Astrology : प्रत्येकाला जीवनाच्या एका वळणावर वाटतंच की, मी कोणाचं वाईट केलं नाही, कुणाशी वाईट वागलो नाही तरीही माझ्या सोबत देव वाईट का वागतो? असे विचार अनेकांच्या मनात येत असतील. याचं उत्तर श्री स्वामी समर्थांनी महाभारतातील एका कथेतून दिलं आहे. आता ही कथा अशी आहे की, एकदा अर्जुन श्रीकृष्णाला विचारतात की, हे वासुदेवा! नेहमी खरं आणि चांगलं वागणाऱ्या माणसांसोबतच वाईट का होतं ? या प्रश्नावरून श्रीकृष्णाने अर्जुनाला एक गोष्ट सांगितली, ज्यामध्ये जीवनातील प्रत्येक गोष्टीचं उत्तर दडलेलं आहे, ते जाणून घेऊया.


श्री कृष्णाने सांगितली गोष्ट


कथेची सुरुवात करताना श्री कृष्ण म्हणाले - एका गावात दोन व्यक्ती राहत असतात. एक असतो व्यापारी, जो नेहमी खरं बोलत असतो आणि चांगलं वागत असतो. हा व्यक्ती नेहमी देवाची भक्ती करायचा, तो दररोज मंदिरात जायचा आणि दानधर्मही करायचा, दररोज देवाची पूजा करायचा. हा व्यक्ती सर्व चुकीच्या कामांपासून दूर राहायचा.


आता दुसरीकडे, दुसरा व्यापारी हा पूर्णपणे विरुद्ध स्वभावाचा होता. तो वाईट प्रवृत्तीचा होता. वाईट संगतीत होता आणि व्यसनी होता. नेहमी चुकीची कामं करायचा, नेहमी खोटं बोलायचा. दानधर्म आणि धर्माशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. तो दररोज मंदिरात जायचा. परंतु पूजा करण्यासाठी नाही, तर मंदिराच्या बाहेरून लोकांच्या चपला चोरण्यासाठी.


एके दिवशी तो वाईट माणूस एका मंदिरात होता, त्यावेळी खूप मुसळधार पाऊस पडत होता, या गोष्टीचा फायदा घेऊन त्या वाईट माणसाने त्या मंदिरातील पैसे चोरले. नेमकं त्याच वेळी जो चांगला माणूस होता तो दर्शनासाठी मंदिरात आला. दुर्दैवाने मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यालाच चोर समजून आरडाओरडा सुरू केला. त्या चांगल्या माणसावरच पैसे चोरल्याचा आळ सर्व लोकांनी घेतला आणि त्याला बेदम मारहाण केली.


तो चांगला माणूस कसाबसा त्या मंदिरातून बाहेर पडला, तिथेही सर्वजण त्याच्या मागे धावू लागले. मंदिरातून बाहेर रस्त्यावर येताच एका बैलाने त्या भल्या माणसाला ठोकर दिली. तो गंभीर जखमी झाला. त्याच वेळी, वेळेचा फायदा घेऊन वाईट मनुष्य मंदिरातले चोरलेले पैसे घेऊन निघाला, तितक्यात त्याला वाटेत पैशाने भरलेलं आणखी एक पोतं आढळून आलं. ते पाहून तो म्हणाला, आजचा दिवस किती चांगला आहे, आधी मंदिरात पैसे मिळाले आणि तिथून बाहेर पडल्यावर लगेच रस्त्यावर देखील आपल्याला पैसे मिळाले. हे सर्व त्या चांगल्या माणसाने ऐकलं आणि हे सर्व पाहून त्या भल्या व्यापाऱ्याला खूप वाईट वाटलं आणि त्याने घरातील सर्व देवाची चित्रं काढून टाकली. दोघेही काही वर्षांनी मरण पावले.


चांगली कर्मं करत राहा


मृत्यूनंतर ते यमराजाच्या समोर गेले, तेव्हा चांगल्या माणसाने त्यांना प्रश्न विचारला की, मी तर नेहमी चांगली कर्मं केली, नेहमी चांगलं वागलो, तरी माझ्या वाट्याला दुःखंच का आलं? मला सारखा अपमान का सहन करावा लागला? या प्रश्नावर उत्तर देताना यमराज म्हणाले, हा तुझा गैरसमज आहे. ज्या दिवशी तुझा अपघात झाला, तो दिवस तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस होता. पण तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा मृत्यू झाला नाही. तुला फक्त किरकोळ दुखापत झाली


दुसरा वाईट व्यक्ती मनुष्य आहे त्याला राजयोग प्राप्त होणार होता, पण त्याच्या चुकीच्या कर्मामुळे तो एका पोतभर पैशाच्या चोरीत परावर्तित झाला. भगवंत तुमची साथ कधी आणि कोणत्या स्वरूपात देईल हे सांगणं कठीण आहे. तुम्ही चांगलं कर्म करत राहायलात तर भगवंत नक्कीच तुम्हाला त्याचं चांगलं फळ देत असतो, पण आपल्याला ते समजत नाही. वाईट कर्माची फळं नेहमी वाईटच मिळत असतात, अशा लोकांना आयुष्यात कधी शांतता लाभत नाही, समाजात मानसन्मान मिळत नाही.


जर तुम्ही चांगले कर्म करत राहिलात तर देवाची कृपा तुमच्या पाठीशी असते, म्हणूनच आपण चांगली कर्मं करत राहिली पाहिजे. यामुळे तुमच्यावर मोठं संकट येणार असतं, पण देव ते छोटं करून तुमच्या जीवनात देतो. त्यामुळे नेहमी चांगले कर्म करा, नेहमी खरं बोला, नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, कारण या सर्वाचा हिशेब देवाकडे असतो आणि याचं चांगलं फळ आपल्याला वेळोवेळी मिळत राहतं.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Vastu Tips for Money : पाकिटात ठेवा फक्त 'ही' एक वस्तू; काही दिवसांत व्हाल मालामाल, कमाईत होईल भरघोस वाढ