Kisan Putra Andolan : किसानपुत्रांच्या वतीनं आज महाराष्ट्रभर उपवास, शेतकरी सहवेदनेसाठी उपोषण
Kisan Putra Andolan : शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी 19 मार्चला राज्यभरात उपवास केला जातो. 19 मार्च 1986 रोजी शेतकरी साहेबराव करपे कुटुंबीयांनी आत्महत्या केली होती.
Kisan Putra Andolan : दरवर्षी 19 मार्चला किसानपूत्र आंदोलनाच्या (Kisan Putra Andolan) वतीनं महाराष्ट्रभर (Maharashtra) उपवास केला जातो. शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी हा दिवस केला जातो. 19 मार्च 1986 रोजी शेतकरी साहेबराव करपे कुटुंबीयांनी आत्महत्या केली होती. करपे कुटंब हे चिलगव्हाण (जि. यवतमाळ) येथील होते. त्यामुळेच या गावात आज (19 मार्च) सुतक पाळले जाणार असून सामूहिक उपोषण देखील केले जाणार असल्याची माहिती अमर हबीब (Amar habib) यांनी दिली.
अन्न हा जीवाचा मूलाधार आहे. अन्न निर्माण करता आले म्हणून माणूस प्रगती करू शकला. शेतकरी अन्न पिकवतो. तो सर्जक आहे. त्याच्या आत्महत्या ही गंभीर बाब आहे. खरे तर शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती मानली पाहिजे. दुर्दैवाने या गंभीर बाबीकडे कोणाचे फारसे लक्ष नाही. शेतकरी आत्महत्या थांबाव्यात या साठी मी काय करू शकतो? आपण सामान्य माणसे आहोत. आपल्या हातात सत्ता नाही. शेतकरीविरोधी (सीलिंग, आवश्यक वस्तू आदी) नरभक्षी कायदे रद्द करण्याचा अधिकार नाही. आपण शस्त्र घेऊन लढू शकत नाही. करोडो शेतकाऱ्याना आर्थिक मदत देण्याऐवढी पुंजीही आपल्या जवळ नाही. आपण सामान्य माणसे, सहवेदना व्यक्त करू शकतो. शेतकाऱ्याना 'आम्ही तुमच्या पाठीशी आहोत' हा दिलासा देऊ शकतो. तो दिलासा देण्यासाठी व सहवेदना व्यक्त करण्यासाठी 19 मार्च रोजी आपल्याला उपवास करायचा आहे. आत्मक्लेशाचा हा मार्ग या देशात अनेकदा वापरला गेला आहे. त्यातून अपेक्षित परिणाम आले आहेत. तोच प्रयत्न आपण करायचा असल्याचे हबीब म्हणाले.
साहेबराव करपेंच्या आत्महत्येला 37 वर्ष पूर्ण
शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी आज महाराष्ट्रभर विविध ठिकाणी उपवास केला जाणार आहे. 19 मार्च 1986 शेतकऱ्यांच्या आयुष्यातील काळाकुट्ट दिवस. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील चिलगव्हाण या गावसह संपूर्ण देशातील शेतकऱ्यांच्या आयुष्यावर मरणसावली टाकणारा दिवस. साहेबराव करपे नावाचा शंभर एकर जमिनीचा मालक असलेला एक शेतकरी आपल्या पत्नी आणि 4 गोड लेकरांना मरणप्रवासाला घेवून जातो. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून शेवटी "येवू दे दया आता तरी गुरु माऊली, या आयुष्याची दोरी कमी जाहली" हे भजन म्हणत स्वतः ही या जगाचा निरोप घेतो. आज या घटनेला आज 37 वर्ष झाली आहेत. तेव्हापासून सुरू झालेल आत्महत्यांच सत्र आजही राज्यात थांबलेल नाही.
शेतकरी आत्महत्येला सरकारी धोरण जबाबदार
शेतकरी आत्महत्येला सरकारी धोरण जबाबदार असल्याचे अमर हबीब म्हणाले. सरकारे बदलली मात्र शेतकरी विरोधी धोरणे बदलली नाहीत. सरकार नव्हे व्यवस्था बदलाचा लढा ठेवण्यासाठी, शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी, शेतकऱ्यांना सन्मान मिळावा, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही चर्चा होईल. शासन प्रशासनाला थोडी जाग येईल. यासाठी हे अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती हबीब यानी दिली.
'या' ठिकाणी होणार उपोषण
आज अमरावतीच्या पंचवटी चौकात राष्ट्रीय ओबीसी किसान संघाच्या वतीनं उपोषण केलं जाणार आहे. वाशीम जिल्ह्यात भूमिपुत्र शेतकरी संघटना ठिकठिकाणी उपोषण करणार आहे. वरुड, मोर्शी, वाटोर, पापड येथे किसानपुत्र तसेच अन्य संघटना मिळून उपवास करणार आहेत. नागपूर, काटोल, उमठा, सावनेर, मूर्तिजापूर, आकोट आदी ठिकाणी उपोषण होणार आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात दिवसभर उपोषण होईल. आंबाजोगाई, धारूर, दिंद्रुड, घटनांदूर, परभणी जिल्ह्यातील दैठणा,जालना जिल्ह्यातील परतूर, वाढोना, जवळाबाजार, साटंबा व लातूर जिल्ह्यातील पानगाव, उदगीर आदी ठिकाणी उपोषणाला लोक बसणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात जय किसान भेटकरी संघटनेच्या वतीनं पेठ वडगाव इथं उपोषण केलं जाणार आहे. नाशिक जिल्ह्यात मुंगसरे, जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव आणि पुणे शहरात बालगंधर्व रंगमंदिर येथेही उपोषण होणार आहे. याशिवाय अर्क गावात उपोषणाची तयारी झाली आहे.
पदयात्रा
किनगाव (जळगाव) ते धुळे अशी 110 किमी अंतराची पदयात्रा करण्यात आली आहे. ही पदयात्रा 13 मार्चला निघाली आहे. आज (19 मार्चला) ही यात्रा धुळ्याला पोहोचणार आहे. आहे. या पदयात्रेत डॉ. राजीव बसरगेकर (नवी मुंबई, जिल्हा ठाणे), रामकिशन अप्पा रुद्राक्ष, (जवळाबाजार जिल्हा हिंगोली), सुभाष कच्छवे, (परभणी) बालाजी आबादार, (नांदेड), निळकंठ डांगे, (जवळा बाजार, जिल्हा हिंगोली.), सतीश गलांडे (परभणी), विठ्ठलदास डांगे, (कंधार जि नांदेड) आणि ऋतगंधा देशमुख, (जळगाव) सहभागी झाले आहेत.