MSP : आता गाव गाव MSP, हर घर MSP अभियान राबवलं जाणार, किसान मोर्चाच्या अधिवेशनात निर्णय
पंजाब खोर गावातून MSP चा लढा सुरू झाला असून, तो आता देशातील प्रत्येक गावात पोहोचवला जाणार आहे. MSP गॅरंटी किसान मोर्चाच्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला आहे.
MSP : हमीभावाच्या मुद्द्यावरुन विविध शेतकरी संघटना (Shetkari Sanghatana) आक्रमक झाल्या आहेत. केंद्र सरकारनं हमीभावाचा (MSP) कायदा करावी अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. व्ही एम सिंह (VM Singh) यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील पंजाब खोर इथं MSP गॅरंटी किसान मोर्चाचं अधिवेशन आयोजीत करण्यात आलं होतं. या अधिवेशनात हमीभावाच्या मुद्यावर चर्चा झाली. 200 हून अधिक शेतकरी संघटना यामध्ये सामील झाल्या होत्या. पंजाब खोर गावातून MSP चा लढा सुरू झाला असून, तो आता देशातील प्रत्येक गावात पोहोचवला जाईल असे व्ही एम सिंह यांनी सांगितलं.
शेतकरी कुटुंबाने MSP च्या मोहिमेत सहभागी व्हावं
पंजाब खोर MSP गॅरंटी अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. या अधिवेशनाचा काल (8 ऑक्टोबर) समारोप झाला. यावेळी शेतकरी संघटनांनी हमीभावाचा कायदा होण्यावर आपली भूमिका मांडली. इथे सुमारे 200 संघटना सामील होणाऱ्या होत्या. मात्र, अचानक 27 प्रांतातील 220 शेतकरी संघटनांनी या अधिवेशनात एमएसपी हमी किसान मोर्चाला पाठिंबा दिला. प्रत्येक शेतकरी कुटुंबाने या मोहिमेत सहभागी व्हावं, यासाठी गावोगावी प्रचार करावा असे मत व्ही एम सिंह यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, प्रत्येक गावात भिंतीवर पेंटिंग, प्रभात फेरी काढून, बॅनर, पोस्टर लावून MSP चे फायदे प्रत्येक कुटुंबाला सांगण्यात येतील. MSP चे वातावरण निर्माण करण्यासाठी गाव समिती त्यांच्या पद्धतीने काम करेल असे ते म्हणाले. याचे मुख्य ध्येय आणि घोषवाक्य हे 'गाव गाव MSP, हर घर MSP हे असेल असं सांगण्यात आलं आहे.
गाव गाव MSP, हर घर MSP अभियान राबवलं जाणार
प्रत्येक गावानं ग्रामसभेत ठराव करण्याचे या अधिवेशनात ठरले आहे. हे ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवण्यात येणार आहेत. यासाठी अडीच महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारीपासून ही पत्रे ठराविक अंतराने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना पाठवली जाणार आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी ट्विटरवर, 'गाव गाव MSP, हर घर MSP, फसल हमारी भाव तुम्हारा, नहीं चलेगा नहीं चलेगा हे अभियान राबवलं जाईल. 23 मार्च 2023 रोजी हुतात्मा दिनानिमित्त जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत पाठवलेल्या पत्रांच्या लाखो प्रती पंतप्रधान कार्यालयाकडे सुपूर्द केल्या जातील अशी माहिती देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: