BLOG | नगरसेवक होताना...

येतं वर्ष हे नगरपालिकेच्या निवडणुकांचं आहे. आसपासच्या वातावरणातदेखील हे बदल दिसून येत आहेत. या नगरपालिकांच्या निवडणुकांच्या वेळी मला एक प्रसंग हमखास आठवतो. मी पाचवीत असताना शाळेच्या वक्तृत्व स्पर्धेत 'माझा आवडता नेता' या विषयावर भाषण केलं होतं. त्या भाषणात माझा आवडता नेता म्हणून मी अण्णा हजारे यांची निवड केली होती. नेहमी माझा आवडता नेता म्हटलं की महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सावरकर अशा काही ठरावीक नेत्यांचीच निवड होताना आपण पाहतो. पण, मी अण्णांना निवडलं; कारण अण्णा खरंच त्या वेळी जणू काही सुपरस्टारच झाले होते. अण्णांनी तेव्हा 'जन लोकपाल विधेयका'साठी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत तब्बल तेरा दिवस उपोषण केलं होतं. या तेरा दिवसांत देशातील अनेक लोक त्यांना विविध मार्गांनी पाठिंबा देत होते.
शाळेतील त्या भाषणात मी अण्णांचं एक वाक्य म्हटलं होतं, ''नगरसेवक म्हणजे नगराचा सेवक. तुम्ही नगराचे सेवक आहात आणि जनता तुमची मालक आहे; पण, तुम्हीच मालक असल्यासारखे वागत आहात. हे चूक आहे. अण्णा जेव्हा असे म्हणतात तेव्हा त्यांच्या हिमतीची दाद द्यावीशी वाटते. सर्व लोक गूपचूप सगळं सहन करीत असताना अण्णा त्याविरोधात बोलतात. केवळ बोलतच नाहीत तर त्यासाठी आवश्यक कायदे करायला त्या सत्ताधाऱ्यांनाच भाग पाडतात."
येत्या वर्षात नगरपालिकांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागतील. सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवक पदांसाठी पुन्हा तेच तेच प्रयोग करू लागतील. मला आठवतंय नगरसेवक या पदाला पूर्वी मान होता, प्रतिष्ठा होती. आदराने, सन्मानपूर्वक नगरसेवकांना बोलावलंही जायचं. पण, गेल्या काही वर्षांत 'नगरसेवक' हा शब्द वाईट अर्थाने म्हटला जातोय की काय? अशी शंका यावी इतकं राजकीय वातावरण गढूळ झालंय.
गेल्या काही दिवसांत नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधींची व्याख्याच बदलली आहे असं मला वाटतं. एखाद्या पक्षाचं तिकीट मिळवायचं आणि तो पक्षदेखील ती व्यक्ती आपल्या पक्षासोबत, प्रभागासोबत किती प्रामाणिक आहे ते न तपासता त्याला तिकीट देतो (विकतो). त्याचं शिक्षण किती झालंय तेदेखील बघितलं जात नाही. आपल्या देशात तर लेडीज वॉर्ड असेल तर चक्क अशिक्षित, कुठलीही डिग्री नसलेल्या पत्नीलाच तो पती नगरसेवक पदासाठी उभं करतो. आणि म्हणूनच मला या तमाम लोकप्रतिनिधींना सांगायचंय यंदा निवडणुकीला उभं राहताना भविष्याचा आणि समाजहिताचा विचार करावा.
सध्या माझ्या परिसरात सत्ताधारी आणि विरोधकांत एक वेगळाच सामना रंगलाय. पण, या सामन्याचा फायदा मात्र माझ्यासारख्या अनेक नागरिकांना होतोय... नालेसफाई, अनेक सोसाट्यांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरणाचं कामं जोरात सुरू आहेत. या तमाम नेतेमंडळींनी गांभीर्याने शहराच्या भविष्यासाठी, भावी पिढीच्या हितासाठी दूरदृष्टी ठेवून काही धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत.
काही नगरसेवक आपल्या प्रभागातील समस्यांचा अभ्यास करून त्याचा पाठपुरावा करतात; तर काही निवडून गेल्याचा फायदा उठवत पाच वर्षांत जास्तीतजास्त कमाई कशी करता येईल याचाच अधिक विचार करतात. माझ्या संकल्पनेतला नगरसेवक हा सामान्यांचे प्रश्न सोडवणारा तर हवाच त्याचप्रमाणे ते प्रश्न निर्माण होऊ नयेत याचा विचार करणारा असावा. नगरसेवकाला नगरसेवकाची नेमकी कर्तव्ये काय आहेत याची जाणीव असावी, भविष्याचं हित बघणारा, दूरदृष्टी ठेवणारा, धोरणात्मक निर्णय घेणारा असावा. मला नेहमी प्रश्न पडतो - नगरसेवकाने समाजकारण करावे की राजकारण? राजकारण हे व्यवस्थेचं मूलभूत अंग आहे असं म्हटलं जातं. पण, नगरसेवक हा आपल्या विभागातील नागरी समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी महापालिकेत पाठवलेला लोकसेवक असतो. ही नगरसेवक मंडळी या संकल्पनेला खरोखरच पात्र ठरतात का?
आता पुन्हा निवडणुकांचे वारे वाहू लागतील, पुन्हा प्रचाराला सुरुवात होईल, पुन्हा घोषणाबाजी सुरू होईल, पाच वर्षांनंतर लोकप्रतिनिधींचं जनतेच्या समस्येकडे लक्ष जाईल. त्या समस्या ते कदाचित सोडवतील देखील. पुन्हा जनतेच्या पाया पडू लागतील आणि पुन्हा सुरू होईल... मतदार बंधू - भगिनींनो, प्रभाग क्रमांक अमुकमधील, अमुक पक्षातील स्थानिक लोकप्रिय अधिकृत उमेदवार यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा. आपली निशाणी आहे अमुक-अमुक, अमुक दिवशी या निशाणीसमोरील बटन दाबून अमुक यांनाच विजयी करा. आपली निशाणी आहे अमुक अमुक. लक्षात ठेवा याच निशाणीसमोरील बटन दाबून अमुक पक्षाच्या अधिकृत कार्यक्षम उमेदवार यांच्याच गळ्यात विजयाची माळ घाला. तर मग ताई माई अक्का विचार करा पक्का आणि अमुकवर मारा शिक्का!

























