Kartik Month 2023: सुरू असलेल्या कार्तिक महिन्यात तुळशीला अधिक महत्त्व; रोज तुळशीपूजनाने मिळतील 'हे' लाभ, जाणून घ्या
Kartik Month 2023: कार्तिक महिना सुरू झाला आहे. कार्तिक महिन्यात श्री हरी विष्णू आणि लक्ष्मी देवीची विशेष पूजा केली जाते आणि या महिन्यात तुळशीची देखील पूजा केली जाते.
Tulsi Pooja: धार्मिक मान्यतेनुसार, कार्तिक महिन्यात (Kartik Month) तुळशीची पूजा करणं महत्त्वाचं मानलं जातं. कार्तिक महिना 29 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे आणि या महिन्यात तुळशीची पूजा केल्याने भगवान श्री हरी प्रसन्न होतात असं म्हटलं जातं. कार्तिक महिन्यात भगवान श्री हरी विष्णू आणि लक्ष्मी देवीची विशेष पूजा केली जाते. जिथे भगवान श्री हरी निवास करतात, तिथेच देवी लक्ष्मीचाही वास असतो. यामुळे कार्तिक महिन्यात तुळशी पूजन केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि भरभराट होते असं मानलं जातं.
मान्यतेनुसार, कार्तिक महिना हा श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे या महिन्याच्या सुरुवातीपासून तुळशी पूजनाला सुरुवात होते. तुळशी पूजेशी संबंधित काही महत्वाची माहिती जाणून घेऊया.
तुळशीच्या पूजेचं महत्त्व
कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा करणं विशेष फलदायी मानलं जातं. असं मानलं जातं की, या महिन्यात पूर्ण विधीवत तुळशीची पूजा केल्याने त्या व्यक्तीवर भगवान श्री हरी विष्णूसह देवी लक्ष्मीची कृपा होते. त्यामुळे कार्तिक महिन्यात रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावं. या संपूर्ण महिन्यात संध्याकाळी तुळशीच्या खाली तुपाचा दिवा लावून घरातील गरिबी दूर केली जाऊ शकते.
तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी आणि भगवान श्री हरीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दररोज अंघोळ करून ब्रह्म मुहूर्तावर पहाटे उठून तुळशीला जल अर्पण करावं आणि तुळशीसमोर दिवा लावावा. तुळशीची पूजा करताना तुलसी मंत्राचा जप करणं खूप शुभ मानलं जातं.
तुळशी मंत्र
शुभम् करोति कल्याणम्, आरोग्यम् धन संपदा, शत्रु बुद्धि विनाशाय, दीपं ज्योति नमोस्तुते।।
कार्तिक महिन्यात तुलसी नामाष्टकाचं पठण आणि श्रवण केल्याने लाभ द्विगुणित होतो असं मानलं जातं. ज्या जोडप्यांना संततीचं सुख मिळालं नाही, त्यांनीही तुळशीपूजन करावं. संपूर्ण कार्तिक महिन्यात तुळशीसमोर दिवा लावावा, परंतु काही कारणास्तव दिवा न लावल्यास कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच 27 नोव्हेंबरला 31 पूर्ण दिवे लावून आपल्या घराच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. अंघोळ न करता कधीही तुळशीला स्पर्श करू नये.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Kartik Month 2023: कार्तिक महिना सुरू; या पवित्र महिन्यात 'ही' कामं केल्याने होईल भरभराट