Weather Update : राज्यात बदलत्या वातावरणामुळं पिकांवर संक्रांत; शेतकरी अडचणीत
Maharashtra Weather Update : बदलत्या वातावरणामुळं पिकांवर संक्रांत आली आहे. यामुळं शेतकरी अडचणीत आला असून त्यांना मोठा फटका बसला आहे.
Maharashtra Weather Update : देशभरात सुरू असलेल्या थंडीचा परिणाम राज्यात देखील दिसून येत आहे. राज्यभरात शनिवारी आणि रविवारी अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. बदलत्या वातावरणामुळं पिकांवर संक्रांत आली आहे. यामुळं शेतकरी अडचणीत आला असून त्यांना मोठा फटका बसला आहे. नांदेड जिल्ह्यात वातावरण बदलामुळे हरभरा पिकावर संक्रांत आली आहे. यामुळं हजारो हेक्टरवरील हरभरा पिकाला फुल, फळ, पातधारणा होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. वातावरण बदलामुळे फळधारणा होत नसलेल्या तीन एकर हरभरा पिकावर एका शेतकऱ्याने नांगर फिरवला आहे.
निसर्गाच्या अवकृपेमुळे कधी गारपीट तर अतिवृष्टी तर कधी अवकाळी पावसामुळे शेतकरी हैराण झाला आहे. दरम्यान या वर्षी तरी हरभऱ्याचे पीक चांगले येईल म्हणून किनवट तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीवर शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची पेरणी केली होती.परंतु या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या हरभरा पिकास फळ, फुल धारणा होत नसल्याने त्यावर नांगर फिरवण्याची वेळ आलीय.
हरभरा पिकाची जोमाने वाढ होऊनही,अशा या ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याच्या झाडाला फळधारणा होत नसल्याने किनवट तालुक्यातील येंदापेंदा येथील शिवाजी बोइनवाड या शेतकऱ्यांनी तीन एकरमधील हरभरा पिकावर नांगर फिरवला आहे.
यावर्षी निसर्गाने शेतकऱ्याला चांगलेच मेटाकुटीला आणले असून अधूनमधून ढगाळ वातावरणासह कधी रिमझिम पाऊस, गारांचा पाऊस, तर कधी दमट वातावरणामुळे हरभरा, गहू, ज्वारी ही पिके धोक्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
हजारो रूपये खर्च करून हरभरा या पिकावर बी-बियाणे, खत, कीटकनाशक फवारणीसह अनेक फवारण्या केल्या नंतर हरभरा पीक जोमाने आले. मात्र बदलत्या हवामानामुळे या हरभऱ्याला फळधारणा होत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय.
वादळी वाऱ्यामुळे जळगाव जिल्ह्यात पिकांचं नुकसान
जळगाव जिल्ह्यात अमळनेर आणि पाचोरा तालुक्यात काही गावात झालेल्या वादळी वाऱ्याने रब्बी हंगामातील गहू ज्वारी आणि मका या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संकटांची मालिका काही केल्या कमी होताना दिसत नाही. खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगाम वाया गेला होता. त्यानंतर रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची भिस्त असताना दोन दिवसात पुन्हा एकदा वादळी वाऱ्याने अमळनेर आणि पाचोरा तालुक्यात काही गावांना तडाखा दिल्याने या भागातील शेतकऱ्यांचं रब्बी हंगामातील पिके जमीन दोस्त झाल्याने हात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
झालेल्या पिकांच्या नुकसानीचे शासनाने त्वरित पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून आता केली जात आहे.