Ashwagandha farming : एमबीएचं शिक्षण घेतलेल्या तरुणानं फुलवली 'अश्वगंधाची' शेती
पारंपरिक शेतीला फाटा देत यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील एका उच्च शिक्षित तरुणानं प्रायोगिक तत्त्वावर 'अश्वगंधा' पिकाचा प्रयोग यशस्वी केला आहे.
Ashwagandha farming : कृषी क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी नाही. पारंपरिक शेतीला फाटा देत यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील एका उच्च शिक्षित तरुणानं प्रायोगिक तत्त्वावर 'अश्वगंधा' पिकाचा अभ्यास करुन प्रायोगिक तत्वावर कोव्हळा या ठिकाणी एका एकरात लागवड केली आहे. अश्वगंधा या पिकाचा प्रयोग त्या तरुण शेतकऱ्यानं यशस्वी केला आहे. आपण घेतलेल्या शिक्षणाचा फायदा हा यवतमाळ जिल्ह्याला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसण्यासाठी व्हावा असा प्रयत्न या तरुणानं केला आहे.
शुभम राजेंद्र नाईक हा तरुण नेर शहरातील शिवाजीनगर येथे वास्तव्यास आहे. वडील वरिष्ठ शिक्षक म्हणून नुकतेच निवृत्त झाले आहेत. वडील जरी पेशानं शिक्षक असले तरी ते उर्वरित वेळ शेतीतच देत होते. यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातो. कारण कर्जबाजारी, नापिकी, नैसर्गीक संकट यामुळं येथील शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. दरम्यान, आपल्या दर्जेदार शिक्षणातून आधुनिक पीक पद्धतीचा मार्ग वैफल्यग्रस्त शेतकरी बांधवांना दाखवून ही ओळख काहीशी पुसता यावीस, ही भावना ठेवून शुभमने बारावीनंतर कृषी क्षेत्रात उच्च शिक्षण घ्यायचे ठरवले. यवतमाळ येथील मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यायातून त्याने बीएससी ॲग्रीकल्चर या पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. तर डॉ. पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ ॲग्री कल्चरमधून त्याने कृषी क्षेत्रातच एमबीए हे पदव्युत्तर शिक्षण घेतलं.
दरम्यान, शुभमने नोकरीच्या मागे न लागता त्याने नेर तालुक्यातील कोव्हळा येथे वडिलोपार्जित असलेल्या सात एकर शेतीपैकी सुरुवातीला एका एकरात अश्वगंधाच्या शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. अश्वगंधाचे बीज हे नागपूर जिल्हयातील कृषी केंद्र चालक मित्राकडून मागवले. त्याला एका एकरात जवळपास 4 ते 5 किलो बीज लागले. साधारण पाच ते सहा महिन्यांत या वनस्पतीचे उत्पादन होते. बियाणे, पेरणी, फवारणी धरुन त्याला साधारणतः 15 हजार रुपये लागवड खर्च आला. यावर तब्बल सात ते आठ पट उत्पन्न त्याला अपेक्षीत आहे. अश्वगंधाच्या मुळांचा वापर औषधीसाठी केला जातो. एका एकरात साधारणपणे तीन ते चार क्विंटल मुळांचे उत्पादन निघते.
पुराणकाळातही उल्लेख असलेली अश्वगंधा ही वनस्पती आयुर्वेदिक उपचारातील अतिशय महत्त्वाची वनस्पती म्हणून ओळखली जाते. शक्तिवर्धक, पचनशक्ती वाढवण्यात तसेच रोगप्रतिकारक म्हणूनही याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अश्वगंधाची जगभरात मागणी वाढली होती. जगातील सुमारे 30 देशांमध्ये या वनस्पतीचे उत्पादन घेतले जाते. मध्य प्रदेशातील निमजगाव मंडी येथे या वनस्पतीची मोठी प्रसिद्ध बाजारपेठ आहे. अल्प भूधारकांना पारंपरिक पिकामधून म्हणावं तसं उत्पन्न मिळत नाही. आता वेगवेगळ्या किंवा आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचं या तरुणाने आपल्या कर्तुत्वातून दाखवले आहे.