Vitthal Mandir Darshan : कार्तिकी यात्रेत टीसीएस कंपनी विठ्ठलाचे टोकन दर्शन सुरु करणार, भाविकांचा वेळ वाचणार; मंदिर समितीचा मोठा निर्णय
Vitthal Mandir Darshan : विठ्ठलाच्या दर्शनासाटी आता टीसीएस कंपनीकडून टोकन पद्धत सुरु करण्यात येणार आहे.
Vitthal Mandir Darshan, पंढरपूर : कार्तिकी यात्रेत सर्वसामान्य भाविकांना झटपट दर्शन देण्यासाठी टोकन दर्शन पद्धत सुरू होणार आहे. टीसीएस कंपनी प्रायोगिक तत्त्वावर विठ्ठलाची टोकन दर्शन व्यवस्था करणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. याशिवाय पंढरपूर आणि नऊ संतांच्या नगरीतून एक धार्मिक रेडिओ वाहिनी सुरू करण्याच्या निर्णयालाही मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच विठ्ठल मंदिराच्या वतीने आध्यात्मिक रेडिओ स्टेशन सुरू होणार आहे. आज झालेल्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत.
राम मंदिराच्या दर्शन व्यवस्थेप्रमाणे विठ्ठल मंदिरातही टोकन दर्शन व्यवस्था
कार्तिकी एकादशी 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्या निमित्ताने 4 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या काळात श्री विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन सुरू राहणार आहे. यंदाच्या कार्तिकी यात्रेत आयोध्या येथील राम मंदिराच्या दर्शन व्यवस्थेप्रमाणे विठ्ठल मंदिरातही टोकन दर्शन व्यवस्था सुरू होणार आहे. यामुळे विठुरायाची लांबच लांब दर्शन रांग आता इतिहास जमा होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या व्यवस्थेसाठी मंदिराला निधी देत चार मजली दर्शन मंडप बांधण्याच्या कामास हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे आता देशभरातील लाखो भाविकांना विठुरायाचे सुलभ व झटपट दर्शन होणे शक्य होणार आहे.
अध्यात्मिक रेडिओ वाहिनी पंढरपूर मधून सुरू करण्याचा निर्णय
कार्तिक एकादशी काळात TCS कंपनी कडून प्रायोगिक तत्त्वावर टोकन दर्शन सुविधा देण्याचा प्रयत्न मंदिर समिती करत आहे. तिरुपती, अयोध्या अशा इतर टोकन दर्शन सुविधा ठिकाणी टीसीएस कंपनीने सॉफ्टवेअर तयार केले आहे. तशीच व्यवस्था पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी निर्माण होत आहे. आजच्या बैठकीत पंढरपूर आणि प्रमुख सात संताच्या मूळ गावी अध्यात्मिक रेडिओ वाहिनी पंढरपूर मधून सुरू करण्याचा निर्णय ही घेण्यात आलाय. यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. याबाबतचा ठराव आज मंदिरे समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे रेडिओच्या माध्यमातून संतांच्या नगरीत होणारे भजन कीर्तन प्रवचन असे आध्यात्मिक कार्यक्रम या नवीन रेडिओ वाहिनीवरून देशभरातील विठ्ठल भक्तांना ऐकायला मिळणार असल्याचेही औसेकर यांनी सांगितले.
इतर महत्त्त्वाच्या बातम्या