MCA Elections 2022 : मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीसाठी शरद पवार-आशिष शेलार यांचं संयुक्त पॅनल, संदीप पाटील स्वतंत्र मैदानात उतरणार
MCA Elections 2022 : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी यंदा आशिष शेलार आणि शरद पवार हे दोघेही संयुक्त पॅनल उतरवणार आहेत. विशेष म्हणजे या पॅनलमध्ये संदीप पाटील याचं नाव नसल्याचंही समोर आलं आहे.
MCA President Election : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA Election) अध्यक्षपदाची निवडणूक 20 ऑक्टोबरला होणार असून या निवडणुकीत प्रतिस्पर्धी गट शरद पवार आणि आशिष शेलार आता एकत्रपणे संयुक्त पॅनल घेऊन मैदानात उतरणार आहेत. भारतात अगदी कोणतीही निवडणूक ही चुरशीचीच होत असल्यानं मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक कशी साधी होईल, त्यामुळेच दररोज नवनवीन ट्वीस्ट समोर येत असून आधी पवार आणि शेलार गट वेगवेगळे उतरणार होते, पण आता दोघेही एकत्रपण निवडणूक लढवणार असल्याने या निवडणुकीत बरेच कट्टर प्रतिस्पर्धी एकत्र मैदानात उतरणार आहेत. विशेष म्हणजे या नव्याने समोर आलेल्या यादीत माजी क्रिकेटर संदीप पाटील (Sandeep Patil) यांचं नाव नसल्याचं दिसून आलं आहे. याबाबत संदीप पाटील यांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीत 'मी निवडणुक लढवणार' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या यंदाच्या निवडणुकीसाठी भाजप नेते आशिष शेलार आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचं संयुक्त पॅनल असणार असून या पॅनलमधून भाजप, शिवसेना तसंच शिंदे गट असे सारे एकत्र येताना दिसणार आहेत. यावेळी आशिष शेलार अध्यक्षपदासाठी तर अमोल काळे उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. तर सचिवपदासाठी अजिंक्य नाईकांची उमेदवारी असून संयुक्त सचिव दीपक पाटील तर खजिनदारपदासाठी अरमान मलिकांना उमेदवारी दिली आहे. कार्यकारिणीत जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, निलेश भोसले यांच्यासह 9 जण असणार आहेत. त्यामुळे विविध पक्षांचे नेते यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी एका पॅनलमधून निवडणुक लढवणार आहेत.
11 वर्षानंतर पुन्हा राजकीय नेता विरुद्ध माजी क्रिकेटर
दरम्यान संदीप पाटील हे माघार घेणार नसल्याने शेलार आणि संदीप पाटील यांच्यात अध्यक्षपदाची निवडणूक रंगण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे तब्बल 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेटपटू विरुद्ध राजकीय नेत्यामध्ये एमसीए अध्यपदासाठी लढत रंगणार आहे. याआधी म्हणजेच 2011 मध्ये माजी क्रिकेटर दिलीप वेंगसरकर आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यात अध्यपदासाठी निवडणूक झाली होती. त्यावेळी विलासरावांनी वेंगसरकरांना मात दिली होती. आता यंदाही राजकीय नेता क्रिकेटरवर भारी पडणार की संदीप पाटील आशिष शेलारांना मात देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
हे देखील वाचा-