महाराष्ट्रात गरजेपुरत्या काही गोष्टी यापूर्वीच्याच अनलॉकमध्ये सुरु करण्यात आल्या आहेत, केवळ इतर राज्यात अमुक ह्या गोष्टी चालू झाल्यात म्हणून आपल्याही राज्यात त्या चालू झाल्या पाहिजे असा अट्टाहास असता कामा नये. कारण कोरोनाचे संकट अजून टळलेले, अजूनही कोरोनाला पायबंद करण्यात अपेक्षित असे यश आलेले नाही. सणासुदीचा काळ सुरु झाला आहे. आरोग्याच्या आणीबाणीच्या काळात वैद्यकीय शास्त्राचा आधार घेऊन शिथिलता किती द्यावी याबाबत विचार करणे अपेक्षित आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था त्यामध्ये विशेषतः लोकल हा कळीचा मुद्दा आहे. राज्यातील वैद्यकीय तज्ज्ञ आणि राज्य शासनाचे मार्गदर्शक तत्वे सोशल डिस्टन्सिंग पाळा असे कायम सांगत आहे. या अशा परिस्थितीत दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या आणि मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात आरोग्य व्यस्थेच्या अनुषंगाने रोज प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्राला अनलॉक करताना देशातील इतर राज्याच्या तुलनेत वेगळा विचार करावा लागणार आहे. देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असणारे राज्य म्हणून आपली ओळख आज राष्ट्रीय पातळीवर निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणतीही घाई न करता सध्याच्या अघोरी संकटाचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे.


कोरोनाचा 'जप' करण्याच्या प्रक्रियेला सहा महिन्यापेक्षा जास्त काळ ओलांडून गेलाय, सगळेच जण आता कंटाळलेत मात्र आरोग्यच्या, जगण्याच्या संघर्षापुढे सगळ्या गोष्टी गौण ठरतात. अनेक स्तरातून अमुक या जनतेसाठी गोष्टी उघडल्या पाहिजे अशी मागणी होत आहे. कुणालाच बंदीत राहायला आवडत नाही मात्र कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराने आज संपूर्ण जगावर हे संकट ओढवलेले आहे. यापूर्वीच्या अनेक पिढ्यांनी लॉकडाउन पाहिला नव्हता, मात्र कोरोनाने सर्वाना एकाचवेळी घरात बसायला भाग पाडलेच, काही गोष्टी ह्या अपवादात्मक असतात आणि त्याचे परिणामही त्याच स्वरूपाचे असतात. राज्यात काही नागरिक सुरक्षिततेचे नियम पाळत नाही. आजही राज्यात कोरोना हा आजार आहे, हे न मानणारे महाभाग जागोजागी दिसतात, ते स्वतः नियम तर पाळत नाहीत मात्र दुसरे पाळत आहे तर ते किती मूर्ख आहे असे हिणवणारे कमी नाही. अशा बऱ्याच लोकांचा मुक्काम नंतरच्या काळात कोरोना सेंटरमध्ये घालविताना नागरिकांनी पहिला आहे. या आजाराच्या बाबतीत फाजील आत्मविश्वास बाळगू नये याची अनेक उदाहरणे देता येतील.


सध्याच्या घडीला आपल्या राज्यात 13 लाख 51 हजार 153 रुग्ण या आजराने बाधित झाले असून 35 हजार 751 नागरिक या आजराने बळी पडले आहे. तर 10 लाख 49 हजार 947 नागरिक उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत. महिन्याभरापूर्वी राज्यातील रुग्णसंख्या 7 लाख 47 हजार 995 इतकी होती तर मृताची संख्या 23 हजार 775 इतकी होती. महिन्याभरात 6 लाख 3 हजार 158 रुग्ण वाढले असून 11 हजार 976 बळी गेले आहेत. हे आकडे पुरेसे बोलके आहेत. अजूनही राज्यात आय सी यू बेड वरून संघर्ष सुरूच आहे. ऑक्सिजन टंचाई आणि महत्त्वाची औषधे मिळत नसल्याच्या तक्रारी सुरूच आहेत. राज्यातील आरोग्य व्यवस्थेला घेऊन अजून अनेक समस्या आहे हे नाकारून चालणार नाही, परिस्थिती म्हणावी इतकी आटोक्यात आलेली नाही. इतका वेळ लोकांनी सहन केले आहे आणखी थोडा वेळ आहे त्या परिस्थितीत दिवस काढणे फार अवघड नाही. एकदा चालू केलेल्या गोष्टी कोरोनाचा कहर वाढला म्हणून बंद केल्याने जास्त चीड चीड होऊन शकते त्यापेक्षा वातावरण सुरक्षित झाल्यावर सगळ्या गोष्टी उघडणे केव्हाही शहाणपणाचे ठरेल.


कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आणि मृतांचा आकडा कमी होणे सध्या काळाची गरज आहे. शासनाने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत घरोघरी तपासणी केली जात आहे. या मोहिमेअंतर्गत काही रुग्ण सापडत आहे, वेळीच त्यांच्यावर औषध उपचार करण्यात येत आहे, अनेक नागरिकांना आपण रुग्ण आहे हेच माहित नाही ते या मोहिमेअंतर्गत सापडण्याची शक्यता आहे. नागरिकांमध्ये या आजाराला घेऊन असणारी भीती या मोहिमेमुळे दूर होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी या मोहिमेत आपले योगदान दिले पाहिजे. घरो-घरी येणारी आरोग्य सेवकांना सहकार्य केले पाहिजे. ''कोरोनामुक्त महाराष्ट्र' ची संकल्पना साधण्यास राज्यातील नागरिकांचा सहभाग फार मोठा आहे. `


17 ऑक्टोबरला नवरात्र उत्सवास प्रारंभ होत आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच हा उत्सव साधेपणाने साजरा करावा अशा सूचना शासनातर्फे देण्यात आल्या आहेत. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरता 4 फूट व घरगुती देवीच्या मूर्तीची उंची 2 फुटाच्या मर्यादेत असावी. मूर्ती शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी किंवा सार्वजनिक कृत्रिम विसर्जन स्थळी करण्यात यावे. गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत, त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यास प्राधान्य द्यावे असे सूचित करण्यात आले आहे. गर्दी टाळण्याकरिता देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट आणि फेसबुक इत्यादींद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करावी. शासनाच्या या आवाहनालाही राज्यातील जनता सकारात्मक प्रतिसाद देईल यामध्ये दुमत नाही. कारण नागरिकांमध्ये सुद्धा या आजाराला घेऊन मनात दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाच्या आजाराने मृत्यू होणाऱ्यांमध्ये केवळ वयस्कर नागरिक नसून तरुण मंडळींचा सुद्धा समावेश आहे.


ऑगस्ट 30, ला 'महाराष्ट्र राज्य वेगळं आहे !' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. सगळ्या गोष्टी हळू - हळू चालूच झाल्या पाहिजे अशीच काहीशी भावना सगळ्यांच्याच मनात आहे. परंतु ज्या गोष्टी ज्या कारणासाठी बंद केल्या आहेत. त्या कारणांचं काय? अशी कोणती पूरक परिस्थिती निर्माण झाली आहे का? त्या गोष्टी आता चालू करणे योग्य वाटत आहे. संपूर्ण देशाचा विचार केला तर काही राज्यांमध्ये अशी पूरक परिस्थिती निर्माण झाली असेलही. तेथील कोरोनाचे संकट कमी झाले आहे का याचा विचारही केला असेलच असं गृहीत धरायला हरकत नाही. मात्र कोरोनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य वेगळं आहे, येथील कोरोनाच्या आजाराची व्याप्ती, रुग्णसंख्या, या आजाराने मृत्यू झालेल्या बळीची संख्या देशातील इतर राज्याच्या तुलनेने अधिकच आहे हे येथे अधोरेखित करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने टाळेबंदीच्या शिथिलीकरणाचा चौथा टप्पा शनिवारी जाहीर केला. यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी नियम अटींसह चालू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. योगायोग म्हणजे ज्यावेळी शिथिलीकरण जाहीर केले जात होते त्या दिवसाची महाराष्ट्र राज्यातील रुग्णांची आकडेवारी या कोरोना मोसमातील 'रुग्णसंख्येचा उचांक' म्हणून नोंदली गेली. राज्यातील प्रशासन आणि आरोग्य व्यवस्था याचा मुकाबला करेल यामध्ये शंका नाही. मात्र कोरोनाचे वाढते संकट पाहता शिथिलीकरण करताना राज्याला 'आस्ते कदम' ची भूमिका घ्यावी लागणार आहे.


कोरोनाचे संकट वाढत असले तरी आपण त्याच्याशी चांगल्या पद्धतीने मुकाबला करू शकतो इतपत ज्ञान आपल्या व्यस्थेला प्राप्त झाले आहे. सहा महिन्यापूर्वीच आलेला आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी नवीन असलेला हा आजार वेळेत उपचार केला तर बरा होऊ शकतो इतका आत्मविश्वास राज्यातील आरोग्य यंत्रणेला आलेला आहे. त्यामुळे सध्या जरी आपण चांगल्या स्थितीपर्यंत पोहचलो असलो तरी आपल्याला या परिस्थितीत आणखी बदल करणं शक्य आहे, मात्र त्यासाठी काही काळ जाणे गरजेचे आहे. राज्यातील या आरोग्य संकटाने संपूर्ण आर्थिक व्यवस्थेला खीळ बसली आहे, हे वास्तव असले तरी नागरिकांसाठी सुरक्षित आरोग्यदायी वातावरण निर्माण केल्याचा आनंद केव्हाही अधिकच असणार आहे.


संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग