चंद्रपूर : रानतळोधी हे ताडोबा (Tadoba Tiger Reserve) व्याघ्रप्रकल्पातील कोर झोन मध्ये असलेलं शेवटचं गाव असून या गावाच्या व्याघ्र प्रकल्पाबाहेर पुनर्वसनाचं काम आता अंतिम टप्प्यात आहे. या पुनर्वसनामुळे स्थानिक गावकरी आणि वनविभाग यांना मोठा फायदा होणार आहे.


जेसीबी लावून  घरं पाडून त्या जागी तयार केली जात असलेली मोकळी मैदानं पाहून कुणालाही वेदना होऊ शकतात . मात्र ही घरं आणि शेतं  स्वखुशीने रानतळोधी या गावातून गावकऱ्यांनी स्थलांतरित केली आहेत.  ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोन मधील 5 गावं आधीच स्थलांतरित झाली आहेत. मात्र 2001 पासून स्थलांतरणाला विरोध करणाऱ्या रानतळोधी गावाने सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार पुनर्वसनाचा प्रस्ताव स्वीकारला आणि लोकांनी स्वखुशीने आपली घरं आणि शेती वनविभागाच्या ताब्यात दिली.


स्वखुशीने आपली घरं आणि शेती देणाऱ्या रानतळोधी च्या गावकऱ्यांना वनविभागाने बाबा आमटे यांच्या आनंदवन जवळ असलेल्या 374 हेक्टर जागेत पुनर्वसित करायला सुरुवात केली आहे. ही जागा वरोरा-चिमूर महामार्गाच्या लगत आहे.  



  • प्रत्येक गावकऱ्याला 5 एकर शेतजमीन देण्यात आली आहे

  • या शिवाय घरासाठी 2 हजार स्क्वेअर फूट जमीन

  • घरासाठी प्रति व्यक्ती 3 लाख 75 हजारांचं अनुदान

  • प्रति व्यक्ती शेती साठी 1 लाख आणि बोरिंग साठी 1 लाख

  • गावकऱ्यांना दिलेली जमीन शेती योग्य करून देणे

  • सर्व शेतांना पांदण रस्ते आणि सोलर फेंसिंग यासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.


वनविभागाला देखील मोठा फायदा होणार


लवकरच एक खासगी बँक या गावातील प्रत्येक शेतकऱ्याला शेततळी बांधून देणार आहे. सोबतच या पुनर्वसित गावात वनविभागाने रस्ता, पाणी, इलेक्ट्रिसिटी या सारख्या मूलभूत सुविधा देण्यासोबतच ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि समाज भवन बांधून दिलंय. रानतळोधी गावाच्या पुनर्वसनामुळे वनविभागाला देखील मोठा फायदा होणार आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोर एरिया यामुळे पूर्णपणे निर्मनुष्य होणार असून यामुळे वाघांना आणि इतर वन्यप्राण्यांना मोठं क्षेत्र अधिवासासाठी उपलब्ध होणार आहे.


पुनर्वसनासाठी 23 वर्षे उशीर


पुनर्वसनामुळे घनदाट जंगलात असलेलं रानतळोधी हे गाव आता अवघ्या 5 किलोमीटर वर असलेल्या वरोरा शहरासोबत जोडलं गेलं आहे. मात्र रानतळोधी गावाच्या पुनर्वसनासाठी लागलेला 23 वर्षांचा उशीर प्रशासनातील अनेक उणिवांवर नक्कीच बोट ठेवणारा आहे.


हे ही वाचा :


नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी आजपासून पुढील तीन महिने राहणार बंद; नेमकं कारण काय?