Amravati Farmer: अमरावतीच्या शेतकऱ्याला 'जगजीवन राम अभिनव किसान' राष्ट्रीय पुरस्कार, केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
अमरावती जिल्ह्यातील म्हसला (ता. बडनेरा) येथील शेतकरी रविंद्र मेटकर यांना 'जगजीवन राम अभिनव किसान' राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
Amravati Farmer : शेतात नाविण्यपूर्ण प्रयोग करणारे अमरावती (Amravati )जिल्ह्यातील म्हसला (ता. बडनेरा) येथील शेतकरी रविंद्र मेटकर यांना 'जगजीवन राम अभिनव किसान' राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते मेटकर यांनी नवी दिल्लीत सन्मानित करण्यात आलं. तसेच सोलापूरातील 'डाळींब संशोधन संस्था' आणि बारामती येथून प्रकाशित होणारं 'सुफलाम' या प्रकाशनाला केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांच्या हस्ते पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीनं 'भारतीय कृषी संशोधन परिषदेचा 94 व्या स्थापना दिवसाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री तोमर, केंद्रीय मत्स्य पालन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रूपाला, केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी, निती आयोगाचे सदस्य डॉ. रमेश चंद्र, आईसीएआर चे महासंचालक त्रिलोचन महापात्र उपस्थित होते. राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शेतीमध्ये विविध प्रयोग करणारे शेतकरी, वैज्ञानिक, संशोधन संस्था, शेतीशी निगडीत प्रकाशन संस्थांना वर्ष 2021 च्या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
नाविण्यपूर्ण प्रयोग करणारे शेतकरी रविंद्र मेटकर
रविंद्र मेटकर हे शेतीसोबत शेतीपुरक व्यवसाय करतात. मेटकर यांनी आपल्या शेतामध्ये कुक्कुटपालन केले आहे. त्यांच्याकडे दिड लाख अंकोंबड्या असून यातून त्यांना दिवसाला 90, हजार अंडी मिळतात. या अंडयांची विक्री ते मध्यप्रदेश आणि अमरावती जिल्ह्यात करतात. तसेच कोंबड्यांच्या विष्ठेचा उपयोग ते आपल्या शेतात सेंद्रीय खत म्हणून करतात. यामुळं पिकांच्या गुणवत्तेत आणि उत्पादनात भरघोस वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांनी जोड व्यवसाय करावा जेणेकरुन खेळता पैसा त्यांच्याकडे राहील आणि उत्पन्नात वाढ होईल असे आवाहन यावेळी मेटकर यांनी केलं. मेटकर यांना या त्यांच्या कामासाठी जगजीवन राम अभिनव किसान राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यात आलं. या पुरस्काराचे स्वरुप 1 लाख रुपये रोख आणि प्रशस्ती पत्र असे आहे.
सोलापूरच्या राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्राला वसंतराव नाईक राष्ट्रीय पुरस्कार
दरम्यान, कोरडवाहू क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संस्थांना वसंतराव नाईक राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. राज्यातील सोलापूर येथील 'राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्राला' वर्ष 2021 च्या वसंतराव नाईक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे यांनी स्वीकारला. डाळींब उत्पादनामुळं कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या परिस्थीतीमध्ये आमुलाग्र बदल झाला असल्याचे मराठे यांनी सांगितलं. 1980 च्या दशकात राज्यातील सांगोला येथे प्रथमत: डाळींबांची लागवड करण्यात आली. 5 ते 10 हजार रुपये कमवणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात यामुळं लाखांची वाढ झाली.सोलापूर येथील संशोधन केंद्राने येथील स्थानिक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यात हातभार लावला असल्याचे मनोगत मराठे यांनी यावेळी सांगितलं.
शेतीशी निगडीत प्रकाशन संस्थांना 'गणेश शंकर विद्यार्थी' या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पुणे जिल्ह्यातील बारामती येथील 'राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस व्यवस्थापन संस्थे'च्यावतीने प्रकाशित होणाऱ्या 'सुफलाम' या हिंदी पत्रिकेला यावेळी सन्मानित करण्यात आलं. या पत्रिकेचे संपादक पाठक आणि डॉ. अजय कुमार सिंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला.