Ashadhi Wari 2024 : नामदेव महाराजांची पालखी 26 जूनला पंढरपूरकडे निघणार; 26 दिवसांचा पायी प्रवास, 4 ठिकाणी रिंगण सोहळा
Ashadhi Wari 2024 : हिंगोलीतून संत नामदेव महाराजांची पालखी 26 जूनला प्रस्थान करेल. या दरम्यान अनेक ठिकाणी पालखीचा थांबा असेल.
Ashadhi Wari 2024 : आषाढी वारीला (Ashadhi Wari 2024) आता सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणांहून पालख्या पंढरपूरकडे (Pandharpur) निघाल्या आहेत, आता संत नामदेव महाराजांची पालखी देखील पंढरपूरकडे कूच करेल. संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पालखी 26 जूनला हिंगोलीच्या (Hingoli) त्यांच्या जन्मस्थळावरुन, म्हणजेच नर्सी (नामदेव) गावातून प्रस्थान होणार आहे. या पालखीमध्ये दरवर्षी हजारो वारकरी सहभागी होत असतात. पालखीचं या वर्षीचं हे 29 वं वर्ष असून ही पालखी 26 दिवसांमध्ये नर्सी नामदेव ते पंढरपूरचा पायी प्रवास पूर्ण करत असते.
चार ठिकाणी रंगणार रिंगण सोहळा
नामदेव महाराजांची पालखी अनेक गावांतून थांबे घेत प्रवास करेल. पालखी सोहळ्यादरम्यान चार ठिकाणी वारकऱ्यांच्या रिंगण सोहळा रंगेल. हा आयोजित करण्यात येत असलेला रिंगण सोहळा म्हणजे वारीतील प्रमुख आकर्षण असतं.
पाच दिवस करणार पंढरपुरात मुक्काम
यंदा आषाढी वारी 17 जुलै रोजी आहे, त्याच्या आधीच्या दिवशी संत नामदेव महाराजांची पालखी पंढरपुरात पोहोचेल. 21 जुलैपर्यंत पालखी सोहळ्याचा पंढरपुरात मुक्काम राहणार आहे. पाच दिवस पालखी पंढरपुरात असेल.
कुठे कुठे असणार पालखीचा मुक्काम?
26 जून - नर्सी गावातच मुक्काम
27 जून - हिंगोली
28 जून - औंढा नागनाथ
29 जून - बाराशिव
30 जून - हट्टा
1 जुलै - परभणी
2 जुलै - पोखर्णी
3 जुलै - गंगाखेड
4 जुलै - उक्कडगाव
5 जुलै - परळी वैजनाथ
6 जुलै - अंबाजोगाई
7 जुलै - बोरी सावरगांव
8 जुलै - वडगाव (रामा)
9 जुलै - मसा
10 जुलै - दगडधानोरा
11 जुलै - खांडवी
12 जुलै - चिंचगाव (टेकडी)
13 जुलै - लहूळ
15 जुलै - आष्टी
16 ते 21 जुलै - पंढरपूर
शरद पवार पायी वारीत सहभागी होणार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यंदाच्या आषाढी वारीत (Ashadhi Wari) सहभागी होणार आहेत. पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' हा उपक्रम राबविला जातो. साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांचा या वारीत सहभाग असतो. यंदा शरद पवार या वारीत सहभागी होणार आहेत. त्यांच्या सोबत काँग्रसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हासदादा पवार , जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे ह.भ.प. भारत महाराज जाधव, मार्मिक साप्ताहिकाचे संपादक मुकेश माचकर, कवी अरुण म्हात्रे, अभिव्यक्ती चॅनलचे रविंद्र पोखरकर आदी मान्यवर सहभागी होणार आहेत, अशी माहिती शामसुंदर महाराज सोन्नर यांनी दिली.
हेही वाचा: