Navdurga 2024 : नवरात्रीच्या या दिवसांत... आपल्याला आठवते, ते शक्तीरूपेण संस्थितः अश्या महिषासूरमर्दिनीचे रूप... अन् तिने महिषासूर आणि त्याच्यासारख्याच अनेक दुष्ट, अत्याचारी असुरांचा केलेला संहार! महाभयंकर अस्त्र-शस्त्रांनिषी चालून आलेल्या असंख्य असुरांना तिने अक्षरषः रक्तस्नान घातलं! आपला आजचा रंग लाल... लाल रंग हा पराक्रमाचा-शौर्याचा रंग मानला जातो. म्हणून आजची आपली दुर्गा ही आधुनिक महिषासूरमर्दिनी आहे... निर्भीड आणि तडफदार आयपीएस ऑफिसर शर्मिष्ठा घारगे-वालावलकर!
आपण एक आयपीएस ऑफिसर व्हावं... शर्मिष्ठा यांचं अगदी बालपणापासूनचं स्वप्न!मूळच्या सांगली येथील असलेल्या त्यांनी, इयत्ता दुसरी-तिसरीत शिकत असतानाच, भारतातील पहिल्या महिला आयपीएस किरण बेदी ह्यांच्याबद्दल ऐकलं आणि वाचलं. त्यांच्या जीवनावर आधारित असलेली टीव्ही मालिकाही त्यांनी पाहिली होती. आणि त्यानंतर... जेव्हा त्यांच्या शाळेत, प्रमुख पाहुण्या सांगलीच्या तत्कालीन पोलीस ऑफिसर आणि सध्याच्या डीजी रश्मी शुक्ला मॅडम आल्या, त्यावेळी शर्मिष्ठा यांनी एक लेडी पोलीस ऑफिसर प्रत्यक्ष रूपात पाहिली आणि तेव्हाच त्यांनी पोलीस ऑफिसर होण्याचं ठरवलं!
पुढे, दहावी-बारावीत चांगले मार्क्स मिळवल्यानंतर...त्यांनी सांगलीत काॅलेज टाॅपर हाेऊन बी.एस.सी. ची पदवी मिळवली आणि पुण्याला एम.एस.सी. च पदव्युत्तर शिक्षण घेतलं. हे चालू असतानाच आयपीएस साठी आवश्यक त्या युपीएससी परीक्षेचा त्यांनी पूर्ण अभ्यास केला हाेता. त्यामुळेच एम.एस.सी. झाल्यानंतर त्यांनी सरळ मुंबईला स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करीयर हया संस्थेमध्ये प्रवेश घेतला.
पण दुर्देवाने त्यांना युपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण हाेता आले नाही... तरीही कठाेर मेहनतीनंतर, पदरी आलेल्या हया अपयशाने, अजिबात खचून न जाता शर्मिष्ठा यांनी काही दिवसांतच, एमपीएससीची परीक्षा दिली आणि ती मात्र चांगल्या गुणांनी उत्तीर्ण हाेउन, पोलीस ऑफिसरची पहिली पाेस्टींग डीवायएसपी म्हणून मिळवली!
पण यापुढची वाटचालही मुळीच साेपी नव्हती... कारण एमपीएससीची निवड प्रकिया त्या काळी प्रदीर्घ हाेती.....लग्नानंतर परीक्षा उत्तीर्ण हाेणे..... नाशिक येथे प्रत्यक्ष ट्रेनिंग ची सुरूवात... यामध्ये चार वर्षे निघून गेलीत, दरम्यान शर्मिष्ठा एका मुलाच्या आई झाल्या हाेत्या. ट्रेनिंगच्या सुरूवातीला एक आई आणि एक उदयाेन्मुख पोलीस ऑफिसर... ही तारेवरची कसरत साधताना... त्यांना खूपच कष्ट आणि त्रास सहन करावा लागला. परंतु ध्येय गाठण्याचा त्यांचा निर्धार एवढा प्रबळ हाेता... की, पुढचे वर्षभराचे ट्रेनिंग त्यांनी अगदी जिद्दिने पूर्ण केले... ट्रेनिंगच्या भटटीतून तावून-सुलाखून निघाल्यानंतर... त्या मनाने खंबीर अश्या एक कर्तव्यदक्ष तडफदार पोलीस ऑफिसर झाल्या हाेत्या!
मग त्यांना पहिले पाेस्टींग तुळजापूर येथे मिळाले. मग आई तुळजाभवानीच्या नवरात्राैत्सवात येणा-या प्रचंड गर्दीसाठीचा बंदाेबस्त... ते तेथील काहि दराेडेखाेरांच्या टाेळयांना कायमचा प्रतिबंध... अश्या विविध प्रकारच्या अविस्मरणीय अनुभवांमुळे, पुढील प्रवासासाठी त्यांचा आत्मविश्वास आणखीच वाढला! पुढे क्राईम ब्रांचमध्ये काम करतांना एक स्त्री म्हणून असलेली मनाची संवेदनशीलता आणि एका पोलीस ऑफिसरची कर्तव्यनिष्ठुरता हया दाेन्हींचा उत्तम समताेल साधत त्यांनी अनेक उल्लेखनीय कामगिरी बजावल्या!
अगदी आवर्जून सांगण्यासारखी कामगिरी म्हणजे नाशिक ग्रामीण येथे पाेस्टींग असतांना काेव्हीड लाॅकडाउनच्या काळातील त्यांची कामगिरी आणि त्याच क्षेत्रात 2021 साली त्यांनी रेव्ह पार्टीवर केलेली रेड! अनाथ किंवा पळून आलेली मुलं... हयांचं पुनर्वसन करण्याच्या बाबतीतही त्यांचं काम अतिशय प्रशंसनीय आहे... त्याचबराेबर सध्या खूपच प्रमाणात घडणा-या स्त्री-बालिका अत्याचारांच्या गुन्हयांमध्येही त्यांनी अतिशय यशस्वी असे कार्य केलेले आहे! आज राज्य पोलीसदलात एका महत्त्वाच्या पदावर कार्य करणा-या हया दुर्गेला आमचा मानाचा मुजरा!
हेही वाचा :