(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Onion Price : नंदूरबारमध्ये कांद्याच्या उत्पादनात घट, दरात वाढ होण्याची शक्यता
नंदूरबार जिल्ह्यात कांद्याचे दर (Onion Price) वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा उत्पादनात घट झाली असून त्याचा परिणाम दरावर होत आहे.
Onion Price News : परतीच्या पावसाचा (Rain) शेतकऱ्यांच्या पिकांना यावर्षी मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पीक वाया गेली आहेत. त्यामुळं शेतकरी संकटात आहे. तर काही भागात पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं उत्पादनात घट येणार आहे. नंदूरबार (Nandurbar) तालुक्यातील पूर्व पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. मात्र, या भागात पावसानं पाठ फिरवल्यानं उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. त्याचा परिणाम दरावर होण्याची शक्यता असून, कांद्याचे दर (Onion Price) वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळं ज्या शेतकऱ्यांकडं कांदा आहे, त्यांना याचा फायदा होणार आहे.
नागरिकांच्या रोजच्या आहारात येणारा कांदा हा आता महाग होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात नंदूरबार जिल्ह्यात कांद्याचं उत्पादन घटलं आहे. त्यामुळं कांदा भाव खाणार आहे. नंदूरबार तालुक्यातील पूर्व पट्टा हा कांदा उत्पादकांचा समजला जातो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली जाते. मात्र, या भागात पावसानं पाठ फिरवल्यानं उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. परजिल्ह्यातून येणारा डाग लागलेला काळा कांदाही 20 ते 25 रुपये किलोच्या दराने बाजारात उपलब्ध होत आहे. जुना कांदा 50 रुपयांच्या पुढे गेला आहे. तर येणाऱ्या काळात कांद्याचे भाव हे आणखीन वाढणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक बजेट बिघडणार असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील तीन हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान जमा
नियमित कर्ज फेडणाऱ्या दहा हजार शेतकऱ्यांपैकी तीन हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान जमा झाले आहे. सात हजार शेतकऱ्यांना अजूनही अनुदानाची प्रतिक्षा आहे. नंदूरबार जिल्ह्यातील 45 हजार शेतकरी दरवर्षी विविध बँकांकडून पीक कर्ज घेत असतात. त्यापैकी दहा हजार शेतकरी नियमित कर्जाची फेड करत असल्यानं ते शासनाच्या प्रोत्साहन अनुदान योजनेच्या निकषात बसत असल्यानं त्यांच्या खात्यावर प्रोत्साहन अनुदान म्हणून 50 हजार रुपये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नंदूरबार जिल्ह्यात पात्र असलेल्या दहा हजार शेतकऱ्यांपैकी तीन हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जमा झाली आहे. जिल्ह्यात तीन हजार शेतकऱ्यांना पंधरा कोटी रुपयांची मदत शासनाकडून करण्यात आली आहे. रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची मदत मिळाल्यानं रब्बी हंगामातील पेरणीसाठी त्याचा उपयोग होणार आहे. मात्र, अजूनही सात हजार शेतकरी शासनाच्या प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा होईल असा अंदाज प्रशासनाच्या वतीने व्यक्त केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या: