Dhule Farmer News : भारनियमनामुळं धुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात, डोळ्यादेखत हातातोंडाशी आलेला घास जातोय वाया
सध्या राज्यात भारनियमन सुरु आहे. या भारनियमनामुळं पिकांना पाणी मिळत नसल्यानं पिके मोठ्या प्रमाणावर जळत असल्याचे चित्र दिसत आहे.
Dhule Farmer News : एकीकडे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशातच आता दुसरीकडे राज्यात भारनियमन सुरु आहे. या भारनियमनामुळं पिकांना पाणी मिळत नसल्यानं पिके मोठ्या प्रमाणावर जळत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा मोठे संकट उभं राहिलंय. भारनियमनामुळं धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत वाया जात आहे.
जिल्ह्यात गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिट झाली होती. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. असे असताना दुसरीकडे मात्र वीज पुरवठ्याचे नियोजन बिघडल्याने भारनियमन सुरु झाले आहे. यामुळे पुरेशा पाण्याअभावी उन्हाळी पिके मोठ्या प्रमाणावर जळत आहेत. रात्री-अपरात्री वीजपुरवठा होत असताना शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. वीज बिल थकीत असणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम वीज वितरण कंपनीने सुरु केली आहे. कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्यामुळं जिल्ह्यात रब्बी हंगाम आणि उन्हाळी पिके धोक्यात आली आहेत. वीजबिल थकीत असलेल्या आणि घरगुती कनेक्शन धारकांचा वीज पुरवठा खंडित करण्याबाबत राज्य सरकारच्या सक्तीच्या आदेशावर महावितरण विभागाने कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर धास्ती निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरणी केली होती. मात्र, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल झाला नव्हता. सुरुवातीला कांदा, मूग, उडीद या पिकांवर विषाणूंचा प्रादुर्भाव झाला असताना शेतकऱ्यांच्या हातातील पीक हिरावली होती. तसेच कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं उभ्या पिकावर नांगर फिरवावा लागला होता. आर्थिक संकटात असतानाही शेतकऱ्यांनी मोठ्या हिंमतीने रब्बी हंगामात पेरणी केली होती. उन्हाळी पिके घेण्याची तयारी केली असतानाच विजेअभावी पाणी देता येत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी पुरता हतबल झाला आहे. राज्य सरकारने दिवसाला पंधरा तास वीजपुरवठा करावा, तरच आम्ही आमची उपजीविका भागवू शकतो अशी विनंती शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: