Tulsi Vivah 2024 : शास्त्राप्रमाणे, दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला तुळशी विवाह (Tulsi Vivah) साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवशी तुळशीचा विवाह शालिग्रामबरोबर लावला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनातील ताणतणाव, संघर्ष आणि समस्या दूर होतात. त्यामुळे दिवाळी तर झाली आहे पण आता तुळशी विवाहाची लगबग आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतेय. त्यानुसार, तुळशी विवाहाची तारीख, विधी आणि पूजेची योग्य पद्धत जाणून घेऊयात.
तुळशी विवाह नेमका कधी? (Tulsi Vivah Date 2024)
दिवाळीचा सण नुकताच संपला आहे. आता सगळ्यांना तुळशी विवाह नेमका कधी याचे वेध लागले आहेत.पंचागनुसार, कार्तिक महिन्याची शुक्ल पक्ष एकादशी 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजून 47 मिनिटांनी सुरू झाली आणि 12 नोव्हेंबर संध्याकाळी 4 वाजून 3 मिनिटांनी समाप्त होणार आहे. त्यामुळे 12 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार आहे. तर, त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 13 नोव्हेंबरला तुळशी विवाह संपन्न होणार आहे. तुळशी विवाहानंतर सर्व प्रकारच्या शुभ कार्यास सुरुवात केली जाते. अशी हिंदू धर्मात परंपराच आहे.
तुळशी विवाहाचं महत्त्व (Tulsi Vivah Importance)
हिंदू धर्मानुसार, तुळशीला पूजनीय मानलं जातं. तर, शास्त्रानुसार, तुळशीची पूजा केल्याने आणि संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावल्याने घरात सुख-शांती टिकून राहते. तसेच, घरातील आर्थिक स्थितीदेखील चांगली राहते. तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतात. तर, पती-पत्नीच्या नात्यात जिव्हाळा वाढतो. नातं घट्ट होतं.
तुळशी विवाहाच्या दिवशी 'हे' उपाय करा
तुळशी विवाहाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने दारिद्र्य दूर होते आणि जीवनात सुख-समृद्धी वाढते. तसेच, अखंड सौभाग्याचं वरदान हवं असल्यास तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीला 16 श्रृंगार चढवा. तसेच, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तळशीभोवती 7 वेळा परिक्रमा करा. तुळशी विवाहाला देवी तुळशीची आरती करणं शुभ मानलं जातं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: