Ashwattha Maruti Pujan 2022 : आज श्रावणातील शेवटचे अश्र्वत्थ मारूती पूजन; जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व
Ashwattha Maruti Pujan 2022 : श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्र्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे.
Ashwattha Maruti Pujan 2022 : श्रावण (Shravan 2022) महिना हा हिंदू पंचांगानुसार वर्षातला पाचवा महिना 29 जुलै रोजी सुरु झालेला श्रावण महिना आता संपत आला आहे. याच श्रावणात प्रत्येक शनिवारी अश्र्वत्थाची पूजा केली जाते. त्यानुसार आज श्रावणातील शेवटचे अश्र्वत्थ मारूती पूजन असणार आहे. याच निमित्ताने ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर (Jayant Salgaonkar) यांनी सांगितलेली अश्र्वत्थ मारूती पूजनाची कथा आणि महत्त्व जाणून घेऊयात.
अश्र्वत्थ मारूती पूजन पूजा विधी :
श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्र्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजादेखील केल्या जातात. मारुतीचा वार शनिवार. त्यामुळे श्रावणात मारुतीरायाला न विसरता तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ मोठ्या प्रेमाने घातली जाते. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो असा समज आहे. वेदकाळापूर्वीच्या सिंधुसंस्कृतीत अश्र्वत्थवृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते. त्यामुळे तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला. पुढे ऋग्वेदकाळातही यज्ञकर्मात अग्निमंथनासाठी लागणारी उत्तरारणी अश्र्वत्थापासून बनविली जाई. यज्ञ आणि पितर अश्र्वत्थामध्ये वास करतात अशी आपल्या संस्कृतीची पूर्वापार श्रद्धा आहे. उपनिषद काळात अश्र्वत्थ हे देवस्थान मानले गेले. त्याबद्दलची एक कथा पद्यपुराणात आढळते.
अश्र्वत्थ मारूती पूजनाची कथा :
एकदा भगवान विष्णूने धनंजय नामक विष्णूभक्त ब्राह्मणाची सत्त्वपरीक्षा घेण्याचे ठरविले. त्यानुसार त्याने धनंजयाला दरिद्री केले. परिणामी त्याच्या साऱ्या नातलगांनी त्याला एकाकी पाडले. ते थंडीचे दिवस होते. थंडीपासून स्वत:चे रक्षण व्हावे ह्या हेतूने धनंजय सुकी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवीत असे. एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली. तत्क्षणी तिथे विष्णू प्रकटले. त्यांनी धनंजयाला ‘तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तबंबाळ झालो आहे, मलाच जखमा झाल्या आहेत’ असे सांगितले. ते ऐकून दुःखी होऊन धनंजयाने त्याच कुऱ्हाडीने स्वत:ची मान तोडून प्रायश्चित्त घेण्याचे ठरविले. त्याची ही भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी धनंजयांला रोज अश्र्वत्थाची पूजा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तिपूर्वक अश्र्वत्थाची पूजा करू लागला. पुढे कुबेराने त्याचे दारिद्र्य नष्ट करून त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले. प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेमध्ये ‘ अश्र्वत्थ सर्ववृक्षाणामू‘ (वृक्षांमध्ये जो अश्र्वत्थ तो मी होय.) असे म्हटले आहे. हरवलेली वस्तू वा व्यक्ती असल्याला प्रदक्षिणा घातल्याने परत मिळते अशा श्रद्धेने आपल्याकडे नेमाने असल्याला प्रदक्षिणा घालणारी बरीच भाविक मंडळी आहेत.
ज्ञानदेव महाराजांचे वडील परत यावे म्हणून त्यांच्या आईने मोठ्या श्रद्धेने अशा प्रदक्षिणा घातल्या होत्या हे सर्वज्ञात आहे. काही ठिकाणी पूजा करण्यापूर्वी स्त्रिया वटवृक्षाप्रमाणेच अश्र्वत्थ वृक्षालाही प्रथम दोरा गुंडाळतात. दृष्ट शक्तींना बांधून ठेवण्याचे एक प्रतीक म्हणून हा दोरा गुंडाळला जातो. श्रावणातीलच नव्हे, तर इतर शनिवारीही सूर्योदयापूर्वी अश्र्वत्थाची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. ज्यांना नेहमी शक्य नसते त्यांनी निदान श्रावणातील शनिवारी तरी ही पूजा आणि प्रदक्षिणा करण्याची प्रथा रूढ झाली. ह्याबरोबरच श्रावणातील कृष्णपक्षात त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावास्या ह्या तीन दिवशी पितरांची तहान शमावी ह्या श्रद्धाभावनेने पिंपळाच्या बुंध्याजवळ पाणी घातले जाते.
महत्वाच्या बातम्या :