Virat Kohli-Yashavi Jaiswal Australian Newspaper : वर्षानुवर्षे सुरू असलेला भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा अजय रथ अखेर न्यूझीलंड संघाने रोखला. 12 वर्षांपासून मायदेशात एकही कसोटी मालिका न गमावलेल्या भारतीय संघाला यावेळी मोठ्या लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. 0-3 अशा पराभवामुळे लोक कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर टीका करत आहेत. खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियाच्या चाहत्यांनी आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या फायनलमध्ये जाण्याच्या आपल्या आशा सोडल्या आहेत, कारण अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारतीय संघाला आता जे करायचे आहे ते इतर कोणत्याही संघाने केले नाही. भारताला आगामी बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 4-0 असा पराभव करावा लागेल, जे जवळजवळ अशक्य आहे.
पण भारतीय संघ पुन्हा एकदा विजयाचा झेंडा फडकवण्याच्या उद्देशाने या मालिकेत उतरणार आहे. भारतीय संघ आगामी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे संघासोबत गेलेला नाही. दरम्यान, पर्थ कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांमध्ये हिंदी आणि पंजाबी भाषेत भारतीय खेळाडूंचे कौतुक करण्यात आले आहे. डेली टेलिग्राफने 'युगों की लढाई' या कॅप्शनसह विराट कोहलीचा मोठा फोटो दिला आहे. याशिवाय यशस्वी जैस्वाल यांचा फोटोही पोस्ट करण्यात आला असून कॅप्शनमध्ये 'द न्यू किंग' असे लिहिले आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाच्या या उपक्रमाचे सध्या सोशल मीडियावर कौतुक होत आहे. पण काही चाहते म्हणत आहे की, ऑस्ट्रेलियन मीडिया भारतीय खेळाडू सोबत माइंड गेम खेळायला सुरूवात आहे.
या मालिकेत भारतीय संघाची नजर ऑस्ट्रेलियात सलग तिसरी मालिका जिंकण्यासाठी आहे. यापूर्वी टीम इंडियाने 2018-19 आणि 2020-21 मध्ये ऐतिहासिक कामगिरी करून विजय मिळवला होता. 2014 पासून भारतीय संघाने कांगारूंविरुद्ध एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ आणखी एका विजयासह हा पराक्रम पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या दृष्टिकोनातून ही मालिका त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. इतर कोणत्याही संघावर किंवा निकालावर अवलंबून न राहता अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला या पाचपैकी चार कसोटी जिंकून एक कसोटी अनिर्णित ठेवावी लागेल.
पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळणार यशस्वी....
भारतीय संघाची युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल प्रथमच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळणार आहे. अलीकडेच तो न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने एकूण 190 धावा केल्या होत्या. त्याने भारतासाठी आतापर्यंत 14 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 56.28 च्या सरासरीने 1407 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. आता तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कामगिरीसाठी सज्ज आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीचा विक्रम
त्याचवेळी भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीही ऑस्ट्रेलियात आपली जादू पसरवण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याची बॅट काही चालत नाही पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचा विक्रम नेहमीच उत्कृष्ट राहिला आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्याच्या रेकॉर्डवर नजर टाकल्यास किंग कोहलीने कांगारूंविरुद्ध आतापर्यंत 25 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने आठ शतके आणि पाच अर्धशतकांच्या मदतीने 2042 धावा केल्या आहेत.