जातो. फायदा झाला तर सर्वांना समान हिस्स्यात वाटला जातो आणि नुकसान झालं तर ते आपल्यालाच सहन करावं लागतं.  मग तुमच्या मनात प्रश्न आला असेल की नुकसान होऊ शकते तर हे डायरेक्ट इक्विटीपेक्षा वेगळे कसे? म्युच्युअल फंडची कार्यप्रणाली अशी असते की आपण सर्वांनी मिळून एखाद्या फंडात गुंतवणूक केली तर ती गुंतवणूक मार्केट एक्स्पर्ट असलेल्या फंड मॅनेजरच्या माध्यमातून गुंतवली जाते. ते प्रोफेशनल्स असल्याने त्यांचे सातत्याने लक्ष असते आणि त्यांचा या विषयात प्रदीर्घ अभ्यास असतो. त्यामुळे जिथे आपण नेमका शेअर शोधण्यास असमर्थ ठरतो. कारण आपल्याला त्या विषयाचे ज्ञान कमी पडते, पण इथे ती जोखीम कमी जवळपास नाहीशी होते. त्यापुढे जाऊन आपल्या दहा हजार रुपयात आपण काही ठराविक शेअरच घेऊ शकतो, पण म्युच्युअल फंडात सगळ्या गुंतवणूकदारांची मिळून मोठी रक्कम जमा होत असल्याने, फंड मॅनेजर विविध संधी शोधून गुंतवणूक करतो. त्यामुळे आपल्याला डायव्हर्सिफिकेशनचा लाभ मिळतो आणि आपली जोखीम कमी होते.  याच्या पलीकडे जायचे असल्यास यात इक्विटी सोबत आपल्याला डेटमध्ये सुद्धा गुंतवणुकीच्या संधी मिळतात. आपल्या एजंटच्या मदतीने आपली नेमकी गरज ओळखून गुंतवणूक केली तर दीर्घावधीमध्ये प्रचंड नफा आणि फायदा होऊ शकतो.  आपल्याकडे तब्बल 45 म्युच्युअल फ़ंड कंपन्या आहेत आणि त्यांच्या हजारो स्कीम्स, नव्या गुंतवणूकदाराने डोळे मिटून इंडेक्स फंडात गुंतवणूक करावी आणि 12 – 15% पर्यंतचा लाभ मिळवावा. 


म्युच्युअल फंड हे थेट शेअर बाजार जरी नसले तरी शेअर बाजारावरच आधारित असतात. म्हणूनच गॅरंटी हा शब्द या क्षेत्रासाठी वर्ज्यच आहे. त्यामुळे 12% गॅरेंटीड परतावा नाही पण असे ऐतिहासिक आकडे आहेत की जे सांगतात, की दीर्घावधीमध्ये शेअर बाजाराने सरासरी 12% परतावा दिला आहे. तेव्हा एफडी पेक्षा जास्त परताव्याच्या शोधात असाल, करोडपती बनण्याचे स्वप्न बघता असाल तर इक्विटी हे सर्वोत्तम साधन तर आहेच पण त्यात म्युच्युअल फंड हे सामान्य मध्यमवयीन आणि मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांसाठी त्यापेक्षा सुरक्षित पर्याय नक्कीच आहे. तेव्हा आजच आपल्या म्युच्युअल फंड एजंटशी संपर्क करा... आणि जसे आपण चाळीशी नंतर आपले हेल्थ चेकअप करतो तसेच प्रत्येक वर्षाला आपली गुंतवणूक योग्य आहे की नाही हे आपल्या एजंटसोबत बसून चेक करून घ्यायला हवे. बघा पटतंय का?