Devvrat Mahesh Rekhe : अहिल्यानगरचा विक्रमादित्य देवव्रत! 50 दिवसांत 2000 वेदमंत्रांचं 'दण्डक्रम पारायण'; देवव्रत महेश रेखे सर्वात तरुण वेदमूर्ती
Devvrat Mahesh Rekhe : काशीमध्ये मागील 50 दिवस चाललेल्या दण्डक्रम वेद पारायणाचा भव्य समारोप झाला. वेदांच्या मध्यनंदिनी शाखेतील कठीण मंत्रांचं ग्रंथ न पाहता रोज 4 तासांचं दण्डक्रम पठण झालं आणि तेही त्रुटीरहित.

Devvrat Mahesh Rekhe : महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील 19 वर्षांच्या देवव्रत महेश रेखे यांची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. याचं कारण म्हणजे देवव्रत महेश रेखे यांनी दंडक्रम पारायण हे वेद पठणातील सर्वात कठीण प्रकारांपैकी असणारं पूर्ण केलं आणि दंडक्रम विक्रमादित्य ही पदवी संपादित केली. त्यांच्या या अद्भुत कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत कौतुक केलं आहे. पण, हे दंडक्रम पारायण नेमकं काय? तसेच, दुर्लभ वेदपठण कसं पार पाडलं? या संदर्भात सविस्तर जाणून घेऊयात.
वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी देवव्रत महेश रेखे यांनी केलेल्या या कामगिरीने काशीच्या पवित्र भूमीत तब्बल 200 वर्षांनंतर हा चमत्कार घडला आहे. 50 दिवस 165 हून अधिक तास आणि 25 लाखांहून अधिक वेदमंत्रांचं अखंड त्रुटीरहित पठण. दोन शतकांनंतर हा अहिल्यानगर महाराष्ट्रातील तरुण वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे याने इतिहास रचलाय. काशीमध्ये मागील 50 दिवस चाललेल्या दण्डक्रम वेद पारायणाचा भव्य समारोप झाला. वेदांच्या मध्यनंदिनी शाखेतील कठीण मंत्रांचं ग्रंथ न पाहता रोज 4 तासांचं दण्डक्रम पठण झालं आणि तेही त्रुटीरहित. समारोपाच्या दिवशी काशीमध्ये वैदिक मंगल ध्वनी घुमला. 500 पेक्षा जास्त साधकांच्या उपस्थितीत रथयात्रा निघाली.
पंतप्रधान मोदींनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा
What 19 year old Vedamurti Devavrat Mahesh Rekhe has done will be remembered by the coming generations!
— Narendra Modi (@narendramodi) December 2, 2025
Every person passionate about Indian culture is proud of him for completing the Dandakrama Parayanam, consisting of 2000 mantras of the Shukla Yajurveda’s Madhyandini branch,… pic.twitter.com/DpI52VXIbH
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवव्रत महेश रेखेंचं कौतुक करताना म्हटलं की, "19 वर्षीय वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी जे केलं ते येणाऱ्या पिढ्या नक्की लक्षात ठेवतील. भारतीय संस्कृतीबाबत आस्था असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचा अभिमान आहे. त्यांनी 50 दिवसांत शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यनंदिनी शाखेतील 2000 मंत्रांचा समावेश असलेले दंडक्रम पारायण कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण केलं आहे. यामद्ये अनेक श्लोक आणि पवित्र शब्दांचा समावेश असतो. ते आपल्या गुरु परंपरेच्या सर्वोत्तमत्तेचं मूर्त रुप आहेत. काशीचा खासदार म्हणून मला आनंद आहे की, या पवित्र शहरात हे घडलं. त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या संतांना, विद्वानांना आणि भारतातील विविध संघटनांना माझा प्रणाम, असं मोदी म्हणाले. "
दंडक्रम पारायण म्हणजे काय?
वेदपठणातील सर्वात कठीण प्रकारांपैकी एक म्हणजे दंडक्रम पारायण. मंत्रांची विशिष्ट, कठोर क्रमाने पुनरावृत्ती यामध्ये होते. रोज जवळपास दोन हजार मंत्रांचं पठण, 50 दिवस केलं जातं. यामध्ये मंत्रांचं सरळ, उलटे आणि पुन: सरळ स्वरुप क्रम अचूक स्वरसंयमासह उच्चारावे लागतात.
या अद्वितीय कामगिरीबद्दल श्रृंगेरीपिठाच्या वतीने देवव्रत यांचा भव्य सत्कार केला. तसंच या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा त्यांचं ट्विट करुन कौतुक केलंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...
वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी, श्रीक्षेत्र काशी येथे 50 दिवसांपासून 165 तासांपेक्षा जास्त काळ अत्यंत कठीण अशा ‘दण्डक्रम’ चे पारायण करून 'दण्डक्रम विक्रमादित्य’ पदवीस पात्र झाल्याबद्दल अहिल्यानगर, महाराष्ट्र येथील वेदमूर्ती चि. देवव्रत महेश रेखे यांचे मनापासून अभिनंदन आणि वैदिक… https://t.co/tCiqAsD7Z8
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 30, 2025
"वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी श्रीक्षेत्र काशी येथे 50 दिवसांपासून 165 तासांपेक्षा जास्त काळ अत्यंत कठीण अशा दण्डक्रमचे पारायण करुन दण्डक्रम विक्रमादित्य पदवीस पात्र झाल्याबद्दल अहिल्यानगर, महाराष्ट्र येथील वेदमूर्ती चि. देवव्रत महेश रेखे यांचे मनापासून अभिनंदन. आणि वैदिक परंपरेचे तेज असेच उजळत राहो ही मनस्वी शुभेच्छा असं मुख्यमंत्री म्हणाले."





















