Navdurga 2024 : नवरात्रौत्सवातील आजचा दिवस हा महागौरीचा... आणि गौरी म्हणजे गौर... शुभ्रकांती, म्हणुनच आजचा पांढरा रंग! आणि मुळात पांढरा रंग हा सरस्वतीचा देखील आहे... त्यामुळे तो कलेचाही आहे! आजच्या दिवसाची महागौरी आहे... प्रसिध्द गायिका आणि संगीत-क्षेत्रात आजवर अनेक विदयार्थी घडवणाऱ्या  सौ. पद्मा सुरेश वाडकर! 


मूळच्या केरळच्या असलेल्या पद्माताई, त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षीच आपल्या कुटुंबासोबत मुंबईत आल्या.. लहानपणी अगदी चंचल आणि चुणचुणीत असलेल्या पद्माताईंना खरं तर नृत्याची भयंकर आवड... पण त्यांच्या आईंना वाटलं की, त्यांच्यासाठी गायनाचे क्षेत्रच योग्य आहे. मग वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी... काहीशा अनिच्छेनेच त्यांनी गायनाचे धडे गिरवायला सुरूवात केली... अनेक ठिकाणचा अनुभव घेतल्यानंतर... पद्माताईंना अतिशय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे सुयोग्य गुरू मिळाले... ते आचार्य श्री. जियालाल वसंत हयांच्या रूपात! 


आचार्य श्री. जियालाल वसंत यांची शिष्या झाल्यावर पद्माताईंचे जीवनच जणू बदलून गेले. आधी गायनाचा प्रचंड कंटाळा असणाऱ्या पद्माताई, काही दिवसांतच गायनासाठी अधिकाधिक वेळ देऊ लागल्या... आणि आज तर त्यांनी आपलं सर्व आयुष्य हे संगीत क्षेत्रासाठी अर्पण केलं असून, त्या आजीवासन या संगीत अकादमीच्या डायरेक्टर म्हणून  कार्यरत आहेत. त्यांचे पती आणि ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकरही या संस्थेचे एक अविभाज्य घटक आहेत.


आपण स्वतः एक गायक असून, पद्माताईंनी आपलं स्वतःचं करिअर करण्यापेक्षा अनेक उदयोन्मुख गायकांचं करिअर घडवण्याला जास्त प्राधान्य दिलं. त्याचमुळे जूहूला सुरू केलेल्या एकमेव मुख्य गुरूकुल शाखेवर न थांबता मुंबईत अनेक जागी त्यांनी आजीवासनच्या शाखा सुरू करण्यावर भर दिला आणि त्यासाठी भरपूर अथक परीश्रमही घेतले. त्याचाच परिणाम म्हणून आज आजीवासन संस्थेच्या मुंबईत अनेक शाखा आहेत आणि सर्वदूरच्या उपनगरांतील अनेक विदयार्थी तेथे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवत आहेत. संगीताचे शिक्षण देणाऱ्यांना केवळ संगीत टीचर म्हणण्याऐवजी, प्रोफेशनल सिंगर... व्यावसायिक गायक म्हणून संबोधण्याची सुरूवात आजीवासन या संस्थेनेच केली. ज्यामुळे संगीताचं शिक्षण देताना इथले शिक्षक आपले संगीतातले करिअरही उत्तमपणे सांभाळत आहेत. 


नवीन शाखा सुरू करण्याबरोबरच पद्माताईंनी काही नामांकित शिक्षण संस्थांमध्ये आपले शिक्षक पाठवून त्यांच्या कॅम्पसमध्ये गायनाचे शिक्षण देण्यासही सुरूवात केली आहे. त्यांच्या या उपक्रमालाही प्रचंड प्रतिसाद मिळत असून आज शेकडो विदयार्थी याचा लाभ घेत आहेत. त्याचबरोबर पद्माताईंनी या इंटरनेट युगाची गरज म्हणून त्यांचे ऑनलाईन क्लासेसही सुरू केले आहेत, जेणेकरूनममुंबईबाहेरच्याच नव्हे... अगदी भारताबाहेरच्या इच्छुक विदयार्थ्यांनाही संगीत शिकता यावे! 


आपले संगीताचे उत्तम ज्ञान, आपले मॅनेजमेंट कौशल्य आणि अथक परिश्रमाच्या बळावर सौ. पद्माताईंनी घेतलेली झेप निश्चितच कौतुकास्पद आहे,मपुढील पिढयांसाठी प्रेरणादायक आहे! या शारदीय नवरात्रौत्त्सवाच्या निमित्ताने संगीत क्षेत्रातल्या या आधुनिक शारदेला आमचा प्रणाम! 



हेही वाचा : 


Navdurga 2024 : कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारी नवदुर्गा! मृण्मयी भाटवडेकर - कुलकर्णी यांची कारकीर्द