M. Venkaiah Naidu : कृषी संशोधनासह विकासावरील खर्चात वाढ करण्याची गरज, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या सुचना
देशातल्या कृषी संशोधनाची गुणवत्ता आणि क्षमता वाढवण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. तसेच कृषी संशोधनासह विकासावरील खर्चात वाढ करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
Vice President M. Venkaiah Naidu : कृषी उत्पादकतेमध्ये दीर्घकालीन भरीव लाभ मिळवण्यासाठी देशातल्या कृषी संशोधनाची गुणवत्ता आणि क्षमता वाढवण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. कोणताही प्रगत देश कृषी विषयक उपक्रमांचा विस्तार केल्याशिवाय कृषी उत्पादनामध्ये सुधारणा घडवून आणू शकत नाही. आपल्या देशाच्या कृषी जीडीपीच्या अवघे एक टक्का कृषी संशोधन आणि विकास यांच्यासाठी खर्च केला जातो. त्यामुळे कृषी संशोधन आणि विकास यावरील खर्चामध्ये वाढ करण्याची सूचना देखील यावेळी व्यंकय्या नायडू यांनी केली. हैद्राबादमधील राष्ट्रीय कृषी संशोधन संस्था - राष्ट्रीय कृषी संशोधन व्यवस्थापन (आयसीएआर -एनएएआरएम) अकादमीच्या पदवीदान समारंभात बोलत होते.
कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गावोगावी भेट द्याव्यात
शेती ही हवामानानुसार लवचिक, फायदेशीर आणि शेतकरी बांधवांसाठी शाश्वत करण्यासाठी कृषी संशोधक, धोरणकर्ते, उद्योजक आणि शास्त्रज्ञांनी सर्वतोपरी प्रयत्न करावे असेही नायडू म्हणाले. कृषी विद्यापीठांनी नवीन तंत्र आणि शाश्वत उत्पादन पद्धती विकसित करण्याबरोबरच देशातल्या प्रत्येक भागातल्या शेवटच्या शेतकरी बांधवापर्यंत ही प्रगती पोहोचवणे आपले कर्तव्य मानले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गावोगावी भेट देवून त्यांनी प्रत्यक्षात शेतीच्या नेमक्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन नायडू यांनी केले. शेतकऱ्यांना उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्यासाठी संशोधनाचा लाभ मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लॅब टू लँड हे घोषवाक्य सर्वांनी आत्मसात केले पाहिजे असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांना सोप्या भाषेत माहिती द्यावी
शेतकऱ्यांसाठी कोणतीही गोष्ट करताना जास्त तांत्रिक संकल्पना, शब्दांचा वापर न करता अगदी सोप्या भाषेत सामुग्री द्यावी. त्यांना मोबाईलव्दारे विस्तारित सेवा द्यायच्या असतील तर त्यांच्या मागणीनुसार आणि त्यांचा कोणत्याही प्रकारे गोंधळ उडणार नाही असे पर्याय तसेच विना अडथळा सेवा उपलब्ध करून द्यावी असेही नायडू म्हणाले. भारतीय कृषी व्यवसायामधील विविध उदयोन्मुख आव्हानांविषयीही नायडू यावेळी बोलले. यामध्ये पाण्याची घटती उपलब्धता, हवामान बदल, मातीची कमी होणारी प्रत, जैवविविधतेचे नुकसान, नवीन कीड आणि पिकांवर पडणारे रोग, शेतीचे होणारे तुकडे अशा अनेक समस्यांचा उल्लेख त्यांनी केला. अशा प्रश्नांमुळे कृषी संशोधनाचे कार्य आगामी काही वर्षांमध्ये अधिक गांभीर्याने करावे लागणार असल्याचं त्यांनी सागितलं.
शेती फायदेशीर करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज
आपल्याला संशोधनाच्या दृष्टिकोनामध्ये बदल करण्याची गरज आहे. यासाठी तांत्रिक नवकल्पना, मनुष्यबळ आणि विस्तारित सेवा यांमध्ये उत्कृष्ट कार्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. इतर क्षेत्रांसह जनुकशास्त्र, आण्विक प्रजनन आणि नॅनो तंत्रज्ञाना यासारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याची सूचना त्यांनी केली. त्यांनी आयसीएआर संस्थांनी ड्रोन तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा कृषी क्षेत्राच्या विकासासाठी समन्वय घडवून आणून उत्पन्न वाढविण्याचे तसेच उत्पादनांचा विकास करण्याचे आवाहन केले. कृषी व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी कुशल मनुष्य बळ निर्माण करण्यावर भर देण्याची गरज प्रतिपादन केली. प्रशिक्षित कृषी व्यवसायिक पदवीधर शेतीला अधिक संघटित क्षेत्र बनवण्याच्या दिशेने काम करु शकतात. तुम्ही नोकरी शोधण्याऐवजी नोकरी देणारे तुम्ही बनू शकता, असेही त्यांनी सांगितले.