(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अबब! गाढवाचं दूध विकण्यासाठी सरकारी नोकरीचं स्वप्न सोडलं, महिन्याकाठी हा शेतकरी कमवतो 3 लाख रुपये
जगभरातील सौंदर्यप्रसाधनांच्या अनेक औषधांमध्ये गाढवाचं दूध वापरलं जातं. त्यामुळे विदेशातूनही या दूधाला मोठी मागणी आहे.
Farmer success story: सध्या बेरोजगारीची संख्या वेगाने वाढत असली तरी सरकारी नोकरीचं स्वप्न कित्येक जणांच्या मनात असतंच. पण भारतातल्याच एका शेतकऱ्यांनं गाढवाचं दूध विकण्यासाठी आपलं सरकारी नोकरीचं स्वप्न सोडलंय. हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटू शकेल. शतकानुशतकं गाढवाला दिलेल्या उपमा आणि स्वरुपाला छेद देत हा शेतकरी गाढवाच्या दुधाची विक्री करत महिन्याकाठी 3 लाख रुपये कमवत आहे. गुजरातच्या धीरेन सोळंकी यांनी पाटण जिल्ह्यात ४२ गाढवांचा एक गोठा तयार केलाय. दक्षिणेतील राज्यांना आणि कॉस्मेटिक्स क्षेत्रातील कंपन्यांना गाढवाचे दुध पुरवत लाखो रुपये कमवत आहे.
त्यांच्या प्रवासाविषयी सांगताना ते सांगतात, "जर मी सरकारी शिक्षक झालो असतो तर महिन्याला ३० हजार कमवले असते. आता एवढी रक्कम तर मी दर तीन दिवसाला कमवतो. बिजनेस टुडेला सांगिलेल्या माहितीनुसार, हा तरुण सरकारी नोकरीच्या शोधात होता. नोकरी करत कुटुंबाचा खर्च भागणार नाही हे कळल्यावर दक्षिण भारतात गाढव पालनाबद्दल माहिती मिळाल्याचे ते सांगतात. काही लोकांशी बोलून 8 महिन्यांपूर्वी गाढवांचे फार्म सुरु केल्याचे त्यांनी सांगितलं.
गुजरातमध्ये केला गाढवाच्या दुधाचा व्यवसाय
गुजरातमध्ये राहणाऱ्या या तरुण शेतकऱ्याला त्याच्या राज्यात गाढवाचा व्यवसाय करणं तसं कठीण होतं. कारण या भागात गाढवाच्या दूधाला फारशी मागणी नाही. त्यामुळे हा व्यवसाय सुरु केल्यानंतर पहिल्या पाच महिन्यात त्यांनी काहीही कमावलं नाही. आता व्यवसाय तर सुरु केलाय, म्हटल्यावर गाढवाचं दुध विकायचं कसं असा मोठा प्रश्न धीरेन यांना पडला होता. त्यासाठी त्यांनी हातपाय हलवायला सुरुवात केली. हा माल विकण्यसाठी त्यांनी कर्नाटक आणि केरळमधील कंपन्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. या भागात असणाऱ्या सौदर्यप्रसाधनाच्या अनेक कंपन्यांना त्यांच्या उत्पादनासाठी गाढवाचं दुध लागतं. याची मागणी कमी असल्याने याला कोणत्याही गोवंश दुधापेक्षा प्रचंड अधिक भाव मिळतो.
२०२१ च्या सुरुवातीस त्याच्या वडिलांनी कर्नाटक आणि केरळात असणाऱ्या गाढवपालनाच्या व्यवसायाबद्दल वाचले. गाढवपालनाची संकल्पना तशी उत्तर भारतात फारशी न रुजलेली. त्यामुळं लोकप्रीयताही तशी कमीच. देशात गाढवाच्या दुधाला मागणी नसली तरी मलेशिया, तुर्की आणि चीनसारच्या देशांमध्ये या दुधाला मोठी मागणी आहे. गाई-म्हशींच्या दुधाला लिटरमागे 60 रुपये मिळत असल्याने हैराण असलेले शेतकरी त्यांनी जवळून पाहिलेले होते. पण त्याचवेळी ३५०० रुपये लिटरने विकले जाणारे गाढवाच्या दुधाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असल्याने त्यांनी या व्यवसायात उडी टाकली. आता महिन्याकाठी या शेतकऱ्यांची कमाई ३ लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
गाढवाच्या दुधाचे अनेक फायदे
प्राचीन काळापासून गाढवाच्या दुधाचा जगभरात मोठा वापर होता. इजिप्तची राणी तर या दुधात स्नान करायची असे संदर्भ सापडतात. वैद्यकशास्त्रातही या दुधाला यकृताच्या समस्यांसह संसर्गजन्य आजारांमध्ये औषध म्हणून गाढवाच्या दुधाची शिफारस केली जायची. अमेरिकेच्या राष्ट्रीय वाचनालयाच्या अहवालानुसार, गाढवाच्या दुधाची रचना ही मानवी दुधासारखीच असते,त्यामुळेच लहान मुलांसाठी विशेषत: ज्यांना गाईच्या दुधाची ॲलर्जी आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय समजला जातो.
पहिल्या वर्षी झाला तोटा
व्यवसाय सुरु केल्यानंतर हे दुध विकायचे कसे हेच माहित नसल्याने तब्बल ४० लिटर दूध नाल्यात फेकून देण्याची धीरेनवर वेळ आली. मग या दुधाची पावडर बनवत या दुधाची वाहतूक करता येऊ शकते. हे त्यांच्या लक्षात आले. आणि त्यानंतर परदेशात वाहतूक करण्याचा पर्याय खूला झाला. आता आंतरराष्ट्रीय बाजारातही धीरेन यांच्याकडून गाढवाच्या दुधाची पावडर ६३ हजार रुपये किलो दराने विकली जाते.
जगभरातील सौंदर्यप्रसाधनांमध्ये गाढवाचं दुध वापरतात.
जगभरातील सौंदर्यप्रसाधनांच्या अनेक औषधांमध्ये गाढवाचं दूध वापरलं जातं. त्यामुळे विदेशातूनही या दूधाला मोठी मागणी आहे. या दुधाचं उत्पादन कमी असल्याने या दुधाला प्रचंड किंमत मिळते. गुजरातच्या धिरेन कुमार यांना ही संधी दिसली. आणि अवघ्या २० गाढवांच्या फार्मपासून सुरुवात करत हळूहळू त्यांनी व्यवसाय वाढवलो. यासाठी सुरुवातीला साधारण ३७ लाख रुपयांचा त्यांना खर्च आला.
हेही वाचा:
नोकरी सोडून पिकवली कोरफड, साताऱ्याच्या युवा शेतकऱ्याची वार्षिक उलाढाल तब्बल 3.5 कोटी!