Pathadi Chinch Latur : लातूर जिल्ह्यातील पानचिंचोलीची 'पठडी चिंच' म्हणजे नैसर्गिक वरदान, पाहा काय आहे वेगळेपण
लातूर जिल्ह्यात आढळणारी पठडी चिंच हे एक असेच नैसर्गिक वरदान आहे. ही चिंच फक्त लातूर जिल्ह्यातील पानचिंचोली या गावातच मिळते.
Pathadi Chinch Latur : निसर्गाने मानवाला भरभरुन दिले आहे. जसे वातावरण आणि जमिनीचा पोत आहे, तशा भागात वरदान ठरेल असे वृक्ष आणि पीक दिले आहे. मात्र, आधुनिकीकरणाच्या वेगात त्याकडं दुर्लक्ष झाल्यामुळं सर्वसामान्यांची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. लातूर जिल्ह्यात आढळणारी पठडी चिंच हे एक असेच नैसर्गिक वरदान आहे. ज्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष केले होते, मात्र, आज या पठडी चिंचेचं महत्व लक्षात येत आहे.
पठडी चिंच ही अतिशय मधाळ. जितकी आंबट तितकीच गोडहीआहे. जिभेवर अवीट गोडी देणारी ही चिंच फक्त लातूर जिल्ह्यातील पानचिंचोली या गावातच मिळते. या चिंचेचं वैशिष्ट्य हे की एक ते दीड फूट लांब चिंच आहे. गर भरीव आहे. आंबट आणि गोड याचे उत्तम मिश्रण यामध्ये आहे. आतील चिंचोका हा बारीक आहे. गर जास्त असल्यामुळं वजन चांगले भरते. यातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळतो. क्विवंटल मागे 2000 रुपये जास्तीचे मिळतात. लागवडीपासून सातव्या ते आठव्या वर्षी फळ धारणा होते.
पानचिंचोली या गावात गोविंद पाटील खांडेकर यांच्या शेतात पठडी चिंचेचं एकच मोठं झाड होतं. या चिंचेच्या चवीचे चर्चा वाढत गेली. त्यानंतर गावातील उमाकांत कुलकर्णी यांनी याची माहिती घेतली. त्यांच्याकडे इतर वाणाच्या चिंच होत्या. चिंच खरेदीसाठी आलेले बागवान पठडी चिंचेची मागणी करत असत. भाव चढा देण्याचा प्रस्तावही ठेवत. यामुळे आठ वर्षांपूर्वी उमाकांत कुलकर्णी यांनी शेतात एका एकरमध्ये 40 झाडे लावली. पुढील पाच वर्षात यात आंतरपीक घेण्यात आले. दोन वर्षांपासून त्याचे उत्पादन सुरु आहे. त्यांच्याकडून याचे माहिती घेत गावातील अनेकांनी पठडी चिंच लावण्याचे ठरवले. आजमितीला पानचिंचोली आणि आजूबाजूच्या गावातूनही मोठ्या प्रमाणावर ही चिंच लागवडीकडे कल वाढला आहे. पानचिंचोलीत आज 518 शेतकऱ्यांचा एक गट तयार करण्यात आला आहे. मागील दोन वर्षापासून या भागात 5 हजार पेक्षा जास्त पठडी चिंचेची लागवड झाली आहे.
कोरडवाहू आणि दुष्काळी विभाग म्हणून मराठवाड्याची ओळख आहे. मात्र, आता ही ओळख गावाबरोबरच राज्याला समृद्ध करणारी ठरणार आहे. देशातील सर्वांत लांबीची आणि गोडव्याची चिंच लातूर जिल्ह्यातील पानचिंचोली येथे आहे. या चिंचेचे पेटंट मिळवण्यासाठी शास्त्रज्ञ गणेश हिंगमिरे यांनी केंद्राकडे प्रस्ताव दाखल करुन लातूरच्या 'पठडी चिंच'ची ओळख देशाला करुन दिली आहे. राज्यात दर वर्षी पाच हजार कोटीचे चिंचेचं उत्पादन होत असते. मागील काही वर्षात वृक्षतोडीमुळे यात घट झाली आहे. पठडी चिंच लागवडीच्या वेगामुळे ही घट भरुन निघेलच, त्याचबरोबर शेतकऱ्याला आर्थिक फायदा मिळेल.
महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी, नाशिकला द्राक्ष जळगाव आणि वसमतची केळी यांना ज्याप्रकारे लोकमान्यता मिळाली आहे. ज्यातून त्या भागातील शेतकऱ्याचा आर्थिक स्तर सुधारला आहे. तसाच लातूर जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्याचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी पठडी चिंच हातभार लावू शकते यात कोणतेही शंका नाही. पेटन्टवर काम होत आहे. आता सरकारी पातळीवर यांच्या लागवडीकडे विशेष बाब म्हणून लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.