Farmer Success: माजी सनदी अधिकाऱ्यानं दीड एकरात आल्यातून कमावले 10 लाखांचे उत्पन्न, एकरी खर्च किती लागला? कसं वाढवलं उत्पन्न ?
शेतीत नियोजन, योग्य पीक निवड आणि बाजाराची जाण असेल, तर कमी क्षेत्रातही मोठे यश मिळवणे शक्य आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे किवळ आणि आसपासच्या परिसरात आले पिकाबद्दल नवीन उत्सुकता निर्माण झाली आहे.

Satara Farmer Success: साताऱ्यातील कऱ्हाड तालुक्यातल्या किवळ येथील तानाजीराव साळुंखे हे नाव आज परिसरातील शेतकरयाची सध्या गावात एकच चर्चाय हा शेतकरी सध्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सनदी अधिकारी म्हणून दीर्घकाळ प्रशासकीय सेवेत राहिल्यानंतर त्यांनी निवृत्तीनंतर जीवनातील नवा अध्याय सुरू करण्याचे ठरवले आणि ते थेट शेतीत उतरले. कमी पाण्यावर येणारं नगदी पीक म्हणून तानाजीराव साळुंखे यांनी दीड एकरात आल्याची लागवड केली. आता ते एकरी 10 लाख रुपयांचं विक्रमी उत्पन्न कमावतायत. मातीशी असलेली ओळख, शेताशी असलेलं नातं, आणि काहीतरी नवीन करून दाखवण्याची इच्छा या भावनांमधूनच त्यांच्या कृषीप्रवासाची सुरुवात झाली. (Agriculture Success)
दीड एकरातून 10 लाख कमावले
शेतीकडे पाहताना त्यांनी सर्वप्रथम जमिनीची क्षमता, परिसरातील हवामान, पाण्याची उपलब्धता आणि बाजारपेठेच्या गरजा यांचा अभ्यास केला. ऊस हे पारंपरिक, पण पाणीखाऊ पीक बाजूला सारून त्यांनी ‘सातारी आले’ या नगदी पिकावर भर दिला. आले हे पिक एकीकडे परिश्रम व व्यवस्थापन मागते, पण योग्य तंत्रज्ञान आणि मातीची योग्य तयारी केली, तर ते चांगले आर्थिक उत्पन्न देऊ शकते यावर त्यांचा विश्वास होता.
साळुंखे यांनी मुरमाड आणि निचरा होणाऱ्या जमिनीची निवड केली. जमिनीची दोनदा नांगरट, दोनदा फणसणी करून ती भुसभुशीत केली. सेंद्रिय खतांचा विपुल वापर करून त्यांनी जमिनीची सुपीकता वाढवली. साडेचार फुटांच्या अंतराने उथळ सरी सोडून बेड तयार केले आणि या बेडवर आलेची लागवड करण्यात आली. एकरी खर्च तब्बल 3 लाखांच्या घरात गेला, परंतु पीक व्यवस्थापनात त्यांनी कुठेही तडजोड केली नाही. चांगले उत्पन्न मिळाल्याने 10 लाखांचे उत्पन्न निघण्यास मदत झाली. ७५ गाड्यांची आले विक्री झाली.
सातारी आल्याची कमाल!
या काटेकोर नियोजनाचा फायदा म्हणून अवघ्या दीड एकर क्षेत्रातून तब्बल 75 गाड्या आल्याचे उत्पादन तयार झाले. उत्पन्नाच्या दृष्टीने पाहता, त्यांना 10 लाखांपर्यंतची रक्कम झाली. मात्र येथूनच खरी अडचण सुरू झाली.बाजारातील व्यापाऱ्यांनी ‘जुनं’ आणि ‘नवं’ असे दर ठरवून आल्यात भेदभाव केला. जुन्या आल्याला 18 हजार तर नव्या आल्याला 12 हजार रुपये दर मिळत असल्याने एकूण नफ्यावर परिणाम झाला. तरीही अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन मिळाल्याने त्यांचा प्रयोग यशस्वी ठरला.
साळुंखे यांची ही कहाणी म्हणजे केवळ पिकाच्या यशाची गोष्ट नाही, तर एक निवृत्त अधिकाऱ्याने निवृत्तीनंतर केलेल्या शेती प्रयोगाची आहे. शेतीच्या भावांमुळे एकीकडे राजकीय वातावरण तापत असताना स्वतः एखादा प्रयोग करून पाहावा असं वाटण्या मागची ही गोष्टय. त्यांच्या शेताला आज परिसरातील अनेक शेतकरी भेट देत आहेत. आले पिकाची लागवड, व्यवस्थापन, बाजारपेठेची माहिती आणि पाण्यावरील बचत याबाबत ते मार्गदर्शन घेत आहेत.साळुंखे यांचा अनुभव स्पष्ट सांगतो शेतीत नियोजन, योग्य पीक निवड आणि बाजाराची जाण असेल, तर कमी क्षेत्रातही मोठे यश मिळवणे शक्य आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे किवळ आणि आसपासच्या परिसरात आले पिकाबद्दल नवीन उत्सुकता निर्माण झाली आहे.























