Schemes for Farmers: मोदी सरकारचे चार नवे उपक्रम, शेतकऱ्यांना होणार फायदा; वाचा सविस्तर माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सणासुदीच्या प्रारंभीच शेतकऱ्यांसाठी नवीन उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतलाय.
Schemes for Farmers: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सणासुदीच्या प्रारंभीच शेतकऱ्यांसाठी नवीन उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. काही जुन्या योजना नव्यानं राबवण्यात येणार आहेत. हे नवीन उपक्रम देशभरातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. जाणून घेऊयात केंद्र सरकारच्या चार नवीन घोषणा.
देशातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारनं नवीन योजना जाहीर केल्या आहेत. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या उपक्रमांतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे.
किसान ऋण पोर्टल
केंद्र सरकारनं गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मंगळवारी नवी दिल्लीत दोन नवीन पोर्टल सुरु केले आहेत. यापैकी एक किसान ऋण पोर्टल. सरकारनं शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात म्हणजेच कमी व्याजावर कर्ज देण्यासाठी हे पोर्टल सुरु केलं आहे. ज्या शेतकऱ्यांकडं किसान क्रेडिट कार्ड नाही अशा शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत पोहोचवणे हा या पोर्टलचा उद्देश आहे. यासाठी शेतकरी आधार क्रमांकाच्या मदतीने आपली नोंदणी करू शकणार आहेत. यामध्ये प्रथम शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदारत कर्ज मिळेल आणि नंतर वेळेवर पैसे भरल्यास अधिक अनुदान मिळेल. हे पोर्टल शेतकऱ्यांशी संबंधित डेटा तपशीलवार पाहण्यासाठी एक व्यासपीठ असेल, जिथे कर्ज वितरण, व्याज सवलतीचे दावे, योजनांचा उपयोग, बँकांशी एकीकरण यासारखी कामे पूर्ण केली जातील.
KCC उपक्रम
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यासाठी KCC उपक्रम पुन्हा सुरू करण्याबाबतची माहिती दिली आहे. हा उपक्रमाबद्दल माहिती देताना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, किसान क्रेडिट कार्ड कर्जावर सरकार सुमारे 20 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.
घर-घर केवाईसी
किसान क्रेडिट कार्डचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सरकारने केवाईसीच्या घरोघरी मोहिमेची माहिती दिली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना किसान क्रेडिट कार्डशी जोडण्यासाठी मोहीम राबवणार असल्याचे सांगण्यात आले. याअंतर्गत जे शेतकरी पंतप्रधान किसान योजनेचे लाभार्थी आहेत, ज्या शेतकऱ्यांना सरकारकडून दरवर्षी सहा-सहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळत आहे, अशा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
WINDS पोर्टल
भारतातील शेती हवामानावर अवलंबून आहे. या प्रकरणातही शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळणार आहे. किसान लोन पोर्टलसोबतच सरकारने WINDS पोर्टल देखील सुरू केले आहे. या पोर्टलचे पूर्ण नाव आहे Weather Information Network Data Systems असे आहे. त्याचे काम देशभरातील शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित हवामानाशी संबंधित महत्त्वाची माहिती देणे हे आहे. त्याची औपचारिक सुरुवात जुलैमध्येच झाली आहे. हे पोर्टल शेतकऱ्यांना हवामानाशी संबंधित डेटासाठी विश्लेषण साधने प्रदान करेल, जेणेकरून ते शेतीसंबंधी माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतील.
किसान क्रेडिट कार्ड खात्यांची संख्या सुमारे 7.35 कोटी
30 मार्च 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतातील किसान क्रेडिट कार्ड खात्यांची संख्या सुमारे 7.35 कोटी आहे. त्यांची एकूण मंजूर मर्यादा 8.85 लाख कोटी रुपये आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 5 महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते ऑगस्ट 2023 या कालावधीत शेतकऱ्यांना अनुदानित व्याजावर 6,573.50 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. पीएम पीक विमा योजनेअंतर्गत, 29 हजार कोटी रुपयांच्या प्रीमियमच्या तुलनेत सुमारे 1.41 लाख कोटी रुपये वितरित केले गेले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: