BLOG : आय ॲम कुब्रिकन
BLOG : हॉलीवूड दिग्दर्शक स्टॅलनी कुब्रिकच्या 'स्पार्टाकस' (1956) सिनेमातला एक प्रसंग. उठाव करणाऱ्या गुलामांना रोमन सैन्यानं जेरबंद केलं आहे. हा उठाव स्पार्टाकसच्या नेतृत्त्वाखाली झाला. पकडलेल्या गुलाम सैनिकांमध्ये तो ही आहे. रोमन सैन्यातले अधिकारी त्याला शोधत आहेत. हे अधिकारी त्याला चेहऱ्यानं ओळखत नाहीत. ते विचारतात "हु इज स्पार्टाकस?” काही काळ शांतता... धमकावण्याच्या सुरात पुन्हा प्रश्न विचारला जातो, "हु इज स्पार्टाकस?” चिडीचुप...शांतता.... रोमन अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा राग वाढत चाललाय, त्याचबरोबर त्याची अस्वस्थताही. मग गर्दीतला एक गुलाम उठतो आणि म्हणतो “आय ॲम स्पार्टाकस”.. मग दुसरा उठतो, तोही म्हणतो “‘आय ॲम स्पार्टाकस’.” मग तिसरा... चौथा... पाचवा... असं एक-एक करत सर्व गुलाम सैन्यच उभं राहतं. क्रुर रोमन साम्राज्याविरोधात गुलामांनी केलेला हा शेवटचा एल्गार असतो. रोम सैन्याचा सामना करताना यातला प्रत्येकजण 'स्पार्टाकस' झालाय. लेखक हॉवर्ड फास्टच्या कादंबरीतला 'स्पार्टाकस' भव्यदिव्य सिनेरामा प्रोजेक्शन माध्यमातून पडद्यावर आला. अंधारात बसलेल्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव तोवर स्पार्टाकसनं घेतलेला असतो. तो या बिलंदर नायकाच्या प्रेमात पडलेला असतो. अगदी भारावुन गेलेला असतो. मग गुलाम सैन्याप्रमाणेच थिएटरच्या अंधारातूनच एक एक आरोळी यायला लागायची. “आय ॲम स्पार्टाकस’... ‘आय ॲम स्पार्टाकस’...” हाच 'कुब्रिक इफेक्ट' होता. पुढे त्याला 'कुब्रिकन' असं अनोखं नाव देण्यात आलं. अमेरिकन दिग्दर्शक स्टॅनली कुब्रिकचे सिनेमे पाहिल्यानंतर हे असंच होतं. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत स्टॅनलीनं फक्त तेरा सिनेमे बनवले. हे तेराच्या तेरा सिनेमे ज्यांनी पाहिले, त्यांना कुब्रिकनची बाधा झाली. होय! बाधा हाच शब्द इथं योग्य आहे. कुब्रिकचे सिनेमे पाहताना फ्रेम अन फ्रेम, त्यातलं प्रत्येक दृश्य, डायलॉग, रिव्हर्स ट्रॅकींग कॅमेरा आणि झिंग आणणारं संगीत याची बाधा होतेच होते. ते सिनेमे सतत तुमच्या मेंदूत सुरुच राहतात. जगभरात 'आय ॲम कुब्रिकन' असं म्हणणाऱ्या प्रेक्षकांचा एक पंथच तयार झाला आहे. 1999 ला कुब्रिकचं निधन झालं. पण त्यानं मागे जो सिनेमांचा खजिना ठेवलाय तो कितीही लुटला तरी कमीच होत नाही. दिवसेंदिवस हा खजिना शोधणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढत जात आहे. त्याच्यातल्या फ्रेम्समधून रोज नव नवीन अर्थ शोधले जात आहेत.
स्टॅनली कुब्रिक उर्फ 'स्टॅन' उत्तम फोटोग्राफर होता. पण फोटोग्राफीच्या कुठल्याही वर्गात तो गेला नाही. जे शिकला ते अनुभवातून. जेव्हा तो सिनेमा दिग्दर्शनाकडे वळला तेव्हा ही अनुभवातूनच शिकत गेला. वयाच्या एकोणतीसाव्यावर्षी स्टॅनलीच्या नावावर चार सिनेमे होते. फ्रेन्च न्यू वेव्हची मुहुर्तमेढ रचणारे फ्रान्सिस्को ट्रुफो आणि एलन रॅसन या दिग्दर्शकांची सुरुवात ही डॉक्यूमेंट्रीपासून झाली. त्यानंतर पाहणं, चर्चा करणं आणि सिनेमावर प्रचंड वाचणं अशा मार्गानं त्यांनी सिनेमाची कास धरली. स्टॅनलीही याच पंथातला आहे. त्याची जातकुळीही तशीच. प्रयोगशील आणि थेट. 1960 पर्यंत दोन डॉक्यूमेंट्री आणि चार सिनेमे केलेला कुब्रिक ‘पार्थ ऑफ ग्लोरी’नंतर खऱ्या अर्थानं हॉलीवूडवर राज्य करू लागला. फियर एन्ड डिजायर (1953) आणि किलर्स किस (1955) या सुरुवातीच्या सिनेमांमधून कुब्रिकनं आपलं फोटोग्राफीक टॅलेन्ट दाखवलं. तांत्रिकदृष्या ही छाप पाडली. एका कॅरेक्टर्सचं एका सिनेमातून दुसऱ्या सिनेमात होणारा प्रवास ही कुब्रिकची स्टाईल ही तेव्हापासूनचीच. 'द किलींग' (1956) या सिनेमातून टाईम एऩ्ड स्पेसची सांगड घालण्याची हातोटी त्यानं दाखवून दिली. 'पाथ ऑफ ग्लोरी'नं (1957) पडद्यावर लार्जर दॅन लाईफ चित्र उभारण्याची किमया केली. स्वत: स्टॅनली पहिल्या ‘फियर ॲन्ड डिजायर’ आणि ‘किलर्स किस’ला अमेच्युअर फिल्मस म्हणतो. नंतरच्या दोन्ही सिनेमातून आपण खऱ्या अर्थानं घडलो असं सांगतो. त्यानंतरच्या नऊच्या नऊ फिल्म्सनं सिनेमाचा जो इतिहास घडवला तो अजूनही अभ्यासला जातोय. स्टॅनलीनं नेहमीच साहित्यावर सिनेमा बनवले. "एखादं पुस्तक लिहिताना विचार आणि कल्पनाशक्तीचा वापर होतो. जर एखाद्या गोष्टीचा विचार केला जातो, त्यावर लिहिलं जाऊ शकतं तर मग त्यावर सिनेमाही करता आलाच पाहिजे.” स्टॅनली या मताचा होता.
ब्लादीमीर नाबोकोवची वादग्रस्त 'लोलीता'(1962) असो, एन्थनी बर्गीसचा अल्ट्रा व्हायलन्स 'अ क्लॉकवर्क ऑरेन्ज'(1971) असो, विलियम्स थॅकरेंचा भव्यदिव्य 'बॅरी लिंडन (1975)' असो किंवा मग जगातला सर्वोकृष्ट विडंबनात्मक सिनेमा म्हणून नावाजलेला 'डॉक्टर स्ट्रेंजलव्ह (1964)' असो हे सर्व सिनेमे कुब्रिकन इफ्टेक्टची बाधा करतात. '2001 ए स्पेस ओडीसी (1968)' अतंराळाची खरी सफर घडवतो. 'द शायनिंग (1980)' चा थ्रील काळजाचा ठोका चुकवतो. 'फुल मेटल जॅकेट (1987)' अमेरिकेच्या व्हिएतनाम धोरणाची पिसं काढतो आणि 'आईज वाईट शट (1999)' पती-पत्नीचे नाजूक संबंध आणि त्यांच्यातली व्यभिचाराची भावना अशी आव्हानात्मक आघाडी पूर्ण करत अखेरचा मास्टरस्ट्रोक ठरतो. जे स्टॅनली कुब्रिकचे सिनेमे पाहतात त्यांना कुबरीकन इफेक्टची बाधा होते. अगदी कायमची आणि मग तो अभिमानानं घोषीत करतो, “आय ॲम कुब्रिकन” मी ही असाच करोडो कुब्रिकन पैकी एक आहे.
स्टॅनली कुबरीकवर पुस्तक लिहिण्याची कल्पना 2011 सालची. माझा मित्र मनीष आंजर्लेकरने माझ्या डोक्यात टाकलेली. स्टॅनली कुब्रिकचे सिनेमे पाहिलेले होते. पण ते त्याने कसे बनवले याचा रिसर्च सुरु झाला. सुरुवातीच्या रिसर्चसाठी हवं असलेलं जॉन बॅक्स्टरचं 'स्टॅनली कुब्रिक – अन ऑफिशियल बायोग्राफी' आणि पॉल डनकनचं 'स्टॅनली कुब्रिक: व्हिज्युअल पोएट (1928-1999)' ही दोन्ही पुस्तक ही मनीष आणि अजय शंकर या अभिनेता मित्रानं मागवून दिली. यानंतर कुब्रिक संदर्भात जे काही मिळेल ते वाचण्याचा प्रयत्न केला. त्यातून हे पुस्तक आकाराला आलं. पुस्तकाचा पहिला ड्राफ्ट 2013 लाच लिहून पूर्ण झाला होता. जसजसं कुब्रिकच्या जगात शिरलो, तसतसे नवीन संदर्भ मिळू लागले. नवीन माहिती मिळत गेली. कुबरीकचा अभ्यास करताना सिनेमा क्षेत्राचा इतिहास समजतो. स्टुडिओ सिस्टम, स्टार सिस्टम, युरोपियन न्यू वेव्ह, ते ज्युरासिक पार्कच्या व्हर्च्युअल सिनेमाच्या उदयापर्यंतचा सर्व काळ समजतो. त्या काळात हॉलीवूड, जागतिक सिनेमा आणि साहित्याच्या क्षेत्रात नक्की काय घडलं हे समजतं. शिवाय कुब्रिकचा सिनेमा तुम्हाला प्रेक्षक म्हणून परिपूर्ण बनवतो. हेच कुब्रिक इफेक्टनं साधता येतं. ही कुब्रिकची बायोग्राफी बिलकुल नाही. तो दिग्दर्शक म्हणून कसा घडला आणि त्यानं आपला सिनेमा कसा घडवला यावरचं हे पुस्तक आहे. या पुस्तकासाठी अनेकांनी मदत केली. कुब्रिक अलिप्त कायम राहायचा. त्याचा सिनेमा मराठी वाचकांसाठी नवा नसला तरी त्याच्या निर्मितीचे अनेक संदर्भ नवीन होते. मी कुब्रिकचा फॅन आहे, पण वाचणारा असेलच याची खात्री होती. त्यामुळं सुरुवातीच्या काळात यातले अनेक भाग मित्र-मैत्रिणींना पाठवले.
ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर सर मी कुब्रिकवर पुस्तक लिहतोय, असं सांगितल्यावर जास्तच एक्साईट झाले. त्यांनी पुस्तक वाचल्यावर त्यावर प्रस्तावना लिहिण्याचं मान्य केलं. अशोक राणे सरांमुळं मला सिनेमा बघण्याची नवीन दृष्टी मिळाली होती. मुंबई माफिया आणि त्यावरचे सिनेमा या माझ्या पीएचडीच्या विषयासंदर्भात त्यांचीशी भेट झाली होती. सिनेमा पाहणाऱ्या या माणसानं माझ्या एकूणच करीयरला कलाटणी दिलीय. त्यांनी पुस्तक वाचल्यानंतर त्यात काही बदल सुचवले. शिवाय पुस्तकाचं फॉरवर्ड लिहायला ते तयार झाले. या सर्व प्रक्रियेत 2020 उजाडलं होतं.
गेली कित्येक वर्षे या कुब्रिकला उराशी बाळगुन मी फिरत होतो. संदीप चव्हाण या मित्रानं कुब्रिकचं हे पुस्तक छापण्यासाठी पाठपुरावा केला. 2013 ते 2020 या कालावधीत मी जवळपास आठ नोकऱ्या बदलल्या. सायकलिकल बेरोजगारीच्या फेऱ्यात अडकलेला असताना कुब्रिकचा परफेक्शनिस्टपणा कामी येत होता. बेरोजगारीच्या या दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल्ससाठी संदीपमुंळं दोनदा युरोपवारी झाली. सिनेमाचं वेड आणि आयाम वाढत गेला. अख्खा युरोप पालथा घालत असताना असंख्य कुब्रिकन भेटले. त्यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या.
माझ्या आयुष्यात कुब्रिक आला आणि फिल्म फकीराच्या वाटचालीची सुरुवात झाली. ही वाटचाल अशीच पुढे सुरू राहणार आहे. यात शंका नाही. यासाठी कुब्रिकच कामी येईल याचं भान आहे.