(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Krishi Bhavan : 'डीडी किसान' सरकार आणि शेतकरी यांच्यातील सेतू : कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर
डीडी किसान या वाहिनीनं नवी दिल्लीत कृषी भवनात स्वतःचा स्टुडीओ उभारला आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते या स्टुडीओचं उद्घाटन झालं.
Krishi Bhavan Delhi : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या प्रयत्नांतून डीडी किसान या वाहिनीनं नवी दिल्लीत कृषी भवनात स्वतःचा स्टुडीओ उभारला आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते या स्टुडीओचं उद्घाटन झालं. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे आणि कैलाश चौधरी हे देखील उपस्थित होते. कृषी मंत्रालयाला या स्टुडीओच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मोठा वाव आहे. डीडी न्यूज तसेच डीडी किसान या वाहिन्यांच्या माध्यमातून शेतकरी अत्यंत सोप्या पद्धतीनं मंत्रालयाशी संपर्क साधू शकतील असेही तोमर म्हणाले. डीडी किसान वाहिनी सरकार आणि शेतकरी यांच्यादरम्यान सेतूचे काम करत असल्याचेही तोमर म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 8 वर्षांत देशातील शेतकऱ्यांच्या जीवनात फार मोठा कायापालट घडून आला आहे. कृषी क्षेत्रात देखील अत्यंत मूलगामी बदल घडून येत आहेत. अशा वेळी देशातील शेतकरी तंत्रज्ञानाशी जोडला जावा, सद्यस्थितीबद्दल अवगत व्हावा आणि अधिक किफायतशीर पिकांकडे वळून त्याने अधिक फायदा मिळवावा या उद्देशाने ही वाहिनी सरकार आणि शेतकरी यांच्यादरम्यान सेतूचे काम करत आहे असल्याचे कृषीमंत्री तोमर यावेळी म्हणाले.
डीडी किसानने उभारलेल्या स्टुडिओच्या उभारणीमुळं, केंद्रीय कृषी मंत्रालयाचे उपक्रम, कार्यक्रम आणि विविध अभियानांची माहिती अधिक जलद गतीनं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळं याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कृषी भवन येथे हा स्टुडिओ उभारल्याबद्दल तोमर यांनी दूरदर्शन आणि डीडी किसान वाहिनीचे आभार मानले. देशातील शेतकरी तंत्रज्ञानाशी जोडला जावा, सद्यस्थितीबद्दल अवगत व्हावा आणि अधिक किफायतशीर पिकांकडे वळून त्याने अधिक फायदा मिळवावा या उद्देशाने ही वाहिनी सुरु करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
सध्या देशात सर्वच क्षेत्रात आधुनिक तंत्रक्षानाचा वापर केला जात आहे. शेती क्षेत्रात देखील नवनवीन बदल होत आहेत. कृषी क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाचा वापर झपाट्यानं वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. कृषी क्षेत्रात होणाऱ्या बदलांचा, नवीन तंत्रज्ञानाची माहिती सर्वच शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे. त्यामुळं डीडी किसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही माहिती आता जलद गतीनं मिळणार आहे. भारताची वाढती लोकसंख्या आणि मर्यादित कृषी क्षेत्रात सर्वांना पुरेसे अन्नधान्य निर्माण करणे हेच शेतकऱ्यांसमोरचे मोठे आव्हान आहे.