Hingoli News: राज्याच्या बाजारात हिंगोलीच्या हळदीचा भाव (Turmeric Market) फिका पडला असून सोयाबीन पाठोपाठ आता हळदीची क्विंटल मागे दरघसरण सुरूच आहे. एप्रिल व मे महिन्यात 16 ते 17 हजार रुपयांवर गेलेला हळदीचा भाव उतरला असून तो 13000 रुपयांवर आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
राज्यात यंदा रेकॉर्ड ब्रेक हळदीची आवक व विक्री झाली. सांगली, हिंगोली, वसमत येथे बाजार समितीच्या बाहेर लांबच लांब वाहनांची रांग लागल्याचे दिसले. मात्र खरीप हंगामाच्या सुरुवातीला हळदीची आवक मंदावली असून लोकलसह राजापुरी हळद केवळ 13 हजारांवर विकली जात आहे. 18 ते 19 हजार रुपयांवर असणाऱ्या हळदीची वेगाने घसरण सुरू झाली असून आवकही मंदावल्याचे चित्र आहे.
हळदीची आवक मंदावली
मागील दोन दिवसात राज्यात एकूण 4700 क्विंटल हळदीची आवक झाली. यावेळी मिळणाऱ्या सर्वसाधारण भाव हा 12 ते 14 हजारांवर असून हिंगोलीत लोकल हळदीला अवघे 12500 प्रतिक्विंटल भाव मिळाल्याचे दिसून आले.
गेल्या चार दिवसात हळदीची आवक कशी होती?
मागील चार दिवसात हिंगोलीत हळदीची आवक मंदावली असून किमतीत चढउतार दिसून आला. बुधवारी लोकल हळदीची आवक १४५० क्विंटल होती. यावेळी सर्वसाधारण १२५०० ते १३००० रुपयांचा भाव हळदीला मिळाला. त्याआधीदेखील हळदीची आवक साधारणपणे ५१५ क्विंटल ते ८०० क्विंटलच्या मध्ये होती. तर मिळणार दर सर्वसाधारण १२ ते १४ हजारांपर्यंतच असल्याचे पणन विभागाने सांगितले.
सोयाबीनचा भाव वाढणार कधी?
जिल्ह्यात सोयाबीनदराची ही कोंडी कायम असल्याचे दिसून येत असून सोयाबीन ने अजून 5000 चा पल्लाही गाठलेला नाही. गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने तसेच पिवळा मोझॅक प्रादुर्भाव झाल्याने जिल्ह्यातील सोयाबीन पिवळे पडले. काही दिवसात भाव वाढतील म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणुकीला पसंती दिली. मात्र सहा सात महिन्यांनंतरही सोयाबीन दर कोंडी कायम असल्याचे दिसून येत आहे.
हळदीची विक्रमी आवक
यंदा हळदीची विक्रमी आवक झाल्याचे चित्र होते. हिंगोलीसह सांगली, वसमत, तसेच विदर्भातील वाशिम, यवतमाळ , वर्धा जिल्ह्यातूनही हळदीची आवक झाली होती. परंतू जुन महिन्याच्या सुरुवातीपासून हळदीच्या भावात घसरण सुरु झाली असून १६ ते १७ हजार रुपयांवर असणारे भाव आता १२ ते १३ हजारांवर आले आहेत.
हेही वाचा:
मिश्र शेतीचा चमत्कार! वर्षाला शेतकरी कमवतोय 15 लाख रुपये, नेमकं कसं केलं नियोजन?