Success Story:नोकरीसाठी भटकंती थांबवली, नांदेडच्या शेतकऱ्यानं 3 एकरातील पपईतून काढले 15 लाख!
नोकरी मिळणं अवघड असताना या तरुणाला शेतीनंच तारलं आहे. उच्चशिक्षित तरुणानं नोकरीच्या मागे धावणं थांबवत पपई लागवडीतून वर्षाला 15 लाख रुपये कमवत आपला मार्ग शोधून काढलाय.
Farming Success Story: राज्यातलं सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण लक्षणीय आहे. पण नोकरीच्या मागं पळण्यापेक्षा शेतीतून कमाई करावी असं किती जणांच्या मनात येत असेल? नांदेडमधल्या लालबा जाधव या शेतकऱ्यानं आता बेरोजगारीवर उपाय शोधून काढलाय. उच्चशिक्षित तरुणानं नोकरीच्या मागे धावणं थांबवत पपई लागवडीतून वर्षाला 15 लाख रुपये कमवत आपला मार्ग शोधून काढलाय. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पांगरीचा हा शेतकरी आहे. उच्चशिक्षण घेतलं असलं तरी नोकरीच्या मागं न लागता त्यानं पपई लागवड करत चांगली कमाई केली आहे.
लालबा जाधव या तरुण शेतकऱ्यानं डीएड आणि बीएड आणि पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. पदवीनंतर दोन तीन वर्ष नोकरीसाठी वणवण भटकले. पण नोकरी न मिळाल्यानं या तरुणानं शेती करण्याचा निर्धार केला. काहीतरी वेगळा प्रयोग करावा या उद्देशानं १२ एकरापैकी ३ एकरात पपईची लागवड करून पाहिली. ही लागवड यशस्वी झाली आणि समाधानकारक उत्पन्न कमवत पारंपरिक पिकांमधूनही भरघोस उत्पन्न मिळवलंय.
नोकरी मिळणं झालं अवघड, शेवटी शेतीनंच तारलं
दरवर्षी विद्यापिठातून पदवी मिळवणाऱ्या असंख्य पदवीधरांमध्ये नोकरीचा प्रश्न गंभीर झालाय. बाहेर निघणाऱ्या तरुणांना देण्यासाठी नोकऱ्या कमी असल्यानं त्यांच्या नोकरीसह लग्नाचाही प्रश्न समोर आला आहे. आता काहीतरी पर्याय काढायचा निर्धार करत लालबा जाधव यांनी ३ एकरात पपई लागवड केली. यातून आता त्यांना १३ ते १५ लाख रुपयांची कमाई मिळते. त्यामुळं नोकरी मिळणं अवघड असताना या तरुणाला शेतीनंच तारलं आहे. यासाठी नगर जिल्ह्यातून त्यांनी २७०० पपईची रोपं आणली. सध्या बाजारात १५ ते १६ रुपयांचा भाव एका पपईला मिळत असल्याचं ते सांगतात.
पपईसोबत केळी, हळद अन् सोयाबीनही
लालबा जाधव यांची एकूण १२ एकर जमिन आहे. त्यातील ३ एकरावर पपई लावली असून उर्वरित क्षेत्रात त्यांनी केळी, हळद आणि सोयाबीनही लावलं आहे. त्यातूनही भरघोस उत्पन्न मिळवत त्यांनी आर्थिक प्रगती साधली आहे. पारंपरिक पिकांसह पपईची लागवड या शेतकऱ्यानं केली आहे. या पपईच्या उत्पादनातून लालबा जाधव हे वर्षाकाठी तब्बल 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. ते त्यांच्या घरच्या तीन एकर शेतीमध्ये दरवर्षी पपईची लागवड करतात. यावर्षी देखील पपईला चांगली मागणी मिळाल्यामुळे या शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न मिळाले आहे.
अवकाळीनं पपईला बसला फटका
काही महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने लालबा जाधव यांच्या पपईला मोठा फटका बसला होता. पपईची लागवड ते माल काढणीपर्यंत 19 महिने पपईने भरभरून साथ दिली आज तिचा शेवटी दिवस पपईचा निरोप घेताना असे लिहीत या शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर याबाबत माहितीही दिली होती.