Bhushan Kadu : अवघ्या महाराष्ट्राला आपल्या विनोदी अभिनयातून हसवणारा कलाकार म्हणजे भूषण कडू (Bhushan Kadu). परंतु, मागील काही वर्षांपासून भूषण सिनेसृष्टीतून जणू गायबच झाला होता. भूषण या काळात अनेक मोठ्या संकटांशी झुंज देत होता. कोरोना काळात बायकोचं निधन, त्यानंतर आर्थिक चणचण आणि आता मुलाला सांभाळायचं कसं? अशा अनेक प्रश्नांमुळे भूषण नैराश्यात गेला. आपलं जीवन संपवून टाकावं, असा विचार देखील भूषणच्या मनात आता. या दरम्यान, भूषण देश सोडून गेलाय, अशा अफवा देखील अनेकांनी पसरवल्या. आता या सगळ्यावर मात करत भूषण बऱ्याच दिवसांनी कॅमेऱ्यासमोर आला. या सर्व संकटांतून बाहेर येण्याचं कारण म्हणजे स्वामींचा (Swami) तो एक साक्षात्कार... असं म्हणत त्याने आपली कहाणी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहे.


बायकोच्या निधनानंतर विश्वच हललं 


कोरोना काळात आलेल्या संकटांमध्ये अभिनेता भूषण कडू कसा गुरफटून गेला हे त्याने सांगितलं. यावेळी भूषण कडू म्हणाला, "माझं सर्वच संपलं होतं. आई-वडील गेले, त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बायको कादंबरी (Bhushan Kadu Wife) गेली. माझ्या पदरात 11 वर्षांचं लेकरू (Bhushan Kadu Son) होतं. एका बायकोचं आयुष्यातून निघून जाणं फार कठीण असतं, कादंबरी माझं सगळं मॅनेजमेंट सांभाळायची आणि आता आपण मुलाला काही देऊ शकत नाहीये, याची खंत मला होती. बाप जिवंत आहे, कलाकार आहे मोठा, लोक त्याच्यासोबत फोटो काढतात. परंतु, मुलाला काय हवं आहे हे तो बोलून दाखवत नाही आणि त्यामुळे मलाही काही कळेनासं झालं."


अन् सुरू झाला आत्महत्येचा विचार


"एके दिवशी मनात विचार आला, हे सगळं बघण्यापेक्षा स्वत:ला संपवूया, म्हणजे आपण या जगातूनच निघून जाऊया. या विचारात मी सुसाईड नोट लिहायला घेतली, पण ती संपेना... कारण मला त्यात सगळंच मांडायचं होतं. मुलाला सांगायचं होतं की, माझ्या आयुष्यात तुझं किती महत्त्वाचं स्थान आहे, बायकोचं किती महत्त्वाचं स्थान होतं, प्रेक्षकांबद्दलचा आदर, सगळं सगळं.... रोज मी चिठ्ठी लिहायला बसायचो. लिहून-लिहून पाच पानं झाली, दहा पानं झाली, पंधरा पानं झाली, पण लिहणं काही संपेना...", असं भूषण कडूनं म्हटलं.


अखेर स्वामींचं बोलावणं आलं


पुढे भूषण कडूने सांगितलं, "एके दिवशी मी घरातील काही सामान आणायला बाहेर गेलो आणि ही घटना माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरली. तिथे उभा होतो आणि अचानक माझ्या पाठीवर एक थाप आली. मागे वळून बघितलं, तर चार-पाच माणसं उभी होती. त्यांनी मला विचारलं की, भूषण कडू ना? अभिनेता? मी म्हटलं, हो. ते म्हणाले खूप चांगलं काम करतोस, पण ही काय अवस्था करुन घेतली? असे कसे तुम्ही? मी म्हटलं, आहे हो.. जाऊ दे.. सोडून द्या मला माझ्या मार्गावर... आता या सगळ्या चार-पाच मंडळींमध्ये शेवटला उभे होते ते विकास दादा पाटील, ठाण्यातील स्वामी समर्थांच्या मठाचे मठाधिपती. मी त्यांना ओळखत नव्हतो, मला काही माहीत नव्हतं. ते मला म्हणाले, कडू असे नका वागू... चांगले कलाकार आहात... तुम्ही एक काम करा, उद्या स्वामींच्या मठात या."


अगदी नकळत मदतीचा हात पुढे आला


"माझी सुसाईट नोट तर चालूच होती. पण मी म्हटलं, बघू.. मठात बोलवलंय तर बघू काय फरक पडतोय. म्हणजे एका क्षणाला माणूस इतका वैतागतो की तो देवाची परीक्षा घ्यायला निघतो. माझ्याही बाबतीत तसं झालं. म्हटलं जाऊन पाहूया, स्वामींना विचारुया- काय स्वामी? तुम्हाला तर एवढी लोकं मानतात... अशक्यही शक्य करतील स्वामी, असं म्हणतात. मग गेलो स्वामींच्या मठात. स्वामींच्या पाया पडलो, विकास दादा पाटील यांना भेटलो आणि त्यांनी माझा ब्रेनवॉश करायला सुरुवात केली. ते म्हणाले, आता रोज यायचं मठात. त्या दिवशी मला थोडं बरं वाटलं. त्यांच्याशी थोडं बोललो, काही गोष्टी शेअर केल्या आणि हळूहळू का होईना कधी त्या मठातल्या मंडळींनी गुपचूप मदतीचा हात पुढे केला, हे मलाही कळलं नाही.", असं अभिनेत्याने सांगितलं.


स्वामींचा साक्षात्कार... जगण्याची नवी उमेद मिळाली


पुढे भूषण म्हणाला, "रोजची ती एक सवयच पडली, सकाळी उठलं की मुलगा शाळेत जायचा आणि मी मठात यायचो आणि तिथे बसायचं आणि ते माझं ब्रेनवॉश करायचे एक प्रकारे. त्यांनी मला आयुष्याबद्दलच्या काही चांगल्या गोष्टी शिकवल्या. जगणं किती महत्त्वाचं आहे, आयुष्य किती सुंदर आहे, याची जाणीव करुन दिली आणि नकळत ते मदत पण करत होते. आर्थिक मदत, वैचारिक मदत, इतर गोष्टींची मदत किंवा भक्ती मार्गातील मदत... अशी सर्वतोपरी मदत मला मठातून यायला लागली आणि हळूहळू सुसाईड नोट लिहीणं माझं कमी झालं, आत्महत्येचा विचार डोक्यातून निघून गेला. मग मी म्हटलं आता जगूया, एवढी चांगली मंडळी आपल्याला मदत करतायत तर आपल्या जगणं गरजेचं आहे. कारण कुठेतरी त्यांची परतफेड करणं महत्त्वाचं आहे आणि ती जर करायची असेल तर काम करणं हा एकमेव पर्याय आहे."


जवळजवळ दोन-अडीच महिने मी मठात जायचो, तिथेच बसायचो, तिथेच जेवायचो आणि दिवस मावळला की घरी यायचो.


हेही वाचा:


Amruta Khanvilkar : तेव्हा मला वाटलं आता स्वामी माझ्यासोबत नाही पण..., 'त्या' कठीण काळातील अमृता खानविलकरने सांगितला स्वामी अनुभव


Swami Samartha Prakat Din : नेहमी चांगल्या माणसांसोबतच वाईट का घडतं? स्वामी समर्थांनी दिलं 'हे' उत्तर