Cow News : दिलासादायक! संकरीत गायीच्या पोटी देशी गाय, राहुरी कृषी विद्यापीठाचा यशस्वी प्रयोग
देशी गायींच्या (Cow) संवर्धनासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठानं (Mahatma Phule Krishi Vidyapeeth Rahuri) पुढाकार घेतला आहे.
Cow News : देशी गायींच्या (Cow) संवर्धनासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठानं (Mahatma Phule Krishi Vidyapeeth Rahuri) पुढाकार घेतला आहे. आता संकरीत गायींच्या पोटी सुदृढ आणि जास्त दूध देणाऱ्या गायींचा जन्म शक्य होणार आहे. राहुरी कृषी विद्यापिठात गिर गाईला जन्म देणारी संकरीत गाय पहिली सरोगसी मदर ठरली आहे. राज्यातील कृषी विद्यापीठातील राहुरी कृषी विद्यापीठानं रावबलेला हा पहिलाच प्रयोग आहे. हा प्रयोग तिथे यशस्वी सुद्धा झाला आहे. देशी गयींच्या संवर्धनासाठी राहुरी कृषी विद्यापीठानं एक पाऊल पुढे टाकलं आहे.
राहुरी कृषी विद्यापीठातील देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राने भ्रुण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करत पहिल्यांदाच गिर जातीच्या कालवडीचा जन्म झाला आहे. सदर प्रकल्प पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय पुणे येथे कार्यरत असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 28 ऑक्टोबर 2021 मध्ये या प्रगत तंत्रज्ञान वापराचा शुभारंभ करण्यात आला होता. सदर तंत्रज्ञानाच्या वापराने पहिल्याच गीर जातीच्या कालवडीचा जन्म संकरित गायीच्या माध्यमातून गो संशोधन व विकास प्रकल्प राहुरी इथे झाला आहे.
या प्रकल्पांतर्गत सुमारे 150 पेक्षा जास्त साहिवाल, गिर, राठी, थारपारकर आणि लाल सिंधी जातीच्या वासरांना जन्म दिला जाणार आहे. यामुळं उच्च वंशावळीचा देशी गोवंश आणि त्यांची संख्या वाढवण्यासाठी, संवर्धनासाठी खूप मोठी मदत होणार असल्याची माहिती देशी गाय संशोधन प्रकल्पाचे समन्वयक डॉ. विष्णू नरवडे यांनी दिली आहे. भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान हे देशासाठी आशेचा किरण असून या तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांच्या दारापर्यंत होणं अत्यंत गरजेचे आहे. देशामध्ये एकूण गाईच्या संख्येपैकी 75 टक्के गायी या गावठी स्वरुपात आढळत असून, फक्त 25 टक्के गायी शुद्ध स्वरुपात आहेत. त्यामुळं भविष्यात उच्च दर्जाच्या जलदगतीने गाई तयार करण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान ही काळाची गरज असल्याची माहिती डॉ. विष्णू नरवडे यांनी दिली.
भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान म्हणजे काय?
उत्कृष्ट अनुवंशिकता असलेल्या दाती गाईपासून कृत्रिमरीत्या स्त्रीबीज मिळवून त्यांचे प्रयोगशाळेत चांगला अनुवंशिकता असलेल्या वळूच्या वीर्यासोबत फलन करणे. तसेच त्यापासून तयार झालेल्या फलितांडाची (पोटेन्शियल झायगोट) सात दिवस वाढ करुन त्यापासून तयार झालेले भ्रूण हे कमी गुणवत्ता अथवा उत्पादन क्षमता असलेल्या प्राप्तकर्ता (Recepient) गायीमध्ये प्रस्थापित करुन त्याची वाढ करणे. त्यापासून उच्च दर्जाचे वासरु मिळवणे म्हणजे भ्रूण प्रत्यारोपण होय.
महत्त्वाच्या बातम्या: