(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Onion Rate Issue: लिलावात कांद्याला अवघ्या 75 पैश्यांचा भाव, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
नीचांकी भाव मिळत असल्याने राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
Onion Rate Issue: आधी अतिवृष्टी त्यांनतर अवकाळी पावसाने आधीच शेतकऱ्यांना अडचणीत आणले असताना आता भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. औरंगाबादच्या जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या तीन दिवसांत 7 हजार 851 क्विंटल कांद्याची आवक झाली. परिणामी किमान 75 रुपये प्रतिक्विंटल म्हणजे 75 पैसे किलो नीचांकी भाव मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहेत.
गेल्यावर्षी सुरवातीलाच चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कांद्याला महत्व दिलं. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा औरंगाबाद,जालना आणि बीड जिल्ह्यात कांद्याच्या लागवडीत 20 हजार हेक्टरने वाढ झाली. त्यात खरीप पेरणीसाठी हाती आलेला कांदा विकण्याची शेतकरी घाई करू लागले आहेत. त्यामुळे कांदा बाजारात मागणीच्या तुलनेत आवक प्रचंड वाढली असल्याने नीचांकी भाव मिळत आहे. औरंगाबादच्या जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत 75 पैसे, सर्वसाधारण 4 रुपये 50 पैसे आणि कमाल 8 रुपयांपर्यंत प्रतिकिलो भाव मिळाला. त्यामुळे पुन्हा एकदा कांद्याने शेतकऱ्यांचे वांधे केल्याचे पाहायला मिळाले.
खर्च वाढला पण...
वाढत्या महागाईचा फटका शेतकऱ्यांना सुद्धा बसत आहे. मात्र त्याप्रमाणे भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. मशागत, बी-बियाणे, लागवड, निंदणी, खते, काढणी असा एकरी उत्पादन खर्च 30 हजार रुपयांपर्यंत वाढला. तर यंदा कांद्याला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा असताना आवक वाढल्याने दर पडले आहे. त्यामुळे खर्च वाढला पण उत्पनातून होणार नफा काही वाढू शकला नसल्याचे चित्र आहे.
40 गोण्याचे बाराशे रुपये मिळाले...
सुरवातीला अतिवृष्टी आणि त्यांनतर अवकाळी पाऊसाने हजेरी लावल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. मात्र त्यातून स्वतःला सावरत शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याला महत्व दिले. मात्र कांद्याला नीचांकी भाव मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील भारत गंगाधर जाधव या शेतकऱ्याने 40 कांद्याच्या गोण्या विक्रीसाठी नेल्या असता अवघा १ रुपयाचा भाव मिळाला. यातून त्यांच्या हातात 1200 रुपये आले आणि वाहतूकसह 3300 रुपये खर्च झाला. उर्वरित रक्कम त्यांना खिशातून भरावी लागल्याने त्यांनी बाजार समितीच्या आवारातच विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.अशीच काही अवस्था राज्यभरातील अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे.