कांद्यावरील निर्यात शुल्क हटवा, महाविकास आघाडीच्या खासदारांचं उपोषण, मंत्री पियूष गोयलांना दिलं पत्र
Onion Export Duty : महाविकास आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. लवकरात लवकर कांद्यावरील निर्यात शुल्क हटवावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
Onion Export Duty : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) चिंतेत आहेत. कारण दिवसेंदिवस कांद्याचा दर (Onion Price) कमी होताना दिसत आहे. याचा मोठा आर्थिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. दरम्यान, कांद्याच्या निर्यातीवर लावण्यात आलेले 20 टक्के निर्यात शुल्क हटवावे अशी मागणी केली जात आहे. याच मुद्यावरुन शेतकऱ्यांसह विरोधक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, आज महाविकास आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे पत्र दिले आले. लवकरात लवकर कांद्यावरील निर्यात शुल्क हटवावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
कांद्यावरील निर्यात शुल्क केंद्र सरकारने 20 टक्क्यांनी वाढवल्यामुळं कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. कांद्याच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असल्याची माहिती खासदारांनी दिली आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क हे शासनाने पूर्णपणे काढले पाहिजे यासाठी महाविकास आघाडीच्या खासदारांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. तसेच लोकसभेच्या मकरद्वारावर उपोषण देखील करण्यात आलं. यावेळी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, अहमदनगरचे खासदार निलेश लंके, बीडचे खासदार बजरंग सोनावणे, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे उपस्थित होते.
एकूण कांदा उत्पादनाच्या 60 टक्के कांदा उत्पादन हे एकट्या महाराष्ट्रात
देशातील एकूण कांदा उत्पादनाच्या 60 टक्के कांदा उत्पादन हे एकट्या महाराष्ट्रात होते. तर राज्याच्या एकूण कांदा उत्पादनापैकी 60 टक्के कांदा हा एकट्या नाशिक जिल्ह्यात पिकतो. कांदा हे ऐकमेव नगदी आणि जिव्हाळ्याचे पीक आहे. त्यामुळं सरकारनं कांदा निर्यातीस प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. लासलगाव ही अशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात इतर देशात कांद्याची निर्यात केली जाते. सध्या उन्हाळ कांद्याचे उत्पादन संपल्यामुळं लाल कांदा बाजारात येत आहे. मात्र, कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकरी अडचणीत आले आहेत. अत्यंत कमी दरानं बाजारात कांद्याची विक्री सुरु आहे. सध्या कांद्याला 2000 रुपयांच्या आसपास दर मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याला 4000 ते 5000 रुपयांचा दर मिळत होता. मात्र, अचानक दरात मोठी घसरण झाली आहे. आधीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा मोठा फटका बसला आहे. अशातच आता उत्पादन खर्चापेक्षाही दर कमी मिळत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोट सहन करावा लागत आहे. राज्यातील कांद्याला परदेशात मोठी मागणी आहे. मात्र, सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर 20 टक्के शुल्क लावले आहे. त्यामुळं त्याचा परिणाम थेट कांद्याच्या निर्यातीवर होत आहे.
महत्वाच्या बातम्या: