कोविड - 19 किंवा कोरोनाच्या नावाने नाकं मुरडत बसण्यापेक्षा सध्या कोरोनासोबत सुरु असलेल्या युद्धात आता 'गनिमी कावा' वापरून कोरोनासोबत जगून त्याला हरविण्याची रणनिती निश्चित करावी लागणार आहे. काही केल्या कोरोना आपली साथ इतक्यात सोडणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. या अशा विचित्र परिस्थितीत कोरोनासोबतचं युद्ध चालू पण ठेवायचं मात्र आपण घाबरलो नाही असं दाखवून सावध राहून नवीन जीवनशैली विकसित करून रोजचं जगणं सुरु करायची वेळ आता आपल्या सगळ्यांवर आली आहे. एका ठराविक टप्प्यापर्यंत टाळेबंदी ही नक्कीच महत्वाची होती आणि त्याचा नक्कीच आपल्याला फायदा झाला असून एप्रिल महिन्यात आपण कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. आता आणखी काही दिवस वाढवलेली टाळेबंदी संपून अर्थव्यवस्थेला गती द्यावीच लागेल.


भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा 59 हजारच्या पुढे गेला आहे. नुकतंच, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सह-सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकारा परिषदेत सांगितले की, आपल्याला कोरोना विषाणू बरोबर जगणे शिकले पाहिजे. त्यांच्या या वाक्यवरून हे सिद्ध झाले आहे की कोरोना इतक्यात काही लवकर हद्दपार होत नाही. त्यामुळे आपणच आता ह्या संकटाचा सामना युक्तीने करायची गरज आहे. युक्ती फार वेगळी किंवा मोठी नसून प्रत्येक नागरिकाने स्वतःची काळजी व्यवस्थित घेत टाळेबंदीनंतर हलून हलून आयुष्मान सुरु केले पाहिजे. 40 दिवसाचे दोन लॉकडाऊन पाहिलेले नागरिक सध्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात असून सगळ्यांनाच आपापल्या नोकरी-धंद्याची चिंता भेडसावत आहे. कोरोनाची धास्ती मनात आहेच पण सोबत प्रत्येकाला सध्या व्यवसाय-उद्योगाचे वेध लागले आहेत. शेवटी कोरोनासोबत अर्थाजन पण महत्वाचे आहे, कारण उपाशी पोटी कोरोनाचा सामना करणे शक्य नाही. कारण लॉकडाऊनचा अवलंब केलेला भरात हा एकाच देश नसून ज्या ठिकाणी कोरोनाचा कहर आहे अशा सर्वच देशांनी त्या-त्या देशात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉकडाउन जाहीर केलेला आहे.


गेले काही दिवस खूप पंडितानी आपलं कोरोनामय आयुष्यावर मत मांडलं आहे आता गरज आहे ती ह्या परिस्थितीसोबत कशा पद्धतीने जगता येईल याकरता आपल्या आयुष्यात काय बदल करावे लागतील याचा शोध घेण्याची, कारण ह्या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्याची हीच ती योग्य वेळ आहे. केंद्र आणि राज्य सरकर आप-आपल्या मार्गदर्शक सूचना देतील परंतु मनाने आपण काही गोष्टी आता स्वीकारल्या पाहिजे. एकदा का आपण एखादी गोष्ट स्वीकारली कि त्यावर उत्तर शोधणं खूप सोपे जाते. सध्या वास्तवाचं भान ठेवून नागरिकांनी सुरक्षिततेच्या अटी आणि शर्ती लक्षात घेऊन टाळेबंदीनंतरच आयुष्य कसं असेल यावर आताच विचार करणे सुरु केले पाहिजे. सामाजिक माध्यमांमुळे सध्या माहितीचा ओघ वाढला आहे, त्यात माहिती चूक कि बरोबर हा नंतरचा मुद्दा आहे. या सगळ्या प्रकारामुळे लोकं संभ्रमाअवस्थेत आहे. अशावेळी लोकांनी मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर रोग प्रतिकारक शक्ती कशी चांगली ठेवण्यासाठी नियमित सकस आहार घेण्याबरोबर रोज व्यायाम केला पाहिजे. ज्या व्यक्तींची रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे अशा व्यक्तींना कोरोनाचा प्रादुर्भाव होत नाही असे अनेक वेळा आपल्याला आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे.


डॉ. राजन वेळूकर, माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ, सांगतात की, "कोरोनासोबत जगणं ही खरंच काळाची गरज आहे. सगळ्याच प्रगतशील देशात ज्यांनी लॉकडाउनचा अवलंब केला आहे त्यांनी तो हळू हळू कमी करत व्यवसाय सुरु केले आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे कोविड -19 हा विषाणू असून तो असा तात्काळ नष्ट किंवा गायब होणार नाही. आपले वैद्यकीय तज्ज्ञ सध्या यावर योग्यपद्धतीने काम करत असून नागरिकांनी त्यांना सहकार्य केले पाहिजे. त्यांचा लढा ते त्यांच्या पद्धतीने सुरु ठेवतील. मात्र आपण या वातावरणात आपण कसे सुरक्षित राहू शकतो याचा आपण विचार करून एक स्वतःचा असं आराखडा आखून ठेवला पाहिजे. शासन योग्य वेळी नागरिकांना सूचना देईलच त्याचं पालन करून आता आयुष्य कोरोनासोबत जगायचं हे मनाशी पक्कं केले पाहिजे. आपली आरोग्य यंत्रणा कोरोनाला लवकरच हरवेल असा मला विश्वास आहे".


याचबरोबर केंद्र आणि राज्य शासनानेही लॉकडाऊन नंतर आता कोरोनासोबत जगायला शिका या धर्तीवर मोठी जनजागृती राज्यात करावी लागणार आहे. या काळात लोकांनी काय करावे किंवा काय करू नये यावर सर्व वयोगटातील आणि सर्व समाजातील घटकांबाबत विचार करून सर्वाभिमुख कॅम्पेन तयार केले पाहिजे, यावर निश्चितच शासन उपाय योजना करत असेलच. शाळेतील मुले हा तास बघायला गेला तर संवेदनशील मुद्दा. याकरिता शिक्षण विभागाने शाळेतील मुले आणि त्यांच्या पालकांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने वर्कशॉपचे आयोजन करणे गरजेचे आहे. आता आपण काही गोष्टी या मान्यच केल्या पाहिजे आणि त्यांना गृहीत धरुनच आपले दैनंदिन जीवनमान सुरु ठेवले पाहिजे. नागरिकांनी शक्यतो नवीन जीवनशैली आत्मसात करणे गरजेचं आहे. टाळेबंदीनंतर तुम्ही जेव्हा घराबाहेर पडाल त्यावेळी मास्क घालून बाहेर पडायच, सॅनिटायझरचा योग्य तो वापर करून हात स्वच्छ धुणे. विशेष म्हजे शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आणि सोशल डिस्टंनसिंगचा वापर करणे, ह्या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजे.


संपूर्ण जगाला कोरोनाने बदलून टाकले आहे. प्रत्येक जण कोरोनाच्या धास्तीने त्याच्या आयुष्यात त्यानुसार बदल करून घेत आहे. काही दिवसांपासून समाज माध्यमावर एक फोटो व्हायरल होत आहे, त्यावर एक नवीन जीवनशैलीला साजेशी अशी हिंदी भाषेत दोन वाक्य आहे ती कोणाची माहित नाही कारण त्यावर त्याचं नाव नाही. पण वाक्य असे आहे, "सिखना पडेगा अब आँखो से मुस्कुराना, क्योकीं होठो की मुस्कान तो मास्क ने छुपा ली.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग