Bornhan : मकर संक्रांतीच्या काळात लहान मुलांना बोरन्हाण का घालतात? यामागील कारण जाणून घ्या
Bornhan During Makar Sankranti: यंदा 15 जानेवारी रोजी मकर संक्रांत झाली असून 16 फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे, या काळात पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचं बोरन्हाण केलं जातं, याचं महत्त्व जाणून घ्या.
Bornahan Importance in Marathi : हिंदू धर्मात मकर संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. यंदा 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांत साजरी झाली आणि 16 फेब्रुवारीला रथसप्तमी आहे. मकर संक्रांत (Makar Sankranti) ते रथसप्तमीच्या काळात तान्ह्या बाळापासून ते पाच वर्षांच्या मुलांना बोरन्हाण घातलं जातं. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. आता हे बोरन्हण का घातलं जातं आणि त्याची तयारी कशी केली जाते? हे जाणून घेऊया.
बोरन्हाण का घालतात? (Why to celebrate Borhnhan?)
मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिला संक्रांतीला किंवा मूल पाच वर्षांचं होईपर्यंत येणाऱ्या एखाद्या संक्रांतीला लहान मुलांना बोरन्हाण घातलं जातं. शिशूसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरन्हाण घालण्यात येतं. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरन्हाण घालण्याची परंपरा आहे, असं म्हटलं जातं.
बोरन्हाणसंदर्भात अशीही एक आख्यायिका आहे की, पूर्वी करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये, यासाठी सर्वात आधी हे कृष्णांवर केलं गेलं आणि त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरन्हाण केलं जातं.
तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर, या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतुची बाधा होऊ नये म्हणून देखील बोरन्हाण केलं जातं. या काळात मिळणारी फळं मुलांनी खावी, खाऊ मुलांनी खावा म्हणूनही त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे खाऊ वेचून खाण्याची संधी दिली जाते.
बोरन्हाण कसं घालतात? (How to celebrate Borhnhan?)
बोरन्हाण करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात. पाटावर बसवून त्यांचं औक्षण करतात. आजूबाजूच्या लहान मुलांना घरी बोलावतात. मग घरातील बाळाच्या डोक्यावरुन मुरमुरे, बत्तासे, तिळाच्या रेवड्या, बिस्कीट, गोळ्या, बोरं, उसाचे तुकडे असे सर्व पदार्थ एकत्र करून टाकले जातात. यावेळी उपस्थित असलेली लहान मुलं हा खाऊ गोळा करुन खातात, अशा प्रकारे बोरन्हाण घातलं जातं.
बोरन्हाण कधी करावं? (When to celebrate Borhnhan?)
मकर संक्रांतीपासून ते साधरणत: रथसप्तमीपर्यंतच्या दिवशीपर्यंत मधल्या काळात कधीही बोरन्हाण करु शकतो. यंदा 15 जानेवारी ते 16 फेब्रुवारी 2024 या काळात बोरन्हाण करता येईल. या वेळी अनेक खेळ खेळून मुलांच्या बोरन्हाण्याचा कार्यक्रम पार पडला जातो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: