(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rain : राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस, पेरणीच्या कामांना वेग
मुंबई आणि उपनगरासह अहमदनगर, यवतमाळ, रायगड, औरंगाबाद या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं पेरणीच्या कामांन वेग येणार आहे.
Maharashtra Rain : राज्याच्या काही भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळं पेरणीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, राज्यातील इतर भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पेरणीसाठी शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, मुंबई आणि उपनगरासह अहमदनगर, यवतमाळ, रायगड, औरंगाबाद या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा
यवतमाळ जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह धुव्वाधार पावासानं हजेरी लावली. जवळपास एक तास पाऊस कोसळल्यानं पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. त्यामुळे शेतकर्यांनी पेरणीला म्हणावी त्या प्रमाणात सुरुवात केली नाही.आताच्या पावसामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला असून, आता पेरणीच्या कामाला वेग येण्याची चिन्हे आहेत.
सिल्लोड तालुक्यात समाधानकारक पाऊस
औरंगाबाद सिल्लोड तालुक्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झाला आहे. तालुक्यात जवळपास सर्वच मंडळामध्ये पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना आनंद झाला. तालुक्यातील अनेक नद्या पहिल्याच पावसात वाहू लागल्या आहेत.
रत्नागिरीत मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांच्याकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 24 जून 2022 ते 27 जून 2022 या कालावधीमध्ये जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी. 24 जून ते 28 जून 2022 रोजी दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा ठिकाणी ताशी 40 ते 50 कि.मी. ते 60 कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे. मच्छिमारांनी सदर कालावधीत मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
शिर्डी विमानतळाची संरक्षक भिंत खचली; शेतकऱ्यांचे नुकसान
शुक्रवारी अहमदनगर जिलह्यातही चांगला पाऊस झाला. शिर्डी परिसरातही मुसळधार पाऊस झाला. या पावसानं शिर्डी विमानतळाची संरक्षक भिंत ठिकठिकाणी कोसळल्याची घटना घडली आहे. संरक्षक भिंतीच्या निकृष्ठ कामाचे पितळ यामुळे उघडे पडले असून रन वे वरील वाहून जाणारे पाणी आजूबाजूच्या शेतात घुसल्यानं शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शिर्डी विमानतळाची संरक्षक भिंत कोसळून कोसळून रन वे वरील पाणी मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या शेती आणि वाड्या वस्त्यांमध्ये घुसल्यानं शेताकडे आणि घरांकडे जाणाऱ्या रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शेतातील विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात माती गेल्याने विहिरी बुजण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील उभी पिके वाहून गेली असून शेती पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. विमानतळ प्राधिकरणाने याची जबाबदारी घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
एकीकडं हवामान खात्याकडून भाकितांचा पाऊस पडतोय, तर दुसरीकडं राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाअभावी पेरणी रखडली आहे. मान्सूननं महाराष्ट्र व्यापल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं असलं तरी प्रत्यक्षात राज्यभरात पावसाची प्रतीक्षा आहे. पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांना पेरणीची तिफण गोठ्यातच ठेवावी लागली आहे. राज्यात खरीप हंगामातील तृण धान्याखालील क्षेत्र 36 लाख 37 हजार हेक्टरपर्यंत आहे. तर तेलबियांचे (भुईमूग, तीळ, कारळ, सुर्यफूल, सोयाबीन) क्षेत्र 41 लाख 58 हजार हेक्टर तर कापसाचं क्षेत्र जवळपास 42 लाख हेक्टरपर्यंत आहे.