Maharashtra News : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात (Shahade Taluka) मोठ्या प्रमाणात केळीची लागवड (Plantation of Banana) केली जात असते. मात्र यावर्षी सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव (Outbreak of CMV Disease) झाल्यानं शेतकऱ्यांवर आपल्या केळीच्या बागांवर रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे. तर काही शेतकऱ्यांनी आपल्या केळीच्या बागांमध्ये जनावरे चारण्यासाठी सोडली आहेत. खेडदिगर परिसरात याचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. 


नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. यावर्षी केळी पिकांवर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव झाला असून केळीच्या बागा काढण्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांसमोर नसून खेडदिगर येथील  शेतकरी सुनिल पाटील यांनी आपल्या पाच एकर क्षेत्रावरील केळीच्या बागेवर रोटावेटर फिरवला आहे. त्यांनी केळीच्या बागेसाठी आतापर्यंत केलेला साडेपाच लाखांचा खर्च वाया गेल्यानं ते कर्जबाजारी झाले आहेत. शासनानं केळी उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.




सीएमव्ही रोगाची लक्षणं काय? 



  • हरित द्रव्य (इन्फेक्शियस क्लोरोसिस) लोप पावणं हे मुख्य लक्षणं आहे.

  • पानांवर पिवळसर रेषा, सोनेरी पट्टे किंवा अनियमित पट्टे दिसून येतात.

  • पोंगे किंवा पोंग्याच्या जवळील पानं कुजतात.

  • झाडांची वाढ खुंटून कालांतरानं झाड मरतं

  • या रोगाचा प्राथमिक प्रादुर्भाव कंदामार्फत तर दुय्यम प्रादुर्भाव मावा किडीमार्फत होतो.


शहादा तालुक्याच्या आसपासच्या परिसरातील काही शेतकऱ्यांनी आपल्या केळीच्या बागांमध्ये जनावरं चारण्यासाठी सोडल्याचं भीषण वास्तव दिसून येत आहे. संबंधित रोप पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी, सरकारच्या कृषी विभागनं या रोगावर संशोधन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून पीक वाचवण्यासाठी पुढे यावं, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


राज्यातील एकूण क्षेत्राच्या 80 टक्के केळी उत्पादन खानदेशात घेतलं जातं. केळींवर दरवर्षी विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यानं द्राक्ष, हळद या पिकांप्रमाणे केळी पिकासाठीही शासकीय संशोधन केंद्र सुरू करण्याची मागणीही यावेळी एबीपी माझाशी बोलताना शेतकऱ्यांनी केली आहे. तर सीएमव्हींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनानं आर्थिक सहाय्य करण्याची गरज असल्याचंही मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :