Marathwada Drought : निकषात बसत नसतानाही दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न? 'त्या' दोन जिल्ह्यात मुबलक पाऊस झाल्याची नोंद
Marathwada Drought : यावर्षी मराठवाड्यामध्ये कमी अधिक प्रमाणात अनेक ठिकाणी पाऊस पडलेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणच्या शेतातील उत्पादनात घट झाल्याचे चित्र आहे.
Marathwada Drought : निकषात बसत नसतानाही प्रशासनाच्यावतीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 15 डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या पैसेवारीच्या अनुषंगाने मराठवाड्यात सरसकट दुष्काळ (Drought In Marathwada) जाहीर केला जात आहे. यामुळे पीक विमा परतावा देण्यास विमा कंपन्या टाळाटाळ करू शकतात आणि त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान होईल अशी भीतीदेखील व्यक्त केली जात आहे.
यावर्षी मराठवाड्यामध्ये कमी अधिक प्रमाणात अनेक ठिकाणी पाऊस पडलेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणच्या शेतातील उत्पादनात घट झाल्याचे चित्र आहे. 15 डिसेंबरला जाहीर केलेल्या अनिवार मध्ये मराठवाड्यातील पीक आनिवारी ही 50 पैसे पेक्षा कमी आलेली आहे. त्यामुळे संपूर्णपणे मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी विभागीय स्तरावर आटापिटा सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरासरीच्या 108 टक्के पाऊस झालेल्या नांदेड जिल्ह्यात आणि सरासरीच्या 73 टक्के पाऊस झालेल्या हिंगोली जिल्ह्यात सुद्धा दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहे. यावर्षी हिंगोली नांदेड दोन्ही जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात अनेक भागात पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी तर कमी कालावधीत जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टी सुद्धा झाली होती. परंतु कुठेही 21 दिवसाचा खंड पाहायला मिळाला नाही. तरीही मात्र प्रशासनाच्यावतीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी घाट घातला जात असल्याचे चित्र आहे. हिंगोली आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन या पिकावर यलो मोझॅक यासारख्या अनेक बुरशीजन्य रोगामुळे उत्पादकता घटली आहे. त्याचबरोबर उशिरा झालेल्या पेरण्यामुळे सुद्धा उत्पादनात घट झाली आहे आणि त्यामुळे पैसेवारी कमी आली आहे. परंतु दुष्काळ आणि पैसेवारीचा असा फारसा संबंध नाही असं मत नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केले
तर दुसरीकडे नांदेड शेजारी असलेल्या हिंगोली जिल्ह्यात सुद्धा सरासरीच्या 73 टक्के इतका पाऊस झालेला आहे. तर हिंगोली जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या ईसापुर सिद्धेश्वर येलदरी या धरणामध्ये मुबलक स्वरूपात पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात सुद्धा दुष्काळी परिस्थिती नाही असं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी 50 पैश्यांच्या आत
मराठवाड्यातील (Marathwada) विभागातील आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी 50 पैश्यांच्या आत असल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यातील 8 हजार 496 गावात एकूण 47.42 एवढी सरासरी आणेवारी असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. मराठवाड्यातील खरीप हंगाम 2023-24 ची सुधारित आणेवारी घोषीत करण्यात आली असून, त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक 1 हजार 652 गावांचा अंतिम पैसेवारी 50 पैश्यांच्या आत आहे.