Maharashtra Politics अमरावती : अमरावती भाजप (BJP) कार्यालयात काही दिवसांपूर्वी बडनेराचे उमेदवार रवी राणा (Ravi Rana) यांची बैठक झाली. त्यामध्ये रवी राणा यांनी अमरावतीची एक जागा कमी झाली तरी चालेल पण कमळ निवडून आले पाहिजे, असे वक्तव्य केलं होतं. असे असले तरी अमरावती विधानसभेत महायुतीकडून राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके घड्याळ चिन्हावर उभ्या आहेत. त्यामुळे सुलभा खोडके (Sulbha Khodke) यांचे पती संजय खोडके आणि रवी राणा यांच्यातील वादाला आता पुन्हा नव्यानं सुरुवात झाली आहे. आज रवी राणा यांच्या याच वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली की, रवी राणांना विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्यांना समज द्यावी असे म्हणत अजित पवारांकडूनरवी राणांची कानउघडणी करण्यात आलीय.
माचिस है तो दिया जलेगा, रवी राणांचा रोख नेमका कुणाकडे?
तर यावर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिलीय की, अजित दादा हे आमच्या महायुतीचे घटक आहेत. महायुतीमध्ये युवा स्वाभिमान पार्टी सुद्धा आहे. लोकसभेला भाजपची सीट उभी असताना संजय खोडके यांनी नवनीत राणांच्या विरोधात काम केलं. अजित पवार जेव्हा अमरावतीला आले, तेव्हा संजय खोडके त्यांच्या सभेला सुद्धा आले नाही. खोडकेंनी त्यांचे नेते अजित दादांना भाव दिला नाही. एका विशिष्ट जातीला फायदा पोहोचवण्यासाठी खोडके काम करणार असतील तर त्यांनी लक्षात ठेवावं, माचिस है तो दिया जलेगा. दिया जलने वाला है और माचिस पे ही लोग भरोसा रखेंगे. असा टोला ही त्यांनी यावेळी लगावला. मात्र माचीस हे भाजपचे बंडखोर उमेदवार जगदीश गुप्ता यांचे निवडणूक चिन्ह आहे, हे विशेष त्यामुळे रवी राणांचा रोख नेमका कुणाकडे आहे हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
नवनीत राणांप्रमाणे रवी राणा देखील पराभूत होतील-सुषमा अंधारे
तसंच आज सुषमा अंधारे यांनी रवी राणांवर टीका करत लक्ष्य केलंय. नवनीत राणानंतर आता रवी राणा देखील पराभूत होतील, असे सांगितले. त्यावर रवी राणा म्हणाले की, सुषमा अंधारे पाच वर्षातून एकदा इथे येतात आणि सांगतात की रवी राणांचा पराभव होणार आहे. त्यांनी कडू बोलण्यापेक्षा थोडं गोड बोलावं. लोकं सुज्ञ आहेत त्यांना सगळं माहिती आहे. हे दिवाळी दसऱ्यासारखे येतात त्यामुळे यांच्यावर लोक विश्वास ठेवणार नाहीत. असा पलटवारही रवी राणांनी यावेळी केलाय.
हे ही वाचा