Agriculture News : 'सीनाकाठचा' बळीराजा संकटात, ऊसाच्या शेतात सोडली जनावरे; उजनी धरण प्रशासनाचा ढिसाळ कारभार
सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा तालुक्यातील 'सीना नदीकाठचा' ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. नदीला पाणी नसल्यानं ऊसाची शेती करपून चालली आहे.
Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांना (Farmers) सातत्यानं विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. यावर्षी पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जात असल्याचं चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांचे डोळे आभाळकडे लागले असून, अद्यापही पावसानं हजेरी लावली नाही. त्यामुळं सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा तालुक्यातील 'सीना नदीकाठचा' ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. नदीला पाणी नसल्यानं ऊसाची शेती करपून चालल्याची स्थिती आहे. काही शेतकऱ्यांनी तर ऊसाच्या शेतात चरायला जनावरे सोडल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका
माढा तालुक्यातील केवड गावातील शेतकरी महादेव प्रल्हाद लटके यांच्याकडे पाच एकर ऊसाची शेती आहे. ही ऊस शेती नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून नदीला पाणी नाही. दुसरीकडे दिवसेंदिवस उन्हाची तिव्रता वाढत चालली आहे. त्यामुळं ऊसाचे पिक करपू लागलं आहे. त्यामुळं महादेव लटके यांनी आपल्या ऊसात जनावरे चरायला सोडली आहेत. पाणी नसल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचं चित्र दिसत आहे. उजनी धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळं आणची ऊसाची शेती करपून चालली असल्याची माहिती महादेव लटके यांनी एबीपी माझाला दिली. ज्यावेळी शेतकऱ्यांना पाण्याची गरज नव्हती, त्यावेळी मोठ्या प्रमाणात उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले होते. मात्र, सध्या गरज असताना पाणी नसल्यानं आमची पिकं वाया जात आहेत. मात्र, या पिकात आता जनावरे सोडण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याची माहिती लटकेंनी दिली.
माढा तालुक्यातील सीना नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती केली जाते. मात्र, सध्या पाण्याअभावी ही ऊसाची शेती वाया गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे. माढा तालुक्यातील केवड, उंदरगाव, वाकाव, खैराव, कुंभेज, दारफळ, बोपले, एकूरके या गावातील ऊस उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. केवडमधील युवा शेतकरी निलेश लटके यांची 12 एकर ऊसाची शेती आहे. त्यातील 10 एकर ऊस वाया जाण्याच्या मार्गावर आहे. पाण्याअभावी वाया जाणारा ऊस वाचवण्यासाठी निलेश लटके यांनी आपल्या शेतात एक 500 फूट बोअर घेतला. मात्र त्याला पाणी लागले आहे. जवळपास 50 हजार रुपयांचा फटका यामध्ये बसल्यची माहिती त्यांनी एबीपी माझाला दिली.
प्रशासनाचा भोंगळ कारभार
उजनी धरणातून सोडण्यात येणार पाण्याचे योग्य नियोजन नाही. प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरु असल्याची माहिती निलेश लटकेंनी दिली. जून महिन्यात पाऊस पडत नाही याची प्रशासनाला माहिती असूनही त्यांनी पाण्याचे योग्य ते नियोजन केले नसल्याचे ते म्हणाले. फेब्रुवारी महिन्यात उजनी धरणातून सीना नदीत सोडण्यात आलेलं पाणी दोन ते अडीच महिने वाहत होते. ते जर पाणी वाचवलं असतं तर आता ही परिस्थिती निर्माण झाली नसती असेही लटके म्हणाले.
एकरी एक लाख रुपयाचे अनुदान मिळावं, शेतकऱ्यांची मागणी
उजनी धरण प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराचा फटका ऊस उत्पादकांना बसल्याची माहिती शेतकरी शंकर पाटील यांनी दिली. माझा 10 एकर ऊस आहे, आता हा सगळाच ऊस पाण्याअभावी वाया गेला आहे. सरकारच्या ढिसाळ नियोजनाचा हा फटका आहे. माझे जवळपास 10 लाख रुपयांचा फटका बसल्याची माहिती शंकर पाटील यांनी दिली. त्यामुळं सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपयांचे अनुदान मिळावं अशी मागणी शंकर पाटील यांनी केली आहे. या 10 एकर ऊसाला खताचे दोन डोस पूर्ण केले आहेत. तसेच दोन फवारण्या देखील केल्या होत्या. यासाठी एकरी 20 हजार रुपयांचा खर्च आला आहे. 10 एकर ऊसाला आत्तापर्यंत दोन लाख रुपयांचा खर्च आला आहे. हे सगळं नुकसान उजनी धरण प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळं झाल्याची माहिती शंकर पाटील यांनी दिली.
नुकसानग्रस्त ऊसाचे त्वरीत पंचनामे करावेत
मे महिन्याच्या सुरुवातीला शेतीसाठी पाणी सोडणे गरजेचे होते. मात्र, त्या काळात सीना नदीला पाणी सोडले नाही. दुसरीकडे गरज नसताना चंद्रभागा नदीला पाणी सोडले. ते पाणी जर सीना नदीला सोडले असते तर आज ऊस उत्पादकांवर ही परिस्थिती आली नसती अशी माहिती शेतकरी मच्छिंद्र पाटील यांनी दिली. माझा नऊ एकर ऊस आहे. त्यातील सहा एकर ऊस वाया जाण्याच्या मार्गावर असल्याचे पाटील म्हणाले. उजनी धरण प्रशासनाचा चुकीचा कारभार आणि अयोग्य नियोजनामुळं शेतकऱ्यांवर ही वेळ आल्याचे पाटील म्हणाले. तरी शासनाने त्वरीत लक्ष देऊन नुकसान झालेल्या ऊसाचे पंचनामे करुन मदत करावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Agriculture News : धरण उशाला कोरड घशाला, पिकं वाचवण्यासाठी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची धडपड