मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये वादळी वारे आणि मुसळधार पाऊस बरसताना दिसला आहे. त्यानंतर तुरळक ठिकाणी पाऊस सोडला तर उर्वरित राज्यात उष्णतेचे वातावरण आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसही राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक भागांमध्ये पाऊस किंवा वीजांच्या गडगडाटासह पाऊस बरसू शकतो.


याशिवाय, पुणे, जळगाव, धुळे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना या 10 जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह वादळी वारे वाहू शकतात. उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहमदनगरमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. 


मुंबईत काय होणार?


तीन दिवसांपूर्वी मुंबईत वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला होता. या पावसानंतर मुंबईत तात्पुरता गारवा जाणवत होता. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील उकाडा प्रचंड वाढला आहे. गुरूवारीही ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना आणखी काही दिवस घामाच्या धारा लागणार, हे निश्चित आहे. 


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून 19 मेपर्यंत अंदमानमध्ये दाखल होऊ शकतो. त्यानंतर 31 मेच्या आसपास नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील. त्यापुढील वातावरण पोषक असेल तर मान्सून 7 ते 10 जूनच्या आसपास महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. 


जागतिक स्तरावर तापमाना वाढ, एप्रिल महिना सर्वात उष्ण


जागतिक स्तरावर एल-निनो फॅक्टरमुळे जगभरात एप्रिल महिन्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले. एप्रिल महिना आजवरचा सर्वात उष्ण एप्रिल महिना ठरला आहे. जगभरात सलग 11 महिने तापमानवाढीचा कल कायम राहिला असून जागतिक तापमान ससरासरीपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. परिणामी उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र आणि असह्य झाल्या आहेत. दक्षिण अमेरिकेने आजवरचा सर्वाधिक उष्ण एप्रिल अनुभवला तर युरोपात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उष्ण महिना  म्हणून एप्रिलची नोंद झाली आहे. 


जागतिक हवामान संघटनेच्या माहितीनुसार, गेल्या तीन दशकांमध्ये जगभरात उष्माघातामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी एक पंचमांश मृत्यू हे भारतात झाले आहेत. कोरड्या हवामानात आणि कमी-मध्यम उत्पन्न असलेल्या  भागात सर्वाधिक मृत्यूदर असल्याचे निरीक्षण 'कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस' आणि नोआच्या मासिक अहवालात नोंदवण्यात आले आहे.


आणखी वाचा


गूड न्यूज! मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली, या दिवशी केरळात दाखल होणार नैऋत्य मान्सून


यंदाचा मान्सून कसा असेल? काही राज्यांमध्ये कमी पावसाची शक्यता; स्कायमेटचा अंदाज वाचा सविस्तर...