Amravati : नाफेड खरेदी बंदमुळे हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत
Farmer Problems : जून महिना सुरू झाला की शेतकऱ्यांची लगबग सुरू होते ती खरीप पेरणीची. यासाठी शेतकऱ्यांना पैसे लागतात. पण सध्या हरबरा उत्पादक शेतकऱ्यांकडे पैसेच नसल्याने ते अडचणीत आले आहेत.
Farmer Problems : जून महिना सुरू झाला की शेतकऱ्यांची लगबग सुरू होते ती खरीप पेरणीची. यासाठी शेतकऱ्यांना पैसे लागतात. पण सध्या हरबरा उत्पादक शेतकऱ्यांकडे पैसेच नसल्याने ते अडचणीत आले आहेत. कारण या शेतकऱ्यांचा हरबरा घरातच पडून आहे. नाफेडचं पोर्टल बंद झाल्याने खरेदी बंद असल्याने हरबरा घरातच पडून आहे. यावर सरकारने तातडीने उपाय योजना कराव्या अशी मागणी शेतकरी करत आहे तर राज्यमंत्री बच्चू कडूनी थेट मुख्यमंत्र्यांनाच इशारा दिला आहे.
सध्या धान्य आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. केंद्र सरकारने जे खरेदीचे लक्षांक दिले ते कमी आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात एक लाख हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. पण आता केंद्र सरकारने खरेदीसाठी हात वर केले. धान उत्पादक शेतकरी देखील 4 ते 5 लाख असून केंद्र सरकार धान खरेदी बंद करत आहे. केंद्राने खरेदी सुरू करावी याकरिता मुख्यमंत्री आणि शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पाहिजे, अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलीय. खरेदी होत नसेल तर किमान चार हजार रुपये प्रति एकर मदत हरभरा आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशी मागणी ही त्यांनी केली.
अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव तालुक्यातील चिंचपूर येथील अभिजित लांबाडे.. यांच्याकडे 5 एकर शेती आहे. त्यांनी पाच एकरात हरबरा लागवड केली आणि त्यांना 30 क्विंटल हरबरा झाला. यासाठी त्यांना एक लाख रुपये खर्च आला. हाच हरभरा विकून त्यांना आईचा उपचार आणि खरीप पेरणी करायची. त्यामुळे त्यांनी नाफेड मध्ये 5 मे रोजी नोंदणी केली आणि 2 जून रोजी त्यांना मॅसेज आला हरबरा घेऊन या पण त्याच दिवशी त्यांना फोन आला की पोर्टल बंद असल्याने पुढील आदेशापर्यंत आणू नका, असं त्यांना सांगण्यात आले. आता काय करायचं असा प्रश्न त्यांना पडला.
हीच परिस्थिती आहे जवळा पट येथील पराग राऊत यांची आहे. पराग राऊत यांनी तर आपलं 70 क्विंटल हरबरा वाहनात भरला होता पण त्यांना ही फोन आला की, पोर्टल बंद असल्याने हरबरा आणू नका. पराग राऊत यांच्याकडे 20 एकर शेती आहे. त्यापैकी त्यांनी 10 एकरात हरबरा लागवड केली. यामधून त्यांना 70 क्विंटल हरबरा झाला पण आता ह्या हरभऱ्याच् करायचं काय असा प्रश्न त्यांना पडला आहे. बाजारात हरभऱ्याच दर 4100 रुपये क्विंटल आहे तर नाफेड मध्ये याचं दर 5250 रुपये असल्याने शेतकरी इथंच हरबरा विकण्यासाठी प्राधान्य देतो पण सरकारच्या या गलथान कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे.. आता यावर राज्यमंत्री बच्चू कडूच काही करू शकतात अशी अपेक्षा या शेतकऱ्यांना आहे.