Green chillies Price : सध्या बाजारात हिरव्या मिरचीला (Green chillies) चांगला दर मिळत आहे. याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. सध्या नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील बाजारात हिरव्या मिरचीला प्रतिकिलो 30 ते 40 रुपयांचा दर मिळत आहे. चांगला दर मिळत असल्यानं मिरची उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे.  


नंदूरबार जिल्ह्यातून लाल मिरची सोबतच हिरवी मिरची देखील देशातल्या विविध भागात पाठवली जाते.  राज्यातील सर्वात मोठे मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. दरम्यान, सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. याचा परिणाम मिरचीच्या उत्पादनावर झाला आहे. तसेच बाजारात होणारी आवक देखील मंदावली आहे. त्यामुळं मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. नंदूरबार जिल्ह्यातील हिरव्या मिरचीला मोठ्या प्रमाणात मुंबई, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये मागणी वाढल्यानं व्यापारी मिरची खरेदीसाठी जिल्ह्यात येत आहेत. शेतकऱ्यांना मिरचीच्या प्रतवारीनुसार 30 ते 40 रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. या मिळणाऱ्या दराबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. असाच दर कायम राहण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.




नंदुरबार मधील मिरची मार्केट संपुर्ण देशात प्रसिद्ध


नंदुरबार मधील मिरची मार्केट संपुर्ण देशात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यामधील मिरचीला महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात व मध्य प्रदेश राज्यात देखील मोठी प्रमाणात मागणी आहे. नंदुरबार मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक होत असल्यानं शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळतो. त्यामुळं शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गही सुखावला आहे. नंदूरबारमधील मिर्ची मार्केट मध्ये यंदा चांगल्या दर्जाची मिर्ची दाखल झाली आहे. तेजा ,व्ही एन आर,अरुणीम ,कळस,जरेला,लाली अश्या नवीन प्रकारच्या वाणांची मिरची बाजारात दाखल झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत शंकेश्वर जातीच्या मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. आता मात्र, यामध्ये बदल होत आहे. या मिरचीचे उत्पादन घटत असून आता जिल्ह्यात तेजा, व्हीएनआर, अरुणीम, कळस, लाली या वाणांच्या मिरचीची लागवड केली जात आहे. मिरचीचे मोठे उत्दान होत असल्यानं नंदूरबारच्या बाजारात परिसरातील महिला मजूरांच्या हाताला कामही मिळत आहे.


ढगाळ वातावरण आणि पावसामुळे मिरचीवर बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता


नंदुरबार जिल्ह्यात आणि शेजारील सीमा वरती भागातील गुजरात आणि मध्य प्रदेशातील परिसरात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली जाते. या भागातील मिरची चवीला अधिक तिखट आणि चवदार असल्याने ह्या मिरचीला मोठ्या प्रमाणात देशभरात मागणी असते. मात्र, गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळं इतर भागात मिरचीचे नुकसान झाले आहे. त्यामुळं गुजरातमधील मोठ्या शहरातील बाजारपेठेत मिरचीची आवक कमी झाल्यानं आणि दुसरीकडे मुंबईतही मागणी वाढल्यानं मिरचीचे दर यावर्षी आतापर्यंत स्थिर आहेत हिरव्या मिरचीला मोठ्या प्रमाणात मागणी असून चाळीस रुपये प्रति किलोनं व्यापारी जागेवर मिरचीची खरेदी करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे तर दुसरीकडे ढगाळ वातावरण आणि पावसामुळे मिरची पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांचे चिंता वाढली आहे. एकीकडे चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे तर दुसरीकडे ढगाळ वातावरण आणि सततच्या पावसामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव ही चिंता दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था कधी खुशी कभी गम अशी झाली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: