Wheat Prices : दर नियंत्रणासाठी सरकारचे प्रयत्न, तरीही गव्हाच्या दरात वाढ सुरुच; सहा महिन्यात 'एवढी' वाढ
सध्या बाजारात गव्हाला चांगले दिवस आले आहेत. गव्हाच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे.
Wheat Prices : सध्या बाजारात गव्हाला चांगले दिवस आले आहेत. गव्हाच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. मागील सहा महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल 22 टक्क्यांची वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात गव्हाच्या दरात मोठी वाड पाहायला मिळत आहे. सध्याचे गव्हाचे दर पाहता देशांतर्गत बाजारात गव्हाच्या किमतीने आठ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे.
किंमतीतील वाढ नियंत्रित करण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. दर नियंत्रीत करण्यासाठी सरकार खुल्या बाजारात गव्हाची विक्री करत आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका लक्षात घेता देशांतर्गत बाजारातील किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकार गव्हाच्या आयातीवरील शुल्क काढून टाकण्याचीही शक्यता आहे.
दिल्लीत गहू 27 हजार 390 रुपये प्रति मेट्रिक टनावर
दरम्यान, रॉयटर्सच्या अहवालानुसार, मंगळवारी 17 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील गहू 1.6 टक्क्यांनी वाढून 27 हजार 390 रुपये प्रति मेट्रिक टनावर पोहोचला आहे. जो 10 फेब्रुवारी 2023 नंतरची सर्वोच्च किंमत आहे. गेल्या सहा महिन्यांत गव्हाचे भाव 22 टक्क्यांनी वाढले आहेत. गव्हाच्या किमती वाढत राहिल्यास किरकोळ महागाई वाढू शकते आणि अन्नधान्य महागाई वाढू शकते.
15 मार्च 2024 नंतरच गव्हाचे पिक बाजारात येणार
आपण जर सरकारी आकडेवारी पाहिली तर 17 ऑक्टोबर 2023 रोजी गव्हाची सरासरी किंमत 30.29 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. तर कमाल किंमत 58 रुपये प्रति किलो आहे. 1 मे 2023 रोजी गव्हाचे नवीन पीक बाजारात आल्यानंतर त्याची सरासरी किंमत 28.74 रुपये प्रति किलो आणि कमाल किंमत 49 रुपये प्रति किलो होती. साहजिकच गव्हाच्या दरात वाढ सुरूच आहे. गव्हाचे नवीन पीक 15 मार्च 2024 नंतरच बाजारात येणे अपेक्षित आहे. अशा स्थितीत, किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी, सरकारला आपल्या कोट्यातून गहू खुल्या बाजारात सोडावा लागेल.
सरकारी गोदामात 24 दशलक्ष मेट्रिक टन गव्हाचा साठा शिल्लक
दरम्यान, गव्हाच्या आयातीला चालना देण्यासाठी आयात शुल्क रद्द करण्याची मागणीही होत आहे. सध्या, सरकार गव्हावर 40 टक्के आयात शुल्क लावत आहे. ज्यामुळं आयात खूप महाग होते. त्यामुळे व्यापारी आयात करण्यास टाळाटाळ करतात. 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत, सरकारी गोदामात गव्हाचा साठा 24 दशलक्ष मेट्रिक टन होता, जो पाच वर्षांच्या सरासरी 37.6 दशलक्ष मेट्रिक टनापेक्षा खूपच कमी आहे. त्याचबरोबर एल निनोमुळे रब्बी हंगामात गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
MSP: दिवाळीपूर्वीच मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, गव्हासह 'या' पिकांच्या MSP मध्ये होणार वाढ